प्रशासकीय

नांदेड जिल्ह्यात पाच कंट्रोल रूमद्वारे मतदान प्रक्रियेवर नजर..!

सायं. ५ वाजेपर्यंत ५५.७० टक्के मतदान, जिल्ह्यात ६५ ते ७० टक्के मतदानाची अपेक्षा - जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अभिजीत राऊत

नांदेड –  जिल्ह्यात लोकसभा पोटनिवडणूक आणि नऊ विधानसभा मतदारसंघासाठी मतदान प्रक्रिया सुरू आहे. सकाळी सात वाजेपासून सुरू असलेल्या या मतदान प्रक्रियेवर जिल्हा निवडणूक विभागाची पाच विविध कंट्रोल रूमद्वारे नजर ठेवली जात आहे. जिल्ह्यातील १ हजार ७८१ मतदान केंद्रावर वेबकास्टिंग केली जात आहे. जिल्हा नियंत्रण कक्षातूनच या केंद्रांचा आढावा घेतला जात आहे. जिल्ह्यात मतदारांनी मतदानासाठी आतापर्यंत चांगला प्रतिसाद दिला आहे. आणखी पुढच्या दोन ते तीन तासात होणारे मतदान पाहता जिल्ह्यात मतदानाची टक्केवारी ६५ ते ७० टक्क्यांपर्यंत जाईल, असा विश्वास जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी व्यक्त केला आहे. सायंकाळी पाच वाजेपर्यंत नांदेड जिल्ह्यातील नऊ मतदारसंघासाठी ५५.७० तर लोकसभा पोटनिवडणुकीत ५३.७८ टक्के मतदान झाले होते.

नांदेड जिल्ह्यामध्ये २५ वर्षानंतर प्रथमच नांदेड लोकसभा पोटनिवडणूक व विधानसभा निवडणूक एकत्रित होत आहे. ९ विधानसभा मतदारसंघासाठी २७ लाख ८७ हजारांहून अधिक मतदार मतदान करणार आहेत. तर लोकसभेसाठी ६ मतदारसंघात १९ लाखांच्यावर मतदार मतदान करणार आहेत. ६ विधानसभा क्षेत्रातील मतदार एकदाच बोटाला शाई लावून दोन वेळा मतदान करीत आहेत. लोकसभा पोटनिवडणुकीसाठी २ हजार ८२ मतदान केंद्रावर मतदान सुरू आहे. जिल्ह्यात नऊ विधानसभा मतदारसंघाच्या मतदान प्रक्रियेसाठी ३ हजार मतदान केंद्र कार्यान्वित करण्यात आले आहेत. बुधवारी सकाळी सात वाजेपासून मतदानाला प्रारंभ झाला. सकाळच्या सत्रात मतदारांनी मतदान केंद्राकडे येण्यासाठी उशीर लावला असला तरी वाजेपासून मात्र मतदारांच्या मोठ्या प्रमाणात रांगा लागल्या. मतदान प्रक्रिया शांततेत सुरू आहे. सायंकाळी पाच वाजेपर्यंत जिल्ह्यात कुठेही अनुचित प्रकार घडला नाही.  काही ठिकाणी मशीन बंद पडण्याचे प्रकार घडले असले तरीही त्या मशीन तात्काळ बदलण्यात आल्याचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी सांगितले. जिल्ह्यात सुरू असलेल्या मतदान प्रक्रियेसाठी १ हजार ७८१ मतदान केंद्रावर वेबकास्टिंग करण्यात आली आहे.  या वेबकास्टिंगच्या माध्यमातून जिल्हा नियंत्रण कक्षातूनच जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्यासह अपर जिल्हाधिकारी पांडुरंग बोरगावकर, निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर, निवडणूक उपजिल्हाधिकारी राजकुमार माने, प्रशांत शेळके आदी अधिकाऱ्यांद्वारे मतदान प्रक्रियेवर लक्ष ठेवत जात आहे.  इतर पाच प्रकारच्या कंट्रोल रूमही स्थापन करण्यात आले आहे. जीपीएस कंट्रोल रूमद्वारे ईव्हीएम मशीन ट्रॅक केल्या जात आहेत. त्यामुळे मतदान प्रक्रिया पूर्णतः शांततेत पार पाडली जात आहे.
सायं. ५ वाजेपर्यंत सर्वाधिक मतदान हदगाव विधानसभा मतदारसंघात 
जिल्ह्यातील नऊ विधानसभा मतदारसंघात मतदान प्रक्रिया सुरू आहे. सायंकाळी पाच वाजेपर्यंत सर्वाधिक ६३.४६ टक्के मतदान हदगाव मतदारसंघात झाले होते. भोकर मतदारसंघात ६०.२५ टक्के, किनवट मतदार संघात ५८.४२ टक्के, नायगाव मतदारसंघ ५७.९८ टक्के, लोहा मतदारसंघ ५७.६७ टक्के, देगलूर मतदारसंघात ५१.३६ टक्के, नांदेड उत्तर मतदार संघात ५१.३४ टक्के, नांदेड दक्षिण मतदार संघ ५१.१७ टक्के आणि मुखेड विधानसभा मतदारसंघासाठी ५१.१६ टक्के मतदान झाले होते. लोकसभा पोटनिवडणुकीसाठी ५३.७८ टक्के मतदान झाले आहे.

एकत्र मतदानाचा मतदारांसह प्रशासनालाही आगळावेगळा अनुभव…नांदेड लोकसभा निवडणूक आणि विधानसभा निवडणूक एकत्ररित्या होत आहेत. २५ वर्षानंतर अशा एकत्रित निवडणुका घेतल्या जात आहेत. त्यामुळे मतदारांनाही एकाच शाईत दोन वेळा मतदान करण्याचा अनुभव येत आहे. तर प्रशासनालाही या अनुभवाचा निश्चितपणे लाभ होणार आहे. या एकत्रित निवडणुकांची तयारी जिल्हा प्रशासनाकडून गेल्या अनेक दिवसापासून करण्यात येत होते वेगवेगळे प्रशिक्षणही घेण्यात आले आहेत. त्याचा लाभ झाला आहे. त्यातून निवडणूक प्रक्रियाही सुरळीत पार पडली असल्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अभिजीत राऊत यांनी स्पष्ट केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!