
नांदेड – भारतीय जनता पार्टीने महापालिका सार्वत्रिक निवडणुकीत दिलेल्या जाहीरनाम्याच्या अंमलबजावणीसाठी माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण हे सरसावलेले आहेत. एकीकडे आरक्षण सोडतीनंतर महापौर कोण होईल याची चर्चा सुरू असतानाच खा. चव्हाण हे गुरुवारी महापालिकेत धडकले. निवडणूक निकालाच्या सहाव्या दिवशीच घेतलेल्या बैठकीनंतर ‘नांदेड स्क्रिप्ट’शी बोलताना खा.चव्हाण यांनी आमचा अजेंडा तयार आहे, महापौरही भाजपचाच होणार आहे. महापौरांची निवड होताच महापौरांच्या हातात विकास कामांचा अजेंडा सोपविण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. शहरातील विकास कामांचा आढावा घेताना प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करून १०० दिवसांचा कृती आराखडा राबविण्याचे निर्देश चव्हाण यांनी यावेळी दिले. महापालिकेअंतर्गत होणाऱ्या विकास कामासंदर्भात राज्य शासनाची मदत लागणार आहे. त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घ्यायची आहे. अनेक योजना राज्य तसेच केंद्र शासनाच्याही आहेत त्याबाबतही चर्चा करण्यात आली.
महापालिकेत गुरुवारी झालेल्या या बैठकीस आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे, माजी आमदार तथा भाजपाचे महानगर अध्यक्ष अमरनाथ राजुरकर, भाजपाचे प्रसिद्धी प्रमुख चैतन्य बापू देशमुख, दिलीप कंदकुर्ते यांची प्रमुख उपस्थिती होती. शहरातील वाहतूक नियोजनासह बंद अवस्थेत असलेले सी.सी.टी.व्ही.कॅमेरे कार्यान्वित करावेत, शहर बस सेवेसाठी इलेक्ट्रीक बसेसचा प्रस्ताव तयार करणे, नवी दिल्ली व मुंबईच्या धर्तीवर इनडोअर स्टेडियम उभारणे, पार्कींग व्यवस्था सुधारणेसाठी मल्टी फ्लेअर पार्कींगची निर्मीती, स्टेडीयम परिसरात खाऊ गल्लीची निर्मीती, मुंबईप्रमाणे नांदेड शहरात एक मोठी सेंट्रल लाईब्ररीची उभारणी आदी प्रकल्पासंदर्भात या बैठकीत खा. चव्हाण यांनी चर्चा केली.
गोदावरी नदी शुध्दीकरण प्रकल्प, नदी घाट परिसरातील नवीन रस्ते इत्यादींचा आढावा घेतांना आठवडी बाजार मुख्य रस्त्यावर भरणार नाही याची दक्षता घेऊन पर्यायी जागा उपलब्ध करुन देणे, शहरातील धोकादायक विद्युत वाहिनी भूमिगत करणे, नैसर्गिक नाल्यावरील अतिक्रमणे काढून पाण्याचा निचरा सुस्थितीत करणे, नागरिकांना जास्तीत जास्त सेवा ह्या ऑनलाईन स्वरुपात मिळाल्या पाहिजेत. महापालिकेच्या जमिनीवरील वस्त्यांना नियमीत करणे, महानगरपालिकांचे दवाखाने अद्यावत करणे, शहरातील मुख्य रस्त्यावरील अतिक्रमणे निष्कासित करणे, शहर स्वच्छता चोख पध्दतीने करुन घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प उभारणी ही दक्षिण नांदेड व उत्तर नांदेड अशा दोन ठिकाणी झाली पाहिजे, शहरात हॉकर्स झोन निर्माण करावेत, महापालिकेने उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न करणे यासह दैनंदिन कामकाज गतिमान करावे अशा सूचना यावेळी खा.अशोकराव चव्हाण यांनी बैठकीदरम्यान दिल्या.
या आढावा बैठकीस अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम, अतिरिक्त आयुक्त निलेश सुंकेवार, उपायुक्त अभिजित वायकोस, उपायुक्त स.अजितपालसिंघ संधू, उपायुक्त नितीन गाढवे, शहर अभियंता सुमंत पाटील, नगररचनाकार ओम लहाने, सहाय्यक आयुक्त मो.गुलाम सादेक, मुख्य उद्यान अधीक्षक डॉ.मिर्झा बेग, सिस्टीम मॅनेजर सदाशिव पतंगे, शिक्षणधिकारी नागराज बनसोडे, उपअभियंता सतीश ढवळे, अग्निशमन अधिकारी के.जी.दासरे, जनसंपर्क अधिकारी सुमेध बनसोडे, कनिष्ठ अभियंता राजकुमार बोडके व रविंद्र सरपाते आदींची उपस्थिती होती.
महापौर आमचाच, निवडणूक जाहीरनाम्याची अंमलबजावणी तातडीने करू… महापौर निवडीपूर्वीच माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी महापालिकेत घेतलेल्या आढावा बैठकीसंदर्भात त्यांना विचारले असता आमचे कामकाज आता फास्टट्रॅकवर असल्याचे खा. चव्हाण म्हणाले. त्याचवेळी महापौर हा आमचाच होणार आहे. त्यामुळे महापौरांनी पदभार घेताच त्यांच्या हातात भाजपाचा अजेंडा सोपविला जाणार आहे. ही कामे तातडीने पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावेत असे आदेश त्यांना दिले जातील. महापौर निवडी संदर्भात चर्चा सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले. महिलांच्या हाती कारभार सोपविला जाणार आहे. महापौर निवडीसंदर्भात लवकरच निर्णय घेतला जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले



