नांदेड – जातीसाठी किंवा आरक्षणासाठी देशाची विभागणी करु नका. आपण सर्व भारतीय आहोत, ही भावना मनात घेऊन देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची साथ देण्यासाठी भाजपचे लोकसभेचे उमेदवार संतुकराव हंबर्डे आणि भोकर विधानसभेच्या उमेदवार ॲड. श्रीजया चव्हाण यांना विजयी करा, असे आवाहन आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री तथा सिनेस्टार पवन कल्याण यांनी शनिवारी केले.
लोकसभा पोटनिवडणुकीतील भाजप उमेदवार संतुकराव हंबर्डे आणि भोकर विधानसभेच्या उमेदवार ॲड. श्रीजया चव्हाण यांच्या प्रचारार्थ भोकर तालुक्यातील पाळज येथे १६ नोव्हेंबर रोजी महायुतीची प्रचार सभा घेण्यात आली. त्यावेळी पवन कल्याण बोलत होते. मंचावर माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण, माजी आमदार अमिता चव्हाण, अमरनाथ राजूरकर, प्रवीण गायकवाड, जगदीश भोसीकर, किशोर लगळूदकर, गणेश कापसे, राजेश्वर देशमुख, नामदेव आयलवाड यांच्यासह महायुतीचे उमेदवार आणि पदाधिकारी हजर होते.
पवन कल्याण म्हणाले, महाराष्ट्र थोर संत व विरांची भूमी आहे. छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, माता जिजाऊ, सावित्रीबाई यांना अभिवादन करण्यासाठी मी या भूमीत आलो आहे. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे हे माझे आदर्श आहेत. देशातील एनडीए सरकारच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाचे नाव उज्ज्वल करीत आहेत. अर्थ व्यवस्थेत मागील दहा वर्षात जगात पाचव्या क्रमांकावर देश आला असून, लोककल्याणाच्या अनेक योजना राबवित आहेत. महाराष्ट्रातही महायुतीच्या सरकारने महिला व युवकांसाठी विविध कल्याणकारी योजना सुरू केल्या आहेत. केंद्र व राज्यातील सरकारच्या समन्वयासाठी महायुतीच्या दोन्ही उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन त्यांनी केले. तेलुगु, हिंदी आणि मराठी अशा विविध भाषेतून पवन कल्याण यांनी यावेळी संवाद साधला.
संविधान बदलाचा विरोधकांचा अपप्रचार हाणून पाडा – खा. अशोकराव चव्हाण… लोकसभा निवडणुकीत विरोधकांनी संविधान बदलणार असा अपप्रचार केला. तोच उद्योग ते आताही करीत आहेत. विरोधकांचा हा डाव हाणून पाडा. केंद्रात पंतप्रधान मोदींचे सरकार आहे. त्यांना साथ देण्यासाठी लोकसभेचे उमेदवार संतुकराव हंबर्डे तसेच सुशिक्षित आणि अनेक भाषांची जाण असलेल्या ॲड. श्रीजया चव्हाण यांना विजयी करा. काॅंग्रेसचे सरकार असलेल्या देशातील अनेक राज्यातील योजना बंद होत आहेत. मात्र महाराष्ट्रात महायुतीच्या सरकारच्या योजना चालूच राहणार आहेत. अशी ग्वाही देवून महायुतीला साथ देण्याचे आवाहन माजी मुख्यमंत्री खा. चव्हाण यांनी यावेळी केले. तालुक्यातील विकासाचा ओघ कायम सुरू ठेवण्यासाठी चव्हाण घराण्यातील पिढीचा वारसदार म्हणून मी आजोबाच्या आणि वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून मतदार संघाचा विकास करण्यास कटिबद्ध आहे. मला आपली मुलगी म्हणून आशीर्वाद देऊन आपली सेवा करण्याची संधी द्या असे आवाहन ॲड. श्रीजया चव्हाण यांनी केले.