प्रशासकीय

नांदेडमध्ये मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानासाठी २४९ बसची व्यवस्था 

विविध पथदर्शी योजनांच्या लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात लाभाचे वितरण केले जाणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लाभार्थ्यांशी हितगुजही साधणार 

नांदेड – राज्यात महिला सक्षमीकरणासाठी राज्य शासनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसह अनेक पथदर्शी योजना सुरू केल्या आहेत. या योजनांच्या अंमलबजावणीतून महिला सक्षमीकरणावर भर देण्यात येत आहे.  या योजनेतील लाभार्थी महिलांचा उत्साह वाढवण्यासाठी १० ऑक्टोबर रोजी नांदेडमध्ये भव्य महिला मेळावा होत आहे. या मेळाव्यासाठी जिल्हा प्रशासनाने २४९ बसेसची व्यवस्था केली आहे. यासाठी नांदेड शहरात दोन स्वतंत्र वाहनतळांची व्यवस्थाही करण्यात आली आहे.

नांदेड येथील नवा मोंढा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मैदानावर होणाऱ्या या कार्यक्रमास राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. या कार्यक्रमास माजी मुख्यमंत्री, खा. अशोकराव चव्हाण, बाळासाहेब ठाकरे हरिद्रा संशोधन व प्रशिक्षण केंद्राचे अध्यक्ष हेमंत पाटील, खा.डॉ. अजित गोपछडे, खा. नागेश पाटील अष्टीकर, खा. डॉ. शिवाजी काळगे, आ. सतीश चव्हाण, आ. विक्रम काळे, आ. बालाजी कल्याणकर, आ. भीमराव केराम, आ. माधवराव पवार, आ. डॉ. तुषार राठोड, आ. श्यामसुंदर शिंदे, आ. मोहनराव हंबर्डे, आ. राजेश पवार, विभागीय आयुक्त दिलीप गावडे, नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांचीही उपस्थिती असणार आहे. मुख्यमंत्री महिला सशक्तिकरण कार्यक्रमाची सुरुवात राजमाता गोमाता पूजनाने केली जाणार आहे. त्यानंतर लखपती दीदी व इतर स्टॉलचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते होईल. मुख्यमंत्री व इतर मान्यवर लाभर्थ्यांशी हितगुजही साधणार आहेत. यावेळी पोलीस बँडवर राज्य गीत सादर करण्यात येईल. त्याच वेळी विविध योजनांच्या लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात लाभ वितरण करण्यात येणार आहे.
मुख्यमंत्री महिला सशक्तिकरण कार्यक्रमासाठी प्रशासनाच्या वतीने सूक्ष्म नियोजन करण्यात आले आहे. तालुक्याच्या ठिकाणावरून प्रत्येक योजनेचे लाभार्थी व नागरिक मोठ्या संख्येने येणार असून नागरिकांसाठी भव्य मंडप व्यवस्थाही करण्यात आली आहे.

शहरात दोन स्वतंत्र वाहन तळ राहणार… मुख्यमंत्री महिला सशक्तिकरण अभियान कार्यक्रमासाठी प्रत्येक तालुक्यातून विविध योजनांचे लाभार्थी व नागरिक यांची मोठ्या संख्येने उपस्थिती राहणार आहे. त्यासाठी प्रशासनाच्या वतीने २४९ बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे. या बसेससाठी नांदेड शहरात दोन स्वतंत्र वाहनतळाची व्यवस्था करण्यात आली आहे. नांदेड शहरातील शासकीय तंत्रनिकेतन मैदानावर नांदेड महापालिका, नांदेड, अर्धापूर, भोकर, मुदखेड, हिमायतनगर या तालुक्यासाठी १७० बसेसच्या वाहनतळाची व्यवस्था करण्यात आली आहे. तर यशवंत महाविद्यालयाच्या मैदानावर हदगाव, नायगाव, बिलोली, उमरी, धर्माबाद, मुखेड, देगलूर, कंधार व लोहा या तालुक्यासाठी १२९ बसच्या पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. नांदेड येथील वाहतुकीला कोणताही अडथळा होऊ नये यासाठीही नियोजन करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!