प्रशासकीय

नांदेडचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. महावरकर यांची कॅटमध्ये धाव

नूतन उपमहानिरीक्षक शहाजी उमाप वेटिंगवरच..!

नांदेड – नांदेड पोलीस परिक्षेत्राचे विशेष पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांनी आताच पदभार स्वीकारू नयेत, असे आदेश केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरणाने दिले आहेत. विशेष म्हणजे हे आदेश ११ जुलै रोजी ‘कॅट’ने दिलेले असताना या आदेशाबाबत कोणतीही माहिती उमाप यांना प्राप्त झाली नव्हती. त्यामुळे ते शुक्रवारी आपला पदभार स्वीकारण्यासाठी मुंबईहून नांदेडमध्ये दाखल झाले आहेत. आता कॅटच्या आदेशामुळे उमाप हे वेटिंगवरच आहेत.

नांदेड पोलीस परिक्षेत्राचे नवे उपमहानिरीक्षक म्हणून बृहन्मुंबईच्या विशेष शाखेचे अप्पर पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांची पदोन्नतीने ९ जुलै रोजी नियुक्ती करण्यात आली होती. तर विद्यमान पोलीस महानिरीक्षक डॉ. शशिकांत महावरकर यांची पुणे येथे अन्वेषण विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक म्हणून बदली करण्यात आली होती. मात्र डॉ. महावरकर यांनी आपली बदली विहित  कार्यकाळापेक्षा आधीच झाल्यामुळे केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरणाकडे (‘कॅट’कडे) धाव घेतली होती. यावर केंद्रीय प्रशासकीय न्यायाधीकरणाने ११ जुलै रोजी निर्णय देताना नवे पोलीस उपमहानिरीक्षक उमाप यांनी आताच रुजू होऊ नये असे आदेश दिले आहेत. १९ जुलै रोजी याप्रकरणी सुनावणी होणार आहे. त्यामुळे १९ जुलैपर्यंत तरी उमाप यांना वेटिंगवरच राहावे लागणार आहे.

नांदेडमध्ये जवळपास वर्षभरापूर्वी विशेष पोलीस उपमहानिरीक्षक म्हणून डॉ. महावरकर रुजू झाले होते. त्यांचा नांदेडमध्ये जवळपास १६ महिने कार्यकाळ होत आहे. जवळपास दोन ते अडीच वर्षानंतर बदली व्हावी असे प्रशासकीय संकेत आहेत. मात्र मुदतीपूर्वीच बदली होत असल्याचे कारण देत डॉ. महावरकर यांनी केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरणाकडे दाद मागितली. डॉ. महावरकर यांच्या अपिलावर सुनावणीसाठी ‘कॅट’ने १९ जुलै रोजी वेळ दिली आहे. त्यामुळे आता १९ जुलै रोजी होणाऱ्या सुनावणीत नेमका आदेश काय दिला जाईल याकडे लक्ष लागले आहे. सध्या तरी नांदेड परिक्षेत्राच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी  डॉ. महावरकर हेच राहतील हे स्पष्ट झाले आहे.

दुसरीकडे बृहन्मुंबई विशेष शाखेचे अपर पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांनी मुंबईतील आपला पदभार सोडून नवा पदभार स्वीकारण्यासाठी शुक्रवारी नांदेड गाठले होते. मात्र ‘कॅट’च्या ११ जुलै रोजीच्या आदेशाची संपूर्ण प्रत त्यांना नांदेडमध्ये आल्यावर मिळाली. त्यामुळे त्यांनी पदभार स्वीकारला नाही.  १९ जुलैच्या सुनावणीनंतर या विषयावर आता स्पष्टता येईल.

शासकीय विश्रामगृहावर शहाजी उमाप यांच्या  स्वागताचे सत्र रात्री उशिरापर्यंत सुरूच… शहाजी उमाप हे नांदेडला आल्यानंतर नांदेड पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अप्पर पोलीस अधीक्षक अबिनाशकुमार, उपविभागीय पोलीस अधिकारी सुशीलकुमार नायक यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांची भेट घेऊन नांदेडमध्ये स्वागत केले. रात्री उशिरापर्यंत त्यांच्या स्वागताचे सत्र नांदेड येथील शासकीय विश्रामगृहावर सुरूच होते. नांदेड जिल्ह्यात शहाजी उमाप यांचा अप्पर पोलीस अधीक्षक आणि पोलीस अधीक्षक  पदाचा यशस्वी कार्यकाळ राहिला होता. त्यांच्याच कार्यकाळात नांदेड जिल्ह्याने महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियानात राज्यात पहिला क्रमांक मिळवला होता. दुसरीकडे जिल्ह्यात गुन्हेगारांवर हे त्यांचा चांगलाच वचक होता. उमाप हे नांदेड जिल्ह्यात जेवढे कार्यकठोर अधिकारी म्हणून ओळखले जायचे तितकेच ते जनतेमध्येही लोकप्रिय होते. त्यांच्या नांदेड पोलीस परिक्षेत्राच्या उपमहानिरीक्षक पदाच्या निवडीचे नांदेडसह लातूर, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यातही उत्स्फूर्तपणे स्वागत झाले होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!