प्रशासकीय

नांदेड जिल्ह्यात लोकसभा निवडणूक मतदान प्रक्रियेची युद्धपातळीवर तयारी – जिल्हाधिकारी अभिजीत राऊत 

जिल्ह्यात २६ एप्रिल रोजी २ हजार ७११ मतदान केंद्रावर होणार मतदान

नांदेड – नांदेड जिल्ह्यातील नांदेड लोकसभा मतदारसंघ आणि हिंगोली लोकसभा मतदारसंघात मतदान प्रक्रियेची तयारी युद्धपतळीवर सुरू असल्याची माहिती जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिली. नांदेड आणि हिंगोली लोकसभा मतदारसंघासाठी २६ एप्रिल रोजी मतदान होणार आहे.

नांदेड लोकसभा मतदारसंघात नांदेड दक्षिण, नांदेड उत्तर, भोकर, नायगाव, देगलूर आणि मुखेड हे सहा विधानसभा मतदारसंघ आणि हिंगोली लोकसभा मतदारसंघात नांदेड जिल्ह्यातील किनवट आणि हदगाव हे दोन विधानसभा मतदारसंघ समाविष्ट आहेत. नांदेड लोकसभा मतदारसंघात २३ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. राजकीय प्रचार आता अंतिम टप्प्यात आला आहे, त्याप्रमाणेच प्रशासकीय यंत्रणेचीही मतदानाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. ही तयारी युद्धपातळीवर केली जात आहे.

लोकसभा निवडणुकीतील मतदानासाठी कर्मचाऱ्यांचे दुसरे प्रशिक्षण पार पडले आहे. ईव्हीएम, व्हीव्हीपॅट मशीन हाताळण्याचे प्रात्यक्षिकही पूर्ण झाले आहेत. या प्रशिक्षणानंतर आता २५ आणि २५ एप्रिल रोजी मतदान कर्मचारी आपापल्या केंद्रावर पोहोचणार आहेत. यासाठीचे नियोजन केले जात आहेत. मतदान केंद्रावर कर्मचाऱ्यांना पोहोचविण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाच्या १०८ बस उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

दरम्यान नांदेड लोकसभा मतदारसंघात १८ ते २१ एप्रिलपर्यंत दिव्यांग आणि ज्येष्ठ मतदारांचे मतदान निवडणूक कर्मचारी घरी जाऊन नोंदवत आहेत. नांदेड लोकसभा मतदारसंघात ६९९ मतदारांनी घरीच मतदान करण्याचा पर्याय निवडला होता. त्यानुसार ही मतदान प्रक्रिया सुरू आहे.

दुसरीकडे मतदान केंद्रावरील मतदानाची तयारी ही अंतिम टप्प्यात आली आहे. नांदेड जिल्ह्यात २६ एप्रिल रोजी २ हजार ७११ केंद्रावर मतदान होणार आहे. मतदान करण्यास आलेल्या मतदाराला केंद्रावर वेगवेगळ्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. येथे सहाय्यक कक्ष, प्रतीक्षालय, रॅम, व्हीलचेअर, पिण्याचे पाणी, पाळणाघर, वैद्यकीय कक्ष राहणार आहे.

लोकसभा मतदानाच्या अनुषंगाने जिल्ह्यात सुरू असलेल्या तयारीविषयी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी सांगितले..

नांदेड जिल्ह्यात एकूण मतदारांची संख्या २७ लाख ४ हजार ६७७ इतकी आहे. त्यामध्ये १३ लाख ९६ हजार ४७७ पुरुष मतदार तर १३ लाख ८ हजार ३६ महिला मतदार आहेत. तृतीयपंथी मतदारांची संख्या १६४ इतकी आहे. या एकूण मतदारांपैकी नांदेड लोकसभा मतदार संघासाठी १८ लाख ५१ हजार ८४३ मतदार मतदानाचा हक्क बजावू शकणार आहेत. त्यामध्ये महिला मतदारांची संख्या ८ लाख ९६ हजार ६१७ तर पुरुष मतदारांची संख्या ९ लाख ५५ हजार ८४ इतकी आहे. तृतीयपंथी मतदार १४२ आहेत. या सर्व मतदारांना मतदान करण्यासाठी जिल्ह्यात ३ हजार ४१ मतदान केंद्रांची स्थापना करण्यात आली आहे. यामध्ये ४० मतदान केंद्र संवेदनशील आहेत. नांदेड लोकसभा मतदारसंघासाठी २ हजार ६२ मतदान केंद्रावर मतदान होणार आहे. तर हिंगोली लोकसभा मतदार संघासाठी किनवट आणि हदगाव या विधानसभा मतदारसंघात ६४९ मतदान केंद्रावर २६ एप्रिल रोजी मतदान होईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!