राजकीय

नांदेडमध्ये भाजपने केली ‘वंचित’च्या फारुख अहमद यांची उमेदवारी रद्द करण्याची मागणी

'वंचित' च्या फारुख अहमदनेही दिले आव्हान, होय ते वक्तव्य माझेच... पण नांदेडमधले नाही, क्या उखाडना है उखाड लो..!

नांदेड – नांदेडमध्ये विधानसभा निवडणुकीत नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार फारूक अहमद यांच्या एका व्हायरल व्हिडिओवरून भारतीय जनता पक्षाने त्यांची उमेदवारी रद्द करावी, अशी मागणी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्याकडे केली आहे. त्याचवेळी प्रक्षोभक वक्तव्य केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी पोलीसही अधीक्षकांकडे करण्यात आली आहे. भाजपचे खासदार डॉ. अजित गोपछडे यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन मंगळवारी देण्यात आले.

प्रक्षोभक वक्तव्य करणाऱ्या नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार फारूख अहमद यांच्यावर तात्काळ कठोर कारवाई करावी, अशी मागणी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे आज मंगळवारी करण्यात आली आहे. फारूख अहमद यांनी प्रचारसभेत प्रक्षोभक विधान करून राजकीय आणि सामाजिक वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला आहे. कुठलेही औचित्य नसताना विधानसभा प्रचार मोहिमेत नांदेड दक्षिण विधानसभेतील उमेदवार फारूख अहमद यांनी टिपू सुलतान यांच्या पुतळा उभारणीबाबत विधान केले. समाजामध्ये संभ्रम निर्माण करण्याकरता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा तसेच अन्य नेते यांचे नाव घेऊन धमकीवजा भाषेचा प्रयोग केला. हिम्मत असेल तर कारवाई करा, मी पुतळा बसवणारच असे देशाच्या सरकारला आणि गृहमंत्र्यांना आव्हान केले. पुतळा बसल्यावर माझ्यावर काय कारवाई करायची ते करा… मेरा कुछ उखाड नही सकता असे आव्हान केल्याचे निवेदनात म्हटले आहे. भारतीय घटनेनुसार दोन धर्मात तेढ निर्माण करणे, धार्मिक आधारावर मताचे ध्रुवीकरण करणे,  विधान करून समाजात तेढ निर्माण करणे या संदर्भात केंद्रीय निवडणूक आयोग आणि राज्य निवडणूक आयोगानुसार जे कायदे लावून गुन्हा दाखल करता येतो तो करावा, फारुख अहमद यांची निवडणूक रद्द करावी, त्यांना उद्याच्या निवडणुकीत सहभाग घेता येऊ नये, त्याचवेळी अशा प्रकारच्या धार्मिक चितावणीखोर वक्तव्यामुळे यापूर्वी महाराष्ट्रात अनेक निवडणुका रद्द झाल्या आहेत, तेव्हा नांदेड दक्षिणची निवडणूकही रद्द करावी अशी मागणी केली आहे. भाजपने खा. डॉ. अजित गोपछडे यांच्या नेतृत्वाखाली बाळू खोमणे, दीपक रावत, दिलीप ठाकूर, माधव उच्चेकर, डॉ. सचिन उमरेकर, विनय सगर यांच्या उपस्थितीत हे निवेदन जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांना दिले आहे.
नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार म्हणून शिवसेनेचे आनंद बोंढारकर रिंगणात आहेत. असे असताना आज मंगळवारी निवेदन देताना शिवसेनेचा एकही पदाधिकारी, कार्यकर्ता उपस्थित नव्हता, हेही विशेष.

होय.. ते वक्तव्य माझेच..!   भाजपच्या या मागणीबाबत वंचित बहुजन आघाडीचे नांदेड दक्षिणचे उमेदवार फारूख अहमद यांना विचारले असता या मतदारसंघात आता भाजपाला आणि महायुतीला पराभव दिसत असल्याने जुन्या भाषणाचा संदर्भ देत जातीय दंगली भडकवण्याचा प्रयत्न भाजप तसेच आरएसएसचे कार्यकर्ते करत असल्याचा पलटवार  केला आहे. सदरील वक्तव्य आपलेच असल्याचे स्पष्ट करत हे वक्तव्य सोलापूरमधील एका सभेतील असल्याचे फारूक अहमद यांनी म्हटले आहे. भारतीय संविधानातील तरतुदीनुसारच आपण आपले विचार ठेवत असून कोणत्याही धर्माविरुद्ध आपण बोललो नाही. मी संविधानाला मानणारा आणि आंबेडकरवादी विचारांचा कार्यकर्ता आहे. व्हायरल केले जात असलेले वक्तव्य या विधानसभा निवडणुकीतील नाहीच. मात्र ते आपलेच आहे यावरही ते ठाम आहेत. याउपरही कुणाला काय करायचे आहे, त्यांनी ते करावे असे आव्हानही फारुख अहमद यांनी दिले आहे. 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!