
नांदेड – जिल्ह्यात स्वस्त धान्य दुकानातील धान्याचा होणारा काळाबाजार राजरोसपणे सुरू असतानाच आता महिला व बालविकास विभागाच्या एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत अंगणवाडी केंद्रावरील गरोदर माता आणि लहान मुलांना वाटप करण्यात येणारा घरपोच आहार थेट खाजगी गोदामात पोहोचविला जात असल्याची बाब पुढे आली आहे. ‘ऑपरेशन फ्लश आउट’ अंतर्गत कुंटूर पोलीस ठाणे हद्दीत कुंटूर फाटा येथील रजवी नवाज हुसेन अब्दुल बारी याच्या ताज ट्रेडर्स गोदामामध्ये तूरडाळीच्या १ हजार बॅग, ५०० बॅग चना, ८०० बॅक अरकळ, ५०० बॅग सोयाबीन अशा वेगवेगळ्या धान्याच्या २ हजार ८०० बॅग पोलिसांनी जप्त केल्या आहेत. त्यामुळे या मोफत वाटप करण्यात येणाऱ्या आहाराचा काळाबाजार करणाऱ्यांमध्ये तालुकास्तरापासून जिल्हास्तरांपर्यंत कोणकोणते अधिकारी, कर्मचारी सहभागी आहेत याचा आता पोलिसांना शोध घ्यावा लागणार आहे.
नांदेड जिल्ह्यातील कुंटूर पोलीस ठाणे हद्दीत कुंटूर फाटा येथील गोदामामध्ये अत्यावश्यक वस्तू अधिनियम अतर्गत येणाऱ्या मालाची साठवणूक केल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांना गुप्त बातमीदारामार्फत मिळाली. त्यानंतर पोलीस अधीक्षकांच्या आदेशानुसार पथकातील पोलीस अधिकारी, अंमलदार, कुंटूर पोलीस यासोबतच नायगावचे बाल प्रकल्पाधिकारी, गटशिक्षणाधिकारी, पुरवठा अधिकारी यांच्या संयुक्त पथकाने कुंटूर फाटा येथे जाऊन पाहणी केली. त्यावेळी नायगाव येथील रजवी नवाज हुसेन अब्दुल बारी याच्या कुंटूर फाटा येथील गोदामामध्ये महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालविकास विभाग विभागाच्या एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत अंगणवाडी केंद्रावर गरोदर माता आणि लहान मुलांना वाटप करण्यात येणाऱ्या घरपोच आहाराच्या एनर्जी डेन्स तूर डाळ खिचडी प्रीमिक्सचे २५ पाकीट, एनर्जी डेन्स मूग डाळ खिचडी प्रीमिक्सचे २० पाकीट, मल्टीमिक्स सिरीयल्स अँड प्रोटीन प्रीमिक्सचे १०० पाकीट असे एकूण १४५ पाकिटे आढळली. रजवीच्या गोदामाची पाहणी केली असता १ हजार बॅग तूर, ५०० बॅग चना, ८०० बॅग अरकळ, ५०० बॅग सोयाबीन सापडल्या आहेत.
त्यामध्ये एकात्मिक बाल विकास अंतर्गत अंगणवाडीचा खाऊ १४५ पाकीट, २० बॅग तांदूळ, १५ बॅग गहू तसेच एका आयचर वाहनांमध्ये १२० पोते तांदूळ, गहू चना सोयाबीन तर दुसऱ्या दोन आयचरमध्ये ८०० पोते चना आणि इतर धान्य तर एका ऑटोमध्ये चार पोते तांदूळ असे धान्य असलेले चार मोठे हॉल त्यामध्ये धान्याचे पोते बॅग भरलेले जप्त करण्यात आले आहेत. या गोदामाला पोलिसांनी सील केले असून संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यामार्फत येणाऱ्या अहवालानुसार पुढील कारवाई करण्याची करण्यात येईल, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
स्थानिक अधिकाऱ्यांसह जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांचाही घोटाळ्यात समावेश..?अंगणवाडी मार्फत गरोदर माता आणि बालकांना वाटप करण्यात येणाऱ्या या आहाराचा गेल्या किती वर्षापासून काळाबाजार सुरू होता, त्याची स्थानिक महिला व बाल विकास अधिकाऱ्यांना माहिती नव्हती का तसेच गोदामामध्ये होणाऱ्या या साठवणुकीची स्थानिक पोलिसांना माहिती होती का? स्थानिक तसेच जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांचाही या घोटाळ्यात समावेश आहे का? त्यांनी गायब होणाऱ्या या धान्याकडे कानाडोळा का केला? याबाबतही आता वेगवेगळे प्रश्न उपस्थित होत आहेत. नांदेड जिल्ह्यात कृष्णूर धान्य घोटाळा मोठ्या प्रमाणात गाजला होता. त्याच तुलनेत हा घोटाळाही आता समोर आला आहे. कृष्णूर धान्य घोटाळ्यातही स्वस्त धान्य दुकानातील धान्य थेट एका खाजगी कंपनीला पुरविले जात होते तर आता अंगणवाडीतील बालकांचा खाऊही थेट गोदामापर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे या सर्व घोटाळ्याची पाळमुळे किती खोलवर रुजले आहेत, त्यामध्ये स्थानिक अधिकाऱ्यांसह जिल्हास्तरावरील अधिकारीही सहभागी आहेत का? याचा शोध पोलिसांना घेऊन या प्रकरणाचा छडा लावावा लागणार आहे. त्याचवेळी गरोदर माता आणि बालकांच्या तोंडचा घास पळविणाऱ्याविरुद्ध कठोर कारवाई करावी अशी मागणी पुढे आली आहे. पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी केलेल्या या कारवाईचे कौतुक होत आहे.