क्राईम

नांदेड तहसीलपाठोपाठ नांदेड ग्रामीणचाही वाळू माफीयांना दणका, एक कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त 

विष्णूपुरीतील शिवाजी हंबर्डे, बालाजी हंबर्डेसह दहा मालक आणि नऊ बिहार, उत्तर प्रदेशच्या मजुराविरुद्ध गुन्हा दाखल, ड्रोन कॅमेराने शोधले शेतात लपलेले मजूर आणि लपवलेले पंपही

नांदेड – नांदेड जिल्ह्यात महसूल विभागाच्या कुचकामी धोरणामुळे वाळूमाफिया मोकाट सुटले आहेत. या मोकाट सुटलेल्या वाळूमाफीयांना आळा घालण्यासाठी गुरुवारी नांदेड तहसील कार्यालय आणि नांदेड ग्रामीण पोलिसांनी एकाच दिवशी कारवाई करून मोठा दणका दिला आहे. नांदेड ग्रामीण पोलिसांनी केलेल्या कारवाईत तब्बल एक कोटी ३९ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. त्याचवेळी पहिल्यांदाच १० मालकासह नऊ उत्तर प्रदेश आणि बिहारमधून आणलेल्या मजुरावरही गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईसाठी नांदेड ग्रामीण पोलिसांनी पहिल्यांदाच ड्रोन कॅमेराचा वापर करून कारवाईत आधुनिकता आणली आहे. कारवाईदरम्यान शेतात लपून बसलेल्या मजुरांना आणि लपवलेले पंप शोधण्यासाठी ड्रोनचा वापर करण्यात आला.

गोदावरी नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात अवैधरित्या वाळू उपसा सुरू आहे. ही माहिती नांदेड ग्रामीण पोलिसांना मिळाली. या माहितीनुसार गुरुवारी पहाटे चार वाजेपासून नांदेड ग्रामीण ठाण्यातील सर्व अधिकारी, अंमलदार हे गोदावरी नदीपात्रात कल्हाळ या ठिकाणावरून उतरले. बोटीच्या सहाय्याने काळेश्वर, विष्णूपुरी, मार्कंड, पिंपळगाव, भनगी, वाहेगाव, गंगाबेट या ठिकाणी छापा कारवाई केली. सदर ठिकाणावर गोदावरी नदी पात्रातून इंजिन, बोट, तराफे तसेच मजुराच्या सहाय्याने मोठ्या प्रमाणात रेती उपसा सुरू होता. त्या ठिकाणी पोलिसांनी सात इंजिन, १०९ तराफे, तीन बोटी, ३२ लोखंडी ड्रम, १९ प्लास्टिकचे ड्रम, ३९ लोखंडी पाईप, ४५ ब्रास रेती, ११ टोपले, सहा खोरे असा एकूण १ कोटी ३९ लाख ४०० रुपयांचा मुद्देमान जप्त केला आहे. त्यापैकी काही साहित्य हे जाळून आणि बुडवून नष्ट केल्याची माहिती पोलिसांनी दिली.

या कारवाईदरम्यान पोलिसांना पाहून काही आरोपी पळून जाऊन शेतात लपले होते. त्यांना ड्रोनचा वापर करून पकडण्यात आले. तर काही इंजिन शेतामध्ये लपवून ठेवले होते. ते इंजिनही ड्रोनच्या सहाय्याने शोधण्यात आले. या कारवाईत वाळू उपसा करणाऱ्या १० मुख्य मालकावर गुन्हा दाखल केला आहे तसेच नऊ बिहारी आणि उत्तर प्रदेशच्या मजुरावरही गुन्हा दाखल केला आहे. दहा जण पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील, सुरज गुरव, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली नांदेड ग्रामीणचे पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर, पोलीस उपनिरीक्षक मठवाड, पोलीस उपनिरीक्षक कुसमे, पोहेकॉ केंद्रे, अर्जुन मुंडे, पवार, कल्याणकर, लव्हारे, पैनापल्ले, चावरे, भिसे, समीर, शेख जमीर, शेख असिफ धम्मपाल कांबळे यांनी ही कारवाई केली आहे.

नांदेड ग्रामीण पोलिसांनी या कारवाईदरम्यान विष्णूपुरी येथील शिवाजी हंबर्डे, बालाजी हंबर्डे, बोरगाव तेलंग येथील अर्जुन विलासराव क्षीरसागर, कोरका येथील शंकर अंबादास पवार, गंगाबेट येथील राजकुमार सोनटक्के, पिंपळगाव येथील नारायण पुंड, कल्लाळ येथील रामदास क्षीरसागर, पप्पन क्षीरसागर, कैलास क्षीरसागर आणि वाहेगाव येथील पुंडलिक सोनटक्के या मूळ मालकावरही गुन्हे दाखल केले आहेत. या कारवाईत उत्तर प्रदेशातील तीन आणि बिहारमधील सहा मजुरावरही गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!