महापालिका

नांदेडच्या १५ व्या महापौर १० फेब्रुवारी रोजी निवडल्या जाणार..!

नवा इतिहास..! सलग सहाव्यांदा महापौरपदी महिला होणार विराजमान, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले पिठासीन अधिकारी म्हणून काम पाहणार, महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच होणार भाजपाचा महापौर

नांदेड – नांदेड महापालिकेच्या पंधराव्या महापौरपदी कोण विराजमान होणार यासाठी नांदेडकरांना १० फेब्रुवारीपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे. छत्रपती संभाजीनगर विभागीय आयुक्तांनी महापौर निवडीचा कार्यक्रम घोषित केला आहे. १० फेब्रुवारी रोजी महापालिकेची विशेष सभा महापौर निवडीसाठी घेतली जाणार आहे. या निवडीप्रसंगी नांदेडचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले हे पिठासीन अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत. नांदेड महापालिकेत भारतीय जनता पक्षाने ४५ नगरसेवक निवडून आणत एकहाती सत्ता मिळवली आहे. महापालिका स्थापनेपासून पहिल्यांदाच भाजपाचा महापौर होणार आहे.

नांदेड महापालिकेचे पहिले महापौर म्हणून शिवसेनेचे सुधाकर पांढरे हे २१ ऑक्टोबर १९९७ रोजी विराजमान झाले होते. हा एक अपवाद वगळता महापालिकेच्या सभागृहात पुढे काँग्रेसचेच महापौर निवडून आले. गेल्या दहा वर्षाचा नांदेड महापालिकेत महापौरपदी महिला राजस राहिले आहे यामध्ये २७ एप्रिल २०१५ रोजी शैलजा किशोर स्वामी या निवडून आल्या होत्या. त्यानंतर शीला किशोर भवरे, दीक्षा कपिल धबाले, मोहिनी विजय येवनकर आणि जयश्री निलेश पावडे या सलग पाच महिला महापौरांनी नांदेडचा कारभार सांभाळला आता पुन्हा एकदा नांदेडचे महापौर पद हे महिलांसाठी राखीव आहे त्यामुळे आता पंधराव्या महापौर म्हणूनही महिलेची महिलेची निवड होणार आहे.

महापौर पदाचा कार्यकाळ हा अडीच वर्षाचा असला तरीही मागच्या दहा वर्षातील महापालिकेतील सव्वा सव्वा वर्षाचा पॅटर्न पाहता पुन्हा तोच पॅटर्न अंमलात आणून कार्यकर्त्यांना संधी दिली जाईल का हे पाहणे हे आगामी काळात औत्सुक्याचे ठरणार आहे. त्यातही आता महापालिकेत भाजपा युगाचा प्रारंभ होणार आहे. ८१ नगरसेवकांच्या महापालिकेत विरोधी पक्षात ३१ नगरसेवक राहणार आहेत. त्यामुळे महापालिकेत विरोधकांची ही संख्या मोठी आहे. हीच बाब पाहता महापालिकेचा कारभार सांभाळण्यासाठी सक्षम नेतृत्व असावे, अशी भूमिका माजी मुख्यमंत्री, खासदार अशोकराव चव्हाण यांनी घेतली आहे. त्यामुळे आता महापौर निवडीत कुणाला संधी मिळेल, याकडे लक्ष लागले आहे.

नांदेड महापालिकेच्या सभागृह कार्यकाळ समाप्तीनंतर जवळपास तीन वर्षानंतर सार्वत्रिक निवडणुका घेण्यात आल्या. ८१ नगरसेवक पदांसाठी या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने सर्वाधिक ४५ जागा प्राप्त केल्या आहेत. भाजपनंतर एमआयएम नांदेड महापालिकेत दुसऱ्या स्थानी राहिला आहे. एमआयएमने १४ जागा जिंकल्या आहेत. काँग्रेस पक्षाला १० जागा, वंचित बहुजन आघाडीला महापालिकेत यश मिळाले असून पाच उमेदवार मोठ्या मत फरकाने निवडून आले आहेत. शिवसेना शिंदे गट चार, राष्ट्रवादी अजित पवार गट दोन आणि एक अपक्ष उमेदवारही या निवडणुकीत निवडून आला आहे.

महापौर पदासाठी यांची नावे आहेत चर्चेत..! महापालिकेत ८१ पैकी ४५ नगरसेवक हे भारतीय जनता पक्षाचे निवडून आले आहेत. त्यात आता शिवसेना शिंदे गटाने ही भाजपला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे महायुतीच्या नगरसेवकांची संख्या आता ४९ वर गेली आहे. महायुतीचाच महापौर होईल हे निश्चित. त्यातही भाजपने आता उमेदवार निवडीसाठी हालचाली गतिमान केल्या आहेत. माजी मुख्यमंत्री, खा. अशोकराव चव्हाण हेच महापौर पदाचे नाव अंतिम करणार आहेत. यावेळीही सर्वसाधारण प्रवर्गातील महिलेसाठी महापौर पद आरक्षित आहे. त्यामध्ये आता भारतीय जनता पक्षाकडून ज्योती किशन कल्याणकर, सुदर्शना महेश उर्फ बाळू खोमणे, कविता संतोष मुळे, शांभवी प्रवीण साले, वैशाली मिलिंद देशमुख, कविता नागनाथ गड्डम, रुची अल्केश भारतीय यांच्यासह मनप्रीतकौर कुंजीवाले यांचेही नाव चर्चेत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!