Police

नांदेड ग्रामीण ठाण्याचा पदभार पुन्हा एकदा ओमकांत चिंचोलकर यांच्याकडे सुपूर्द 

सोमवारी स्वीकारला ठाण्याचा पदभार, चाहत्यांकडून जल्लोषात स्वागत... सोशल मीडियावर दिला 'सिंघम रिटर्न'चा नारा

नांदेड – ठाण्यातील एका कर्मचाऱ्याने केलेल्या लाच मागणी प्रकरणाच्या चौकशी दरम्यान कंट्रोलला अटॅच करण्यात आलेले नांदेड ग्रामीण ठाण्याचे पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांना पुन्हा एकदा नांदेड ग्रामीण ठाणे बहाल करण्यात आले आहे. ११ ऑगस्ट रोजी त्यांनी आपला पदभार स्वीकारला आहे. हा पदभार स्वीकारताच त्यांच्या असंख्य चाहत्यांनी आनंद व्यक्त केला असून त्यांच्या स्वागतासाठी ठाण्यामध्ये विविध क्षेत्रातील चाहत्यांची रांग लागली होती. सोशल मीडियावरही त्यांच्या पुनरागमनाचा जल्लोष केला जात आहे.

नांदेड ग्रामीण ठाण्यातील एका कर्मचाऱ्याविरुद्ध लाच मागितल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाच्या चौकशी दरम्यान नांदेड ग्रामीण ठाण्याचे पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांची रवानगी २९ जुलै रोजी कंट्रोलमध्ये करण्यात आली होती. याच कालावधीत गोदावरी पट्ट्यातील आणखी एका पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षकांनाही नियंत्रण कक्षात पाठवण्यात आले होते. पोलीस निरीक्षक चिंचोलकर यांना ठाण्यातील घडलेल्या एसीबी प्रकरणात नियंत्रण कक्षात पाठवण्यात आल्याची माहिती खुद्द पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी दिली होती. एखाद्या ठाण्यात लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडून कारवाई केली जाते त्यावेळी तेथील ठाणे प्रमुखांना नियंत्रण कक्षाला पाठविण्यात येते. पोलीस महासंचालक कार्यालयाच्या निर्देशानुसारच ही प्रक्रिया असते, असेही पोलीस अधीक्षकांनी स्पष्ट केले होते. त्यानुसारच चिंचोलकर यांनाही कंट्रोल रूमला अटॅच करण्यात आले होते. यापूर्वी नांदेड ग्रामीण ठाण्यातील तत्कालीन पोलीस निरीक्षक सुनील निकाळजे, अशोक घोरबांड आदी पोलीस निरीक्षकांनाही नियंत्रण कक्षात लाच लूचपत प्रकरणानंतर यावे लागले होते.

दरम्यान, नांदेड ग्रामीण ठाण्यातील लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या कारवाईच्या अनुषंगाने चौकशी पूर्ण झाल्यानंतर पोलीस निरीक्षक चिंचोलकर यांना पुन्हा एकदा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी नांदेड ग्रामीण ठाणे बहाल करण्यात आले आहे. चिंचोलकर यांनी आपला पदभार सोमवारी स्वीकारला. आगामी सण, उत्सवाच्या पार्श्वभूमीवर चिंचोलकर यांना नांदेड ग्रामीण ठाणे पुन्हा मिळणे ही बाब कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने आवश्यक होती, असे सांगितले जात आहे. चिंचोलकर यांनी नांदेड ग्रामीण ठाण्याचा पदभार स्वीकारतात ‘सिंघम रिटर्न’चा नारा त्यांच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर दिला आहे. त्यांच्या पुनरागमनाचे जल्लोषात स्वागत सुरू आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!