महापालिका

हुश्श्श… अखेर उत्तर नांदेडमध्ये पाणीपुरवठा सुरू..!

सर्व भागात रोटेशननुसार पाणीपुरवठा होणार - आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे 

नांदेड – आज येणार…उद्या येणार… कधी येणार अशा चर्चा सुरू असताना उत्तर नांदेडमध्ये अखेर सोमवारी सकाळपासून पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. ईसापूर धरणातून रविवारी रात्री आठ वाजता सांगवी बंधाऱ्यात पाणी पोहोचले आणि त्यानंतर पाणीपुरवठ्याची प्रक्रिया तातडीने सुरू करण्यात आली. त्यानंतर सोमवारी सकाळी उत्तर नांदेडातील काही भागांना पाणीपुरवठा सुरू झाला. रोटेशननुसार उर्वरित सर्व भागांना पाणी पुरवठा केला जाईल, जलकुंभ भरण्याचे काम सुरू असल्याची माहिती महापालिका आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांनी दिली. ईसापूर प्रकल्पातून पाणी आणताना वाढते तापमान आणि अन्य काही आलेले अडथळे तसेच सांगवी बंधाऱ्यावरही स्थानिकांनी केलेला काहीअंशी विरोध हा पाणीपुरवठयास एक दिवस विलंब करणारा ठरल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

विष्णुपुरी प्रकल्पावरील कोटीतीर्थ पंप हाऊस येथे झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे उत्तर नांदेड शहरातील पाणीपुरवठा २ मे पासून खंडित झाला होता. ईसापूर धरणातून तातडीने आसना नदीवरील सांगवी बंधाऱ्यात पाणी आणण्यात आले. हे पाणी रविवारी नांदेडमध्ये रात्री पोहोचले. त्यानंतर काबरानगर येथील सात दशलक्ष लिटर क्षमतेच्या जलशुद्धीकरण केंद्रातून शहरातील काही जलकुंभ भरण्यात आले आहेत. सोमवारी सकाळी वर्कशॉप, पीरबुऱ्हाणनगर, अंबिकानगर, दरवेशनगर आदी भागांना पाणीपुरवठा झाला आहे. तर संध्याकाळी तरोडा भाग, सांगवी परिसर, स्नेहनगर, पोलीस कॉलनी, मगनपुरा, वसंतनगर आदी भागांना पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे. उर्वरित सर्व भागांनाही रोटेशन नुसार पाणीपुरवठा केला जाईल असे पाणीपुरवठा विभागाने स्पष्ट केले आहे.

या भागात पाणीपुरवठा करण्यासाठी वेळ आहे तिथे टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. या संदर्भात टँकर नियोजनासाठी पाणीपुरवठा विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे संपर्क क्रमांकही देण्यात आले आहेत.

कोटीतीर्थ पंप हाऊस येथील दुरुस्तीचे काम दोन दिवसात पूर्ण होणार…कोटीतिर्थ पंपहाऊस येथील दुरुस्तीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. हे काम दोन दिवसात पूर्ण होईल अशी शक्यता आहे. येथील पंपिंग हाऊसचे सर्वच काम आता नव्याने केले जात आहे. जुनी कालबाह्य मशिनरी बदलण्यात येत असून नवे साहित्य येथे टाकण्यात येत आहे त्यामुळे येथील काम परिपूर्ण होईल अशी माहिती पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता दिलीप आरसुडे यांनी दिली. कच्चे पाणी घेण्यासाठी असलेल्या पाईपलाईनचा जॉईंट निसटला होता. त्यामुळे संपूर्ण उत्तर नांदेड चा पाणीपुरवठा खंडित झाला. हा जॉईंट जोडून पुन्हा काँक्रिटीकरण करण्यात येत आहे. या काँक्रिटीकरणाच्या कामासाठी तब्बल २५ काँक्रिट मिक्सर ट्रक लागणार आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!