गुन्हेगारी

नांदेडमध्ये सेवानिवृत्त कर्मचाऱ्यावर गोळ्या घालून लुटणाऱ्या मास्टरमाइंडसह तिघांना अटक

पोलिसांनीही झाडली प्रत्युत्तरात गोळी, बारा तासात आरोपी जेरबंद 

नांदेड – नांदेड शहरातील अष्टविनायकनगर येथे सात मे रोजी बँकेतून ४० हजार रुपये काढून घरापर्यंत आलेल्या एका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यावर गोळीबार करून ती रक्कम, मोबाईल लुबाडणाऱ्या दोघांसह मास्टरमाइंड असलेल्याही पोलिसांनी जेरबंद केले आहे. या कारवाईत पोलिसावर गोळीबार करणाऱ्या आरोपीला पोलिसांनीही गोळीबार करून ताब्यात घेतले आहे. त्यामुळे या घटनेत पोलिसांनी केलेली कारवाई ही ‘गोली का जवाब गोली’ अशीच ठरली आहे.

नांदेड शहरातील अष्टविनायक नगर येथील रवींद्र जोशी या ६८ वर्षीय सेवानिवृत्त कर्मचाऱ्याने ७ मे रोजी बँकेतून काढलेले ४० हजार रुपये घेऊन घरी येत होते. त्यावेळी त्यांच्या मागावरच असलेल्या दोघाजणांनी घराच्या गेटसमोरच पैशांची बॅग हिसकावण्याचा प्रयत्न केला. यावेळी जोशी यांनी प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्यावर दोन गोळ्या झाडून त्यांच्याकडील पैसे असलेली बॅग आणि मोबाईल घेऊन त्या दोघांनी स्कुटीवर पोबारा केला. ही घटना समजताच विशेष पोलीस महानिरीक्षक शशिकांत महावरकर, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी भेट देऊन घटनेची माहिती घेतली. तात्काळ पथके रवाना करून आरोपीस पकडण्याचे आदेश विशेष पोलीस महानिरीक्षक महावरकर आणि पोलीस अधीक्षक कोकाटे यांनी दिले होते.

घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करून माहितगारांच्या मदतीने आरोपीच्या शोध घेण्यात आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणाचा मास्टरमाईंड हरदीपसिंग बलदेवसिंग ढिल्लोन रा. दशमेशनगर, बाफना हा असल्याची माहिती मिळाली. या माहितीवरून पोलिसांनी सापळा रचला. त्याला पोलिसांनी प्रारंभी ताब्यात घेतले. त्यानंतर रोहित सतपाल कौडा आणि सरप्रीतसिंग उर्फ साजन दलबीरसिंग सहोता हे दोघेही राहणार पंजाब येथील आहेत. त्यांनी गोळीबार करून ४० हजार रुपये हिसकावले होते. त्या दोघांनाही विष्णुपुरी परिसरात असदवन रस्त्यावर पाठलाग करून पकडण्यात आले. यावेळी आरोपीने पोलीस उपनिरीक्षक आनंद बिचेवार यांच्या पथकावर गोळी झाडली. पोलीस पथकाने त्यांच्या संरक्षणासाठी दोन गोळ्या आरोपीच्या दिशेने झाडल्या. यात आरोपीच्या पायावर गोळी लावून तो जखमी झाला. त्याला तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. जखमी आरोपीचे नाव सरप्रीतसिंग उर्फ साजन दलवीरसिंग सहोता रा. अमृतसर पंजाब आहे तर त्याचा दुसरा साथीदार रोहित सतपाल कौडा रा. बरीवाला ता. जि. मुक्तसर साहिब, पंजाब याला ताब्यात घेतले आहे. विचारपूस करून आरोपींनी सेवानिवृत्ताची हिसकावलेली ४० हजार रुपये रोख रक्कम, गुन्ह्यात वापरलेली स्कूटी, पिस्टल चाकू तसेच एक कारही जप्त करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी अपर पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, अपर पोलीस अधीक्षक खंडेराव धरणे, इतवारा उपविभागीय पोलीस अधिकारी सुशीलकुमार नायक, स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक उदय खंडेराय, सहाय्यक पोलीस निरीक्षक रवी वाहुळे, पोलीस उपनिरीक्षक आनंद बिचेवार आदींची यावेळी उपस्थिती होती.या प्रकरणात भाग्यनगर आणि नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संशयितांची पोलिसांना माहिती द्यावी…या प्रकरणातील दोन्ही आरोपी हे पंजाब या राज्यातून आले होते. ते नांदेडमध्ये राहत होते. खर्चायला पैसे नसल्यामुळे काय करायचे यातून मास्टरमाईंड हरदीपसिंग ढिल्लोन याच्या मार्गदर्शनाखाली सात मे रोजी काही बँकांमध्ये या दोघांनी रेकी करून रवींद्र जोशी यांना हेरले होते. त्यानंतर गोळीबाराचा हा प्रकार घडला. त्यामुळे नांदेड शहरात बाहेर राज्यातून येणाऱ्या तसेच येथे वास्तव्यास राहणाऱ्या नागरिकांची माहिती ठेवावी, काही संशयित वाटल्यास पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी यावेळी केले.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!