नांदेड : ‘वाढवू तिरंग्याची शान.. करू राष्ट्रासाठी मतदान’, ‘मतदार राजा जागा हो.. लोकशाहीचा धागा हो’, ‘वोट करेगा वोट करेगा.. सारा नांदेड वोट करेगा’ अशा विविध फलक व घोषणांनी मतदार जागृतीसाठी १६ नोव्हेंबर रोजी काढण्यात आलेल्या सायकल व मोटरसायकल रॅलीला नांदेडकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या रॅलीमध्ये जवळपास ५० सायकल व ५०० मोटरसायकल बाईक सहभागी होत्या.
मतदानाच्या टक्केवारीत वाढ करण्यासाठी, लोकशाही समृद्ध व बळकट करण्याकरिता निवडणूक आयोगातर्फे विविध उपक्रम राबविले जात आहेत. जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी अभिजीत राऊत व जिल्हास्तरीय स्वीप कक्षाच्या नोडल अधिकारी तथा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल यांच्या संकल्पनेतून ‘स्वीप’अंतर्गत भव्य सायकल व मोटरसायकल रॅली काढण्यात आली.
जुना मोंढा टॉवर परिसरातून महापालिका आयुक्तांच्या शुभहस्ते हिरवी झेंडी दाखवून रॅली ची सुरुवात झाली. पुढे महावीर चौक – वजीराबाद मुथा चौक – कला मंदिर – शिवाजीनगर – आयटीआय कॉर्नर – श्रीनगर – वर्कशॉप कॉर्नर मार्गे – भाग्यनगर – आनंदनगर – नागार्जुना हॉटेल कॉर्नर – लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौक – यात्री निवास – चिखलवाडी कॉर्नर मार्गे जिल्हाधिकारी कार्यालय येथे पोहचून सर्व सहभागी व्यक्तींनी मतदानाची शपथ घेतली व रॅलीचा समारोप झाला. या रॅलीत अधिकारी कर्मचाऱ्यांसह विविध मान्यवर नागरिक, विद्यार्थी, महिला व सामाजिक संघटनांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. यावेळी मतदानाबाबत विविध फलक व घोषणाद्वारे जनजागृती करण्यात आली. या रॅलीच्या यशस्वीतेसाठी जिल्हा परिषदेचे प्रलोभ कुलकर्णी, महानगरपालिकेचे वरिष्ठ सहाय्यक साईराज मुदिराज, स्विप कक्षाचे सुनील मुत्तेपवार, माणिक भोसले, सारिका आचमे यांनी परिश्रम घेतले.
या जनजागृती रॅलीस महानगरपालिकेचे आयुक्त तथा जिल्हास्तरीय स्वीप कक्षाचे अतिरिक्त नोडल अधिकारी डॉ.महेशकुमार डोईफोडे, उपायुक्त अजितपालसिंघ संधू, संजय जाधव, जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी माध्यमिक माधव सलगर, शिक्षणाधिकारी प्राथमिक सविता बिरगे, शिक्षणाधिकारी योजना दिलीपकुमार बनसोडे, महानगरपालिकेचे शिक्षण अधिकारी व्यंकटेश चौधरी, महापालिकेचे कार्यकारी अभियंता संघरत्न सोनसळे, सहाय्यक आयुक्त डॉ.मिर्झा फरहतउल्ला बेग, सदाशिव पतंगे, नांदेड दक्षिण मतदारसंघ स्वीप कक्षाचे प्रमुख रुस्तुम आडे, अग्निशमन अधिकारी केरोजी दासरे, एस.जी.जी.एस. अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य, प्रादेशिक परिवहन विभागाचे अधिकारी यांच्यासह नांदेड लॉयन्स क्लब, रोटरी क्लब व नांदेड सायकलिस्ट ग्रुपचे सदस्य उपस्थित होते.