नांदेड – सेवानिवृत्त, मयत आणि कार्यरत कर्मचाऱ्यांचे सेवाविषयक लाभ तसेच ५६ महिन्यांचा थकीत महागाई भत्ता अदा करावा, नाशिक महानगरपालिकेच्या धर्तीवर सर्व कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदान देण्याच्या मागणीसाठी १४ ऑक्टोबरपासून टप्प्याटप्याने आंदोलन सुरू केले आहे. कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसंदर्भात कोणताही तोडगा न निघाल्याने १६ ऑक्टोबरपासून काम बंद आंदोलन सुरू केले आहे. अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व विभाग या आंदोलनात सहभागी झाले आहेत. या आंदोलनात सहभागी झालेल्या सर्व कर्मचाऱ्यांना नोटीस बजावण्यात येईल त्याचवेळी कंत्राटी कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्याचा इशारा महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम यांनी दिला आहे. दुसरीकडे महापालिकेने कंत्राटी स्वच्छता कामगारांना बोनस देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ठेकेदाराचे कंत्राटी कर्मचारी तुपाशी तर महापालिकेचे कायम कर्मचारी उपाशी अशाच प्रतिक्रिया महापालिका वर्तुळात उमटल्या आहेत.
कास्ट्राईब कर्मचारी संघटनेच्या या विविध मागण्यासाठी महापालिका प्रशासनाकडे पाठपुरावा केला आहे. मंगळवारी प्रशासकीय अधिकाऱ्यांनी चर्चा केली; मात्र त्यावर तोडगा निघाला नाही. त्यामुळे बुधवारी कास्ट्राईब कर्मचारी संघटनेच्या वतीने महापालिकेपुढे द्वारसभा घेऊन मागण्या पुन्हा एकदा प्रशासनापुढे ठेवल्या; तरीही कोणतेही ठोस आश्वासन अथवा कृती न झाल्याने गुरुवारपासून कास्ट्राईब कर्मचारी संघटनेच्या वतीने काम बंद आंदोलन सुरू केले आहे. सकाळपासूनच महापालिका कर्मचारी प्रांगणात बसून होते. सायंकाळपर्यंत या कर्मचाऱ्यांशी चर्चा करण्यासाठी कोणताही प्रशासकीय अधिकारी खाली आला नाही. त्याचवेळी या कर्मचाऱ्यांना काम बंद आंदोलन केल्याप्रकरणी आता नोटीस बजावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. संपामध्ये किती कर्मचारी अधिकारी सहभागी झाले आहेत याची चाचपणी केली जात होती. हा आकडा निश्चित होताच सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांना नोटीस बजावण्यात येणार असल्याचे, महापालिका अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम यांनी स्पष्ट केले आहे. कंत्राटी कर्मचारी या काम बंद आंदोलनात सहभागी असतील तर त्यांना थेट बडतर्फ करू असा इशाराही त्यांनी दिला आहे.
दुसरीकडे कंत्राटी स्वच्छता कामगारांच्या मागणीसाठी कामगार युनियनचे नेते गणेश शिंगे यांनीही १७ ऑक्टोबरपासून स्वच्छतेचे काम बंद करण्याचा इशारा दिला होता. हा इशारा मिळताच महापालिका प्रशासनाने आपल्या स्वतःच्या निधीतून या सर्व स्वच्छता कामगारांना दिवाळी बोनस देण्यात येईल, असा निर्णय घेतला. हे बोनस महापालिका आपल्या स्वतःच्या तिजोरीतून देणार आहे. याबाबत कामगार युनियनलाही कळवण्यात आले त्यामुळे कामगार युनियनने १७ ऑक्टोबरपासून काम बंद करण्याचा इशारा दिला होता. ते आंदोलन मागे घेतल्याची घोषणा कर्मचारी युनियनचे नेते गणेश शिंगे यांनी केली आहे. एकूणच महापालिकेच्या कायम कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांसंदर्भात प्रशासनाकडून उदासीनता दाखवली जात आहे. दुसरीकडे ठेकेदाराच्या स्वच्छता कामगारांना मात्र महापालिका स्वतःच्या तिजोरीतून बोनस देऊन त्यांना खुश ठेवत आहे. हा नेमका काय प्रकार सुरू आहे, याचीच आता चर्चा मोठ्या प्रमाणावर केली जात आहे.




