
नांदेड :- नांदेड लोकसभा मतदार संघासाठी २६ एप्रिल रोजी मतदान पार पडले. या मतदान प्रक्रियेची मतमोजणी ४ जून रोजी शासकीय तंत्रनिकेतन, बाबानगर येथे होणार आहे. यासाठी अद्ययावत तयारी प्रशासनाने सुरू केली असून मंगळवारी वरिष्ठ अधिकाऱ्यांची मतमोजणी व्यवस्थेसंदर्भात बैठक पार पडली.
नांदेड लोकसभा मतदारसंघात एकूण २३ उमेदवार रिंगणात होते. त्यात काँग्रेस आणि भाजपा या प्रमुख पक्षामध्ये मुख्य लढत होत आहे. वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला मिळणाऱ्या मतांकडेही लक्ष लागले आहे.नांदेड लोकसभा मतदारसंघांमध्ये समाविष्ट असलेल्या सहा विधानसभा मतदारसंघानुसार शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयातील स्ट्रॉंगरूममध्ये सध्या मतपेट्या कुलुपबंद आहेत. ज्या ठिकाणी स्ट्रॉंगरूममध्ये मतपेट्या बंद आहेत त्याच ठिकाणी मतमोजणीची वेगळी व्यवस्था करण्यात आली आहे. ही मतमोजणीची व्यवस्था करताना निवडणूक प्रक्रियेत महत्त्वाचे असणारे उमेदवार, त्यांचे प्रतिनिधी तसेच जनतेला माहिती देणारी माध्यमे यांच्या महत्त्वाच्या भूमिका व जबाबदाऱ्या असतात. त्यांच्या संदर्भातील व्यवस्थेचा मंगळवारी आढावा घेण्यात आला.
सध्या शासकीय तंत्रनिकेतन, बाबानगर येथे असणाऱ्या स्ट्रॉंग रूमसाठी त्रिस्तरीय सुरक्षा यंत्रणा तैनात आहे. प्रवेशिका व तपासणी प्रक्रियेशिवाय या ठिकाणी कोणालाही प्रवेश नाही. दर्शनी भागात सहा स्ट्रॉंग रूममधील सीसीटीव्ही कॅमेरे २४ तास सुरू आहेत. मतदान झाल्याच्या दुसऱ्या दिवसापासून या ठिकाणी सील लावण्यात आले आहेत. स्ट्रॉंग रूममध्ये कोणालाही प्रवेश नसतो. तसेच २४ तास कॅमेऱ्याच्या माध्यमातून निगराणी केली जाते.
०४ जूनला सकाळी सात वाजेपासून मतमोजणी प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. ही मतमोजणी उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधींच्या समक्ष केली जाईल. माध्यमांना याबाबत माहिती दिल्या जाते. वृत्तपत्र व वाहिन्यांद्वारे या संदर्भातील वृत्त संकलन केले जाते.
मंगळवारी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी सर्व उपाययोजनांचा आढावा घेतला. मतमोजणी ज्या ठिकाणी होणार आहे त्या ठिकाणच्या व्यवस्थेची पाहणी केली. मंगळवारी झालेल्या या बैठकीला व पाहणी दरम्यान जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अपर जिल्हाधिकारी पी.एस.बोरगांवकर, निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर, निवडणूक उपजिल्हाधिकारी राजकुमार माने, उपविभागीय अधिकारी विकास माने यांच्यासह विविध विभाग प्रमुख व सुरक्षा यंत्रणेचे अधिकारी उपस्थित होते.
दरम्यान, नांदेड लोकसभा मतदार संघाच्या निकालाची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे. काँग्रेस उमेदवार वसंतराव चव्हाण आणि भाजपाचे उमेदवार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या समर्थकांकडून आपापल्या नेत्याच्या विजयाचे दावे केले जात आहेत. नादेड लोकसभा मतदारसंघात एकूण २३ उमेदवार रिंगणात होते. त्यात काँग्रेस आणि भाजपा या प्रमुख पक्षामध्ये मुख्य लढत होत आहे. वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला मिळणाऱ्या मतांकडेही लक्ष लागले आहे.
बुधवारी दोन सत्रात मतमोजणी पर्यवेक्षक आणि सहायकांचे प्रशिक्षण…नादेड लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी ४ जून रोजी होणार आहे. या मतमोजणीच्या अनुषंगाने ईव्हीएम मतमोजणी पर्यवेक्षक आणि सहाय्यक तसेच टपाली मतमोजणीच्या अनुषंगाने दोन सत्रात प्रशिक्षण होणार आहे. या दोन्ही प्रशिक्षणासाठी जिल्ह्यातील सर्व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी आणि सर्व तहसीलदार यांची उपस्थिती राहणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे सकाळी ११ ते १२.३० वा. आणि दुपारी १२.३० ते १.३० वाजेपर्यंत हे प्रशिक्षण होणार आहे.