
नांदेड – ओबीसींनो.. आता स्वतःचे आरक्षण स्वतःच वाचवण्याची गरज निर्माण झाली आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ओबीसींनी निर्णायक भूमिका घ्यावी, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांनी केले. ते आज बुधवारी नांदेडमध्ये भटके, विमुक्त, बलुतेदार ओबीसी एल्गार महामोर्चात बोलत होते. यावेळी ओबीसीचे नेते लक्ष्मण हाके, नवनाथ वाघमारे यांचीही प्रमुख उपस्थिती होती.
नांदेड शहरातील नवा मोंढा मैदानाहून निघालेल्या महामोर्चाचे रूपांतर जिल्हाधिकारी कार्यालयापुढे सभेत झाले. यावेळी प्रमुख मार्गदर्शन करताना ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांनी आता देशात आणि राज्यात शैक्षणिक आणि नोकऱ्यातील आरक्षण संपल्याचे स्पष्ट केले आहे. शिक्षणातील आरक्षण खाजगीकरणाच्या तर नोकरीतील आरक्षण हे कंत्रातीकरणाच्या माध्यमातून संपविले आहे. राहिले ते ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समिती, महापालिका यामधील आरक्षणावरही फडणवीस सरकारनेच आता गदा आणली आहे. ओबीसींनी सरकारचाच हा डाव ओळखावा आणि स्वतःचे आरक्षण वाचवण्यासाठी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या भूमिकेत निवडणुकीत निर्णायक भूमिका घ्यावी, असेही स्पष्ट केले. आता जर ओबीसींनी भूमिका घेतली नाही तर त्यांचे राजकीय आरक्षण हिरावले जाईल असेही आंबेडकर यांनी स्पष्ट केले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ओबीसींचे मत हे ओबीसींनाच मिळावे. ओबीसी उमेदवार नसतील तर ते मत अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती अथवा मुस्लिम उमेदवारांनाही देण्यात यावे असेही त्यांनी सांगितले. विधानसभा निवडणुकीत ओबीसींनी सत्ताधाऱ्यांना मते दिली; मात्र त्या मतांच्या आधारे त्यांचेच आरक्षण सरकारनेच हिरावून घेतले आहे. त्यामुळे आता आगामी काळात तरी ओबीसींनी जागे होऊन आपला आरक्षणाचा हक्क कायम ठेवण्यासाठी पुढे यावे असेही ते म्हणाले.
जगात आज भारताच्या बाजूने कोणतेही देश उभे राहिले नाहीत. जगात आज १७ विरुद्ध १ अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. आगामी तीन महिन्यात पाकिस्तानसोबत युद्ध होईल, अशी शक्यताही त्यांनी वर्तवली आहे. ही परिस्थिती अहंभाव असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे उद्भवली असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. अशा या परिस्थितीत प्रत्येक भारतीयाने जगाला दाखवून देण्याची वेळ आली आहे की भारतीय नागरिक हे देशाला मानतात, कोणत्याही व्यक्तीला नाही. यातूनच भारताचे भविष्य आहे, असेही ते म्हणाले. आज देश महत्त्वाचा आहे. व्यक्ती किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महत्त्वाचे नाहीत असेही ते म्हणाले.
देशात सत्ताधाऱ्यांकडूनच हिंदू खतरे में है अशी भीती दाखवली जात आहे. देशात आणि राज्यातही तुमचीच सत्ता असताना हिंदू धोक्यात कसा आहे असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. त्याचवेळी ओबीसींना हिंदूंच्या नावे पुढे केले जात आहे. त्यांची डोकी भडकवली जात आहेत. ओबीसींनी वेळीच जागे व्हावे असेही आंबेडकर यांनी स्पष्ट केले. यावेळी ओबीसी नेते लक्ष्मण हाके, नवनाथ वाघमारे यांचीही समायोजित भाषणे झाली. या मोर्चासाठी पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी तगडा बंदोबस्त लावला होता. नांदेड शहर उपविभागीय अधिकारी रामेश्वर व्यंजने, वजीराबाद पोलीस निरीक्षक परमेश्वर कदम, भाग्यनगर पोलीस निरीक्षक संतोष तांबे यांच्यासह जिल्हाभरातील वरिष्ठ अधिकारी तसेच कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले होते.
ओबीसी मोर्चाचा उडाला फज्जा..! नांदेडमध्ये होणारा ओबीसींचा हा महामोर्चा असल्याचे संयोजकांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत स्पष्ट करण्यात आले होते. या मोर्चामध्ये दोन ते तीन लाख लोक उपस्थित राहतील, असे सांगण्यात आले होते. त्या दृष्टीने पोलीस अधिकाऱ्यांनीही बंदोबस्तासाठी मोठी तयारी केली होती; मात्र प्रत्यक्षात मोर्चात ३०० ते ४०० लोकही उपस्थित नव्हते. उपस्थितांमध्येही वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांचीच मोठी संख्या होती. त्यातही मोर्चेकरी कमी आणि बंदोबस्तासाठी असलेले पोलीस अधिकारी, कर्मचारीच अधिक दिसून येत होते. एकूणच या मोर्चाचा फज्जाच उडाल्याचे दिसून आले. ओबीसींनी या मोर्चाकडे पाठ फिरवली असल्याचे स्पष्ट झाले आहे.



