प्रशासकीय

नांदेड जिल्ह्यात श्री गणेशोत्सव काळात डीजे बंदीवर जिल्हाधिकाऱ्यांचीही मोहोर..!

डॉल्बीच्या आवाजामुळे नागरिकांच्या कानांवर, हृदयावर व आरोग्यावर परिणाम, जीवितासही धोका निर्माण होण्याची शक्यता, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर डॉल्बी वाजविण्यावरून तणावाची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन प्रशासनाने घेतला निर्णय

नांदेड : श्री गणेशोत्सवाच्या कालावधीत नांदेड शहरासह जिल्ह्यात सार्वजनिक शांतता व सुव्यवस्था अबाधित राहावी, तसेच ध्वनिप्रदूषणामुळे नागरिकांच्या आरोग्यावर होणारे दुष्परिणाम टाळण्यासाठी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ चे कलम १६३(१) अन्वये जिल्ह्यात डॉल्बी सिस्टिमच्या वापरास प्रतिबंध करणारा आदेश जारी केला आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर डॉल्बी वाजविण्यावरून तणावाची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन प्रशासनाने हा निर्णय घेतला असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.

नांदेड शहर व जिल्ह्यात दहीहंडी, श्री गणेश स्थापना व श्री गणेश विसर्जन हे उत्सव मोठ्या प्रमाणात साजरे करण्यात येतात. या कालावधीत डॉल्बी सिस्टिमचा वापर केल्यामुळे वृद्ध, गर्भवती महिला, लहान मुले तसेच आजारी नागरिकांना त्रास होण्याची शक्यता असते. डॉल्बीच्या मोठ्या आवाजामुळे नागरिकांच्या कानांवर, हृदयावर व आरोग्यावर परिणाम होण्याबरोबरच जीवितासही धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सार्वजनिक शांतता व सुरक्षिततेला बाधा निर्माण होऊ नये, यासाठी हा प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आला आहे. उच्च न्यायालय, मुंबई येथे दाखल जनहित याचिकेच्या अनुषंगाने ध्वनी प्रदूषण नियंत्रणाबाबत वेळोवेळी देण्यात आलेल्या आदेशांचे पालन करणे आवश्यक आहे. तसेच गणेशोत्सव व अन्य उत्सवांच्या काळात ध्वनी प्रदूषणाच्या नियमांचे उल्लंघन होऊ नये, यासाठी प्रशासनाकडून उपाययोजना करण्यात येत आहेत.

नांदेड जिल्ह्यात ७ सप्टेंबर २०२६ रोजी मध्यरात्री १२ वाजेपासून ८ नोव्हेंबर २०२६ रोजी मध्यरात्री १२ वाजेपर्यंत डॉल्बी सिस्टिमचा वापर करण्यास अथवा चालविण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. डॉल्बी सिस्टिम मालक, चालक तसेच अन्य कोणत्याही व्यक्तीस डॉल्बी सिस्टिम वापरण्यास किंवा चालविण्यास मनाई करण्यात आली आहे.आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तींविरुद्ध भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ चे कलम १६३(१) तसेच लागू असलेल्या इतर कायदेशीर तरतुदींनुसार कारवाई करण्यात येईल, असे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

श्री गणेशोत्सव, नवरात्र, शिवजयंती, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, रामनवमी, दहीहंडी आदी उत्सवांच्या काळात डॉल्बी सिस्टिमच्या वापराबाबत पूर्वीही संबंधितांना नोटिसा देऊन तसेच बैठका घेऊन समज देण्यात आली होती. मात्र, काही ठिकाणी नियमांचे उल्लंघन होत असल्याचे निदर्शनास आले आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर डॉल्बी वाजविण्यावरून तणावाची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे गणेशोत्सव व आगामी विविध उत्सव शांततेत, सुरक्षिततेत आणि ध्वनिप्रदूषणमुक्त वातावरणात साजरे करण्यासाठी नागरिक, गणेश मंडळे, डॉल्बी सिस्टिम चालक व मालक यांनी प्रशासनाच्या आदेशाचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!