नांदेड जिल्हा

नांदेड जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी पतसंस्था निवडणूक संशयाच्या भोवऱ्यात ..!

सर्वसाधारण प्रवर्गातील उमेदवारांची फेर मतमोजणी सुरू, संपूर्ण निवडणूक प्रक्रियाच रद्द करण्याची बाबुराव पुजरवाड यांची मागणी

नांदेड – नांदेड जिल्हा परिषद कर्मचारी पतसंस्थेच्या अटीतटीच्या निवडणुकीत आता संशय वाढला आहे. रविवारी होत असलेल्या मतमोजणी दरम्यान काही बॅलेट पेपरवर एका उमेदवाराचे नावच नसल्याची बाब पुढे आली आहे. या बाबीस पुजरवाड गटाने आक्षेप घेतला असून पुन्हा मतमोजणी करण्याची मागणी केली आहे. आता सर्वसाधारण गटातील उमेदवारांची फेर मतमोजणी केली जात आहे. मात्र एकूणच मतमोजणीची आणि निवडणुकीची प्रक्रियाच आता संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे.

नांदेड जिल्हा परिषद कर्मचारी पतसंस्थेच्या निवडणूक प्रक्रियेत १५ संचालक पदासाठी शनिवारी मतदान पार पडले. यामध्ये ९७ टक्के मतदान झाले. या निवडणुकीत बाबुराव पुजरवाड, अविनाश देशमुख पॅनल विरुद्ध महारुद्र पॅनलमध्ये लढत झाली. एक अपक्ष उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरला आहे. मतदानानंतर रविवारी सकाळी ८ वाजता जिल्हा उपनिबंधक सहकारी कार्यालयात मतमोजणी सुरू झाली. या मतमोजणीत महारुद्र पॅनलचे नऊ उमेदवार विजयी घोषित करण्यात आले तर बाबुराव पुजरवाड, अविनाश देशमुख पॅनलचे ६ उमेदवार विजयी झाल्याचे सांगण्यात आले होते. एका उमेदवाराचा विजय टॉसवर झाला.

या मतमोजणी दरम्यान बाबुराव पुजरवाड, अविनाश देशमुख पॅनलच्या मतमोजणी प्रतिनिधींनी घेतलेल्या आक्षेपात काही बॅलेट पेपरवर २० उमेदवारांचीच नावे आढळून आली. प्रत्यक्षात या निवडणुकीत रिंगणात असलेल्या उमेदवारांची संख्या २१ अशी होती; मात्र एका उमेदवाराचे नाव या ५० बॅलेट पेपरवर नसल्याने या निवडणुकीबाबत थेट आक्षेप नोंदवण्यात आला आणि सर्वसाधारण गटातील सर्वच उमेदवारांची फेर मतमोजणी करावी अशी मागणी करण्यात आली. ही मागणी निवडणूक निर्णय अधिकारी योगेशकुमार बाकरे यांनी मंजूर केली आणि फेर मतमोजणीला पुन्हा प्रारंभ झाला आहे.

बॅलेट पेपरवर नाव नसलेला उमेदवार झाला विजयी..! या निवडणुकीत काही बॅलेट पेपरवर रमेश मुपडे या उमेदवाराचे नावच नव्हते. असे असतानाही सदरील उमेदवार विजयी झाल्याची बाबही पुढे आली आहे. त्यामुळे ही निवडणूक प्रक्रिया आता रद्दच करावी अशी मागणी बाबुराव पुजरवाड, अविनाश देशमुख पॅनलचे नेते बाबुराव पुजरवाड यांनी केली आहे. अशा संशयी वातावरणात झालेली निवडणूक पारदर्शक कशी होईल असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे. या निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया रद्द करावी अन्यथा न्यायालयात धाव घेतली जाईल, असा इशारा पुजरवाड यांनी दिला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!