
नांदेड – नांदेड लोकसभेच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार आता प्रा. रवींद्र चव्हाण हे राहणार आहेत याबाबत अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे जनरल सेक्रेटरी के.सी. वेणूगोपाल यांनी नांदेड लोकसभेसाठी प्रा. रवींद्र वसंतराव चव्हाण यांना पत्राद्वारे उमेदवारी घोषित केल्याचे स्पष्ट केले आहे. काँग्रेसकडून आता उमेदवार निश्चित झाला असून भारतीय जनता पक्षाकडून नांदेड लोकसभेच्या पोटनिवडणुकीच्या रिंगणात कोण उमेदवार राहील याकडेही लक्ष लागले आहे.
लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार वसंतराव चव्हाण यांनी भाजपाचे उमेदवार प्रतापराव पाटील चिखलीकर यांचा ५९ हजार ४४२ मतांनी पराभव केला होता. मात्र काही दिवसातच त्यांचे २६ ऑगस्ट रोजी निधन झाले. त्यामुळे ही जागा रिक्त झाली होती. याबाबत निवडणूक आयोगाने १५ ऑक्टोबर रोजी नांदेड लोकसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीची घोषणा केली. त्यानंतर दोनच दिवसात काँग्रेसने नांदेड लोकसभेच्या पोटनिवडणुकीसाठी आपला उमेदवार घोषित केला आहे. दिवंगत खासदार वसंतराव चव्हाण यांचे सुपुत्र प्रा. रवींद्र चव्हाण यांना उमेदवारी दिली आहे. जिल्हा काँग्रेस कमिटीसह शहर काँग्रेस कमिटीने प्रा. रवींद्र चव्हाण यांना पोटनिवडणुकीत काँग्रेसचे उमेदवारी द्यावी, असा एकमुखी ठराव केला होता. त्याचवेळी इतर कोणीही उमेदवार राहणार नाही हेही स्पष्ट केले होते. त्यामुळे प्रा. रवींद्र चव्हाण यांच्या उमेदवारीसाठी कोणताही अडसर नव्हता. अपेक्षेप्रमाणे काँग्रेसने प्रा. चव्हाण यांची उमेदवारी घोषित केली आहे.
दुसरीकडे भारतीय जनता पार्टीकडून आता पोटनिवडणुकीसाठी उमेदवार निश्चित करण्यासाठी वेगवेगळ्या पातळीवरून चाचपणी केली जात आहे. माजी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी लोहा- कंधार विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आणि ते विधानसभेच्या निवडणुकीसाठी तयारीला लागले. प्रारंभी लोकसभेसाठी इच्छुक असलेल्या प्रतापरावांनी नंतर मात्र लोहा – कंधार विधानसभेलाच प्राधान्य देत जोमात तयारी सुरू केली आहे. त्यामुळे ते पुन्हा लोकसभेच्या रिंगणात येतील अशी परिस्थिती सध्या तरी नाही. त्यामुळे नांदेड लोकसभेच्या पोटनिवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीकडून माजी आमदार राम पाटील रातोळीकर, डॉ. संतुकराव हंबर्डे, मारोतराव कवळे गुरुजी, राजेश कुंटूरकर यांच्यासह माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या नावाची ही चर्चा सुरू आहे. यात मारोतराव कवळे गुरुजी यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मारोतराव कवळे गुरुजी हे दिल्लीत ठाण मांडून असल्याची माहितीही पुढे आली आहे. त्याचवेळी पक्षीय पातळीवरूनही मोठ्या प्रमाणात नांदेड लोकसभेसाठी चाचपणी होत आहे. या पोटनिवडणुकीत भाजपाकडून तगडा उमेदवार देण्याबाबतही हालचाली सुरू आहेत. हा तगडा उमेदवार नेमका कोण असेल हे लवकरच स्पष्ट होणार आहे. माजी मुख्यमंत्री तथा राज्यसभेचे विद्यमान खासदार अशोकराव चव्हाण यांनाही लोकसभा पोटनवडणुकी रिंगणात उतरविले जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराबाबत अजूनही सस्पेन्स कायमच आहे.
प्रारंभी लोकसभा पोटनिवडणुकीसाठी अनेक उमेदवारांनी भाजपाकडून इच्छुक असल्याचे शक्तीप्रदर्शनाद्वारे स्पष्ट केले होते. मात्र मागच्या महिनाभरापासून लोकसभेसाठी कुणीही दावेदारी करत नसल्याचे दिसत आहे. एकीकडे नांदेड लोकसभेची पोटनिवडणूक ही विधानसभेसोबत होणार नाही, अशी शक्यता भाजपच्या गोटातून व्यक्त केली जात होती. विधानसभेसोबत नांदेड लोकसभेची पोटनिवडणूक होणे म्हणजे सहानुभूतीचा फटका बसणे असाच अर्थ घेतला जात होता. त्यामुळे ही निवडणूक स्वतंत्रपणे व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. याच अनुषंगाने इच्छुक उमेदवारांनी गेल्या महिनाभरात कोणत्याही हालचाली केल्या नव्हत्या. मात्र भारत निवडणूक आयोगाने नांदेडची पोटनिवडणूक विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसोबतच घेतली जाईल असे स्पष्ट केले. त्यामुळे आता भारतीय जनता पक्षाकडून मोठ्या प्रमाणात हालचालींना वेग आला आहे. त्यात आता काँग्रेसने उमेदवारी घोषित केली असल्याने भाजपालाही लवकरच आपला उमेदवार रिंगणात उतरवावा लागणार आहे. त्यामुळे आता भारतीय जनता पक्ष या पोटनिवडणुकीत कोणाच्या गळ्यात उमेदवारीची माळ घालेल याकडेही लक्ष लागले आहे. भाजप या पोटनिवडणुकीसाठी तगड्या उमेदवाराच्या शोधात आहे हे मात्र निश्चित…