प्रशासकीय

नांदेड जिल्ह्यात विधानसभा निवडणुकांचे पडघम सुरू 

मतदार याद्यांचा दुसरा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम सुरू, २० ऑगस्ट रोजी प्रसिद्ध होणार अंतिम मतदार यादी

नांदेड – जिल्ह्यात विधानसभा निवडणुकांचे पडघम सुरू झाले आहेत प्रशासकीय पातळीवर आता आज २५ जूनपासून मतदार याद्यांचा दुसरा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम सुरू झाला आहे. २५ जुलै रोजी विधानसभा निवडणुकीसाठी प्रारूप निवडणूक यादी तयार होणार आहे. ९ ऑगस्टपर्यंत या यादीमध्ये मतदारांना आपले नाव समाविष्ट करणे दुरुस्त करणे वगळणे आदी बाबी करता येणार आहेत. नागरिकांनी या संधीचा फायदा घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे. २० ऑगस्ट रोजी जिल्ह्यातील नऊ विधानसभा मतदार सघासाठी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे.

मतदार यादीमध्ये आपले नाव नाही, आपले नाव व्यवस्थित नाही, छायाचित्र नाही, आपल्या नगरातील मृत व्यक्तींची नावे आहेत, चुकीची नावे आहेत अशा अनेक तक्रारी मतदानाच्या दिवशी केल्या जातात. मात्र या सर्व बाबींवर मात करण्याची संधी आता येणाऱ्या निवडणुकांसाठी भारत निवडणूक आयोगांनी मतदारांना दिली आहे. २५ जूनपासून मतदान पुनरिक्षण कार्यक्रम नांदेड जिल्ह्यात सुरू झाला आहे.

भारत निवडणूक आयोगाने आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणूक विचारात घेऊन दि. १ जुलै २०२४ या अर्हता दिनांकावर आधारित मतदार याद्यांचा दुसरा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम (Special Summary Revision) घोषित केला आहे. २५ जुलै रोजी जिल्ह्यामध्ये आगामी विधानसभा निवडणुकीसाठी प्रारूप निवडणूक यादी तयार होणार आहे. २५ जुलैला ही यादी तपासून आपली नावे समाविष्ट करता येणार आहेत. कमी करता येणार आहेत किंवा नावांमध्ये सुधारणा करता येणार आहे. ९ ऑगस्टपर्यंत यासाठी निवडणूक आयोगाने वेळ दिला आहे. या कालावधीतच नागरिकांनी जागरूकतेने हे काम पार पाडणे आवश्यक आहे. प्रत्येक तहसील कार्यालयामध्ये ही यादी दर्शनी भागात लावली जाणार आहे.

मतदार याद्यांचा दुसरा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत २५ जून ते २४ जुलै २४ या कालावधीत मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्याकडे नमुना-६, नमुना-७, नमुना-८ चे अर्ज उपलब्ध होतील. दिनांक २ जुलै २०२४ रोजी १८ वर्षे पूर्ण होणारे सर्व नागरिक मतदार यादीत नवीन नाव नोंदणीसाठी नमुना ६ मध्ये अर्ज करु शकतील. दिनांक २५ जुलै २०२४ रोजी प्रसिध्द होणाऱ्या प्रारुप मतदार यादीमधील नावांबाबत आक्षेप नोंदविण्यास अथवा नाव कमी करण्यासाठी नमुना ७ मध्ये अर्ज करता येईल. मतदार यादीमधील मतदारांच्याा तपशीलात दुरुस्ती करण्यासाठी, एकाच मतदारसंघात एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरीत झाल्यास, मतदान ओळखपत्र बदलून मिळण्यासाठी तसेच दिव्यांग व्यक्तींना चिन्हांकित करणे इत्यादीकरीता नमुना ८ मध्येच अर्ज करता येईल. Voter Portal, Voter Helpline App या ऑनलाईन पध्द्तीचा वापर करुन मतदार स्वत: नोंदणी, वगळणी, स्थलांतरण, दुरुस्ती‍ इत्यादी करु शकतात. नांदेड जिल्ह्यात सर्व तहसिल कार्यालयात ऑफलाइन पद्धतीने अर्ज सादर केला जाऊ शकतो.

मतदानाच्या दिवशी आपल्या नावाबद्दल तक्रार अनेक जण करतात. तथापि, लोकशाहीमध्ये आवश्यक असणाऱ्या या अभियानात मतदार तसेच राजकीय क्षेत्रातील कार्यकर्त्यांनी सहभागी व्हावे.या सर्व तारखांवर लक्ष ठेवून योग्य नोंदणीसाठी सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

असा आहे संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम… आर्हता दिनांकावर आधारित पुरवणी व एकत्रित प्रारुप यादी तयार करण्याचा कालावधी २५ जून ते २४ जुलै २०२४ असा आहे. पुनरिक्षण उपक्रमांतर्गत २५ जुलै २०२४ रोजी एकत्रिकृत प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध करणे, २५ जुलै ते ९ ऑगस्टपर्यंत दावे व हरकती स्वीकारण्याचा कालावधी आणि ९ ऑगस्ट २०२४ रोजी विशेष मोहिमांचा कालावधी राहणार आहे. दावे व हरकती स्वीकारण्याच्या कालावधीत राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी यांनी निश्चित केलेले दोन शनिवार व रविवार, दावे व हरकती निकालात काढणे, अंतिम प्रसिद्धीसाठी आयोगाची परवानगी मागणे, डाटाबेस अद्ययावत करणे, पुरवणी याद्यांची छपाई करणे यासाठी १९ ऑगस्ट २०२४ पर्यंत आणि मतदार यादीची अंतिम प्रसिद्धी २० ऑगस्ट २०२४ रोजी केली जाणार आहे.

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!