नांदेड – जिल्ह्यात मान्सूनची सुरुवात चांगली झाली असली तरीही त्यानंतर पावसाने घेतलेल्या विश्रांतीमुळे बळीराजा चिंताक्रांत झाला असून जिल्ह्यात सर्वत्र खरिपाच्या पेरण्या रखडल्या आहेत. पावसाच्या विश्वासावर होणाऱ्या खरीप पेरण्या करण्यासाठी बळीराजांनी घाई करू नये ९० ते १०० मिलिमीटर पाऊस झाल्यानंतरच जमिनीत पेरणी योग्य ओल तयार होते. त्यानंतरच पेरण्या कराव्यात असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे.
जिल्ह्यात आजघडीला ७९.३० मिलिमीटर पाऊस झाला आहे. यामध्ये सर्वाधिक पाऊस मुखेड तालुक्यात झाला असून येथे १२८.४० मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे. त्याखालोखाल लोहा तालुक्यात ११३.३०, कंधार तालुक्यात १११.६० मिमी आणि मुदखेड तालुक्यात १००.८० असा पेरणी योग्य पाऊस झाला आहे. जिल्ह्यातील इतर तालुक्यांमध्ये मात्र पावसाची अद्यापही प्रतीक्षाच केली जात आहे. नांदेड तालुक्यात ७१.१० मिमी, बिलोली ७९.७०, हदगाव ६७, भोकर ५४.५०, देगलूर ७९.५०, किनवट ८०.३०, हिमायतनगर ३४.३०, माहूर ५५.३०, धर्माबाद ५७, उमरी ३५.९० मिमी, अर्धापूर ९१.८० मिमी आणि नायगाव तालुक्यात ४१.८० मिलिमीटर पाऊस झाला आहे.
जिल्ह्यात सर्वात कमी ३४.७० मिलिमीटर पावसाची नोंद हिमायतनगर तालुक्यात झाली आहे. त्याखालोखाल उमरी तालुक्यात ३५.९० मिमी आणि नायगाव तालुक्यात ४१.७० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात एक जून ते ३१ ऑक्टोबरपर्यंत सरासरी वार्षिक पाऊस हा ८९१.३० मिलिमीटर अपेक्षित आहे. आतापर्यंत सरासरी १०३.६० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.
जिल्ह्यात खरीप हंगामात जवळपास ८ लाख ५० हजार हेक्टरहून अधिक क्षेत्रात खरिपाची पेरणी होईल, अशी आशा केली जात आहे. सर्वाधिक क्षेत्र हे सोयाबीन या नगदी पिकाचे राहणार आहे. शेतकऱ्यांनी खरीप पेरणीसाठी मशागत पूर्ण केली आहे. आता पावसाची प्रतीक्षा केली जात आहे. सोयाबीन पाठोपाठ जिल्ह्यात २० लाख हेक्टर क्षेत्रात कापूस पिकाची लागवड होणार आहे. तुर पिक ७० हजार हेक्टर क्षेत्रावर, ज्वारी २० हजार, उडीद २२ हजार हेक्टर क्षेत्रात पेरणी होईल अशी अपेक्षा आहे. मात्र पावसाने दिलेल्या विश्रांतीमुळे आता उडीद आणि मूग पिकाचा पेरा घटण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. जिल्ह्यात ऊस, हळद, केळी आणि इतर भाजीपाला ही फळपिकेही लक्षात घेता जिल्ह्यात साडेआठ लाखाहून अधिक हेक्टर क्षेत्रात पेरणी अपेक्षित आहे.
जिल्ह्यात केवळ पाच टक्के पेरण्या…सात जूनला मृग नक्षत्रात चांगला पाऊस झाला. त्यामुळे मृगाची चांगली सुरुवात अपेक्षित होती. मात्र पुढे पावसाने खंड दिल्याने पेरण्या खोळंबल्या आहेत. आतापर्यंत खरिपाच्या केवळ पाच टक्के पेरण्या जिल्ह्यात पूर्ण झाल्याची माहिती जिल्हा कृषी विभागाने दिली आहे. जिल्ह्यात काही तालुक्यात चांगला पाऊस झाल्याने पेरण्या सुरू होत आहेत. परंतु ज्या तालुक्यात ७५ ते ८० मिलिमीटर पाऊस झाला नसेल तेथे शेतकऱ्यांनी पेरण्या करू नये असे आवाहनही करण्यात आले आहे. पेरणी करण्याच्या पूर्वी बियाणांची उगवण क्षमताही तपासण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान, गुरुवारी रात्री नांदेडसह कंधार, हिमायतनगर, माहूर आदी तालुक्यात दमदार पाऊस झाला. या पावसाची प्रतीक्षा गेल्या दहा-बारा दिवसापासून केली जात होती. पावसासाभावी खोळंबलेल्या खरीप पेरण्यांना आता गती येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या पावसाने बळीराजा सुखावला आहे.