
नांदेड : नांदेड जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघ आणि लोकसभा पोटनिवडणुकीची मतमोजणी २३ नोव्हेंबर रोजी सकाळी ७ वाजेपासून स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात सुरू होणार आहे. ८४ टेबलवर ही मतमोजणी होणार असून २४ ते २८ फेऱ्यांमध्ये निकाल येतील, अशी अपेक्षा आहे. प्रत्येक विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी १४ टेबलवर होणार आहे, अशी माहिती जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिली.
उद्या २३ नोव्हेंबर रोजी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठामध्ये ज्ञान स्त्रोत केंद्र ( नॉलेज रिसोर्स सेंटर ) येथे सकाळी ७ वाजल्यापासून मतमोजणी सुरु होणार आहे. पहिल्या व दुसऱ्या माळ्यावर विधानसभा व लोकसभा निवडणुकीची मतमोजणी होणार आहे. पहिल्या माळयावर खोली क्रमांक १०२ व खोली क्रमांक ६ याठिकाणी सहा विधानसभा क्षेत्राची मतमोजणी होणार असून सर्व मतयंत्र याठिकाणच्या स्ट्रॉंगरुमध्ये पोहोचले आहेत. तसेच दुसऱ्या माळ्यावर खोली क्रमांक २०२ ते २०६ मध्ये लोकसभा पोटनिवडणुकीची मतमोजणी होणार आहे. उमेदवारांच्या उपस्थितीत सर्व मतपेट्या स्ट्राँगरुममध्ये बंद झाल्या असून सीसीटीव्हीच्या निगराणीत ठेवण्यात आल्या आहेत. २३ नोव्हेंबरला सकाळी उमेदवारांच्या व त्यांच्या प्रतिनिधीच्या उपस्थितीत मतदान यंत्र बाहेर काढले जातील. त्यानंतर मतमोजणीला सुरुवात होईल. याठिकाणी वेगवेगळे कक्ष करण्यात आले असून उमेदवारांचे प्रतिनिधींसाठी देखील थांबण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. विधानसभेची १४ टेबलावर मोजणी होणार आहे. लोकसभा व विधानसभेसाठी १४ गुणिले ६ असे ८४ टेबल लोकसभा आणि विधानसभासाठी असणार आहे. अंदाजे २४ ते २८ फेऱ्यांमध्ये मतमोजणी होणार आहे.
जिल्ह्यात लोकसभा पोटनिवडणूक व ९ विधानसभेसाठी २० नोव्हेंबर रोजी मतदान झाले आहे. निवडणूक आयोगाने २१ तारखेला घोषित केलेल्या अंतिम आकडेवारीनुसार २०१९ च्या तुलनेत विक्रमी मतदान झाले आहे. यावेळी विधानसभेसाठी ६९.४५ टक्के मतदान झाले आहे. तर लोकसभा पोटनिवडणुकीतही गेल्या वेळेच्या तुलनेत ७ टक्के अधिक मतदान झाले असून ही टक्केवारी ६७.८१ इतकी आहे.
नांदेड लोकसभेसाठी १९ लाखांच्यावर तर विधानसभेसाठी २७ लाखांच्यावर मतदार संख्या आहे. दरम्यान काल झालेल्या मतदानात शेवटच्या मतदानाची आकडेवारी गुरुवारी हाती आली आहे. लोकसभा पोटनिवडणुकीसाठी भोकर मतदारसंघात सर्वात जास्त ७६.३३ टक्के तर सर्वात कमी नांदेड उत्तरमध्ये ६०.६० टक्के मतदान झाले आहे. तर नांदेड दक्षिणमध्ये ६३.९९, नायगावमध्ये ७४.०२, देगलूर ६३.२२, मुखेड ७०.१४ टक्के मतदान झाले आहे, असे एकूण ६७.८१ टक्के मतदान झाले आहे.
विधानसभेसाठी किनवटमध्ये ७१.९५ टक्के, हदगावमध्ये ७१.७७, भोकर मतदारसंघात ७६.३३, नांदेड उत्तरमध्ये ६०.६ टक्के, नांदेड दक्षिणमध्ये ६३.९९ टक्के, लोहा मतदारसंघात ७५.०२ टक्के, नायगाव मतदारसंघात ७४.०३ टक्के, देगलूर मतदारसंघामध्ये ६३.२२ टक्के, मुखेड मतदारसंघात ७०.१४ असे एकूण ६९.४५ टक्के मतदान झाले आहे. विधानसभेसाठी सर्वात जास्त भोकर येथे ७६.३३ टक्के मतदान झाले आहे तर सर्वात कमी मतदान नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघात ६०.६ टक्के झाले आहे.
किनवट, हदगाव व लोहा येथे त्या-त्या ठिकाणी मतमोजणी..लोकसभेअंतर्गत येणाऱ्या सहा विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी नांदेड येथे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात होणार आहे. तर इतर तीन मतदारसंघाची मतमोजणी त्या त्या तालुकास्तरावर होणार आहे. त्यामध्ये किनवटला आयटीआय कॉलेजमध्ये तर हदगावला समाजकल्याण भवन येथील अनुसूचित जातीचे मुलींचे शासकीय वसतीगृह तर लोहा येथे महसूल हॉल, तहसील कार्यालयाच्या ठिकाणी मतमोजणी होणार आहे.