क्राईम

नांदेडातील ‘हॉटेल मिंट’मध्ये पोलिसांची धाड, लाखो रुपये जप्त, दोघांना घेतले ताब्यात

नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघातील उमेदवाराशी संबंधित हॉटेलमध्ये पोलिसांची कारवाई, प्रचाराच्या अंतिम टप्प्यात पोलीस विभागही ॲक्शन मोडवर

नांदेड – विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत अंतिम टप्प्यात मुख्यमंत्र्यांचे लाडके आमदार म्हणून गणले जात असलेल्या शिवसेनेचे उमेदवार बालाजी कल्याणकर यांना निवडणूक रिंगणात आव्हान दिलेल्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उमेदवार यांच्या भागीदारीत असलेल्या शहरातील ‘हॉटेल मिंट’ येथे पोलिसांनी शुक्रवारी सायंकाळी धाड टाकून लाखोंची रोख रक्कम जप्त केली आहे. यात दोघांना ताब्यात घेतले असून या रकमेची चौकशी केली जात आहे. विधानसभा निवडणुकीचा प्रचार संपण्याच्या तीन दिवसाआधी ही कारवाई केल्याने एकच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे शुक्रवारीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची कल्याणकर यांच्या समर्थनार्थ याच भागात प्रचार सभाही झाली होती. मुख्यमंत्र्यांनी दुपारी नांदेड सोडल्यानंतर काही तासांतच ही कारवाई झाली हेही विशेष.

पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी निवडणूक काळात शहरातील व परिसरातील पेट्रोलिंगमध्ये वाढ केली आहे. वाहनांची तपासणी होत आहे. तसेच हॉटेल, लॉज असे तपासले जात आहेत. अवैधरित्या पैसे बाळगणाऱ्या व्यक्तीवर कारवाई करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. निवडणुकीच्या अनुषंगाने १५ नोव्हेंबर रोजी भाग्यनगर पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक विनोद देशमुख, पोलीस उपनिरीक्षक नरेश वाडेवाले, पोहेकॉ नागेश वाडियार, पोहेकॉ. प्रदीप गर्दनमारे, मारुती मुसळे, पोकॉ सुरेश हसे हे तपासणी करत असताना सायंकाळी साडे सातच्या सुमारास छत्रपती चौकातील हॉटेल मिंट येथील स्वागत कक्षात दोन व्यक्ती संशयितरित्या बसलेल्या आढळल्या. त्यांची पंचासमक्ष तपासणी केली असता त्यांच्या ताब्यात एकूण १ लाख ३० हजार रुपये अशी रोख रक्कम सापडली. सदर रक्कम कशाची आहे याबाबत दोन्ही व्यक्तींना विचारले असता ते समाधानकारक उत्तर देऊ शकले नाहीत. म्हणून ही रक्कम पंचासमक्ष जप्त करून निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे जमा केली आहे. या कारवाईबाबत एफएसटी, आयटी इत्यादी संबंधित विभागांना सुचित केले आहे तसेच निवडणूक आयोगाच्या पीएस आणि इएसएमएस पोर्टलमध्ये सदर रकमेच्या जप्तीची नोंद करण्यात आली आहे. या रकमेबाबत अधिक चौकशी सुरू आहे.
पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांच्यासह अपर पोलीस अधीक्षक खंडेराय धरणे, सुरज गुरव, सहायक पोलीस अधीक्षक सीएम किरितिका यांच्या मार्गदर्शनाखाली भाग्यनगरचे पोलीस निरीक्षक रामदास शेंडगे यांच्या पथकाने ही कारवाई केली. या कारवाईबद्दल पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी त्यांचे कौतुक केले.
विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला अवघे तीन दिवस उरले आहेत. त्यामुळे प्रचाराला वेग आला आहे. वेगवेगळ्या पक्षांचे बडे नेते, स्टार प्रचारक नांदेडमध्ये प्रचारसभा घेत आहेत. कॉर्नर सभांवरही मोठ्या प्रमाणात जोर दिला जात आहे. नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघात लक्षवेधी लढत होत आहे. शिंदे गटाचे विद्यमान आमदार बालाजी कल्याणकर पुन्हा एकदा रिंगणात उतरले असून त्यांच्या विरोधात काँग्रेसचे अब्दुल सत्तार यांच्यासह उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेकडून संगीता पाटील डक यांना उमेदवारी दिली आहे. या मतदारसंघात सर्वाधिक ३३ उमेदवार आहेत मात्र प्रमुख लढत ही शिंदे गटाचे कल्याणकर यांच्यासह काँग्रेसचे अब्दुल सत्तार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या संगीता पाटील डक आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रशांत इंगोले यांच्यामध्ये होत आहे.

विधानसभा निवडणूक काळात गैरप्रकार रोखण्यासाठी पोलिसांकडून विविध उपायोजना केल्या जात आहेत. खबरदारी म्हणून वेगवेगळ्या वाहनांची तपासणी केली जात आहे. पोलिसांनी आतापर्यंत तीस लाखाहून अधिक रोख रक्कम पकडली असून त्या रकमेची चौकशी सुरू आहे. प्रचाराच्या अंतिम टप्प्यात पोलीस अधिक खबरदारी घेणार आहेत कुठेही अनुचित प्रकार होऊ नये त्याचवेळी निवडणुका पारदर्शी वातावरणात व्हाव्यात यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत पोलीस दल त्या दृष्टीने वेगवेगळ्या उपाययोजना करीत आहे. नागरिकांनीही निवडणूक काळात जिल्ह्यात कुठेही असे अनुचित प्रकार होत असल्यास पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!