नांदेड जिल्हा

नांदेड जिल्हा परिषदेच्या महिला शिक्षणाधिकाऱ्यांवर थेट हप्ता वसुलीचा गंभीर आरोप..!

शिक्षण विभागातील कर्मचाऱ्यांकडूनच दरमहा सुरू आहे हप्ता वसुली, जिल्हा परिषद कर्मचारी युनियनचे राज्याध्यक्ष बाबुराव पुजरवाड यांचा गंभीर आरोप, शिक्षण विभागातील सर्वच कर्मचाऱ्यांनी घेतली विभागीय कार्यालयातील आस्थापना विभाग उपायुक्तांची थेट भेट..!

नांदेड – जिल्हा परिषदेच्या शिक्षकाने दोन मुलांसह आत्महत्या केल्याप्रकरणी गोत्यात आलेल्या प्राथमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी वंदना फुटाणे यांचे पाय आणखी खोलात जात असल्याचे स्पष्ट होत आहे. फुटाणे यांच्याविरुद्ध आता त्यांच्याच विभागातील कर्मचाऱ्यांनी यल्गार पुकारला आहे. फुटाणे या आपल्याच विभागातील कर्मचाऱ्यांकडून दर महिन्याला हप्ता वसुली करीत असल्याचा गंभीर आरोप जिल्हा परिषद कर्मचारी युनियनचे राज्याध्यक्ष बाबुराव पुजरवाड यांनी केला आहे. या संदर्भात शुक्रवारी विभागीय आयुक्त कार्यालयातील आस्थापना विभागाचे उपायुक्त दादाराव वानखेडे यांची भेट घेऊन शिक्षण विभागातील सर्वच कर्मचाऱ्यांनी आपबिती सांगितली. शिक्षणाधिकारी वंदना फुटाणे या कर्मचाऱ्यांना अपमानास्पद वागणूक देतात, असभ्य भाषा वापरतात, टेबलावरील बेल फेकून मारतात यासह थेट हप्ता वसुलीही करीत असल्याचा थेट आरोप यावेळी केल्याने प्रकरणाचे गांभीर्य आणखी वाढले आहे.

जिल्हा परिषदेच्या प्रामिक शिक्षण विभागाच्या शिक्षणाधिकारी वंदना फुटाणे यांना नांदेडमध्ये रुजू होऊन जवळपास एक ते दीड वर्ष झाले आहे. या दीड वर्षात त्यांनी आपल्याच विभागातील कर्मचाऱ्यांना वेगवेगळ्या कारणावरून धारेवर धरले आहे. त्या शिक्षण विभागातील कर्मचाऱ्यांना अतिशय उद्धटपणे बोलून अपमान करतात तसेच अनेक कर्मचाऱ्यांकडून दर महिन्याला दहा ते पंधरा हजार रुपये हप्ता वसुली करतात, अशी गंभीर तक्रार करण्यात आली आहे. अनेक कर्मचाऱ्यांना अपमानास्पद वागणूक देवून अरे कारेची भाषा वापरतात. यापूर्वीही असा प्रकार होत असल्याने शिक्षण विभागातील कर्मचाऱ्यांनी जिल्हा परिषद कर्मचारी युनियनचे राज्य अध्यक्ष बाबुराव पुजरवाड यांच्याकडे हा प्रकार सांगितला. त्यावेळी पुजरवाड यांनी शिक्षणाधिकारी फुटाणे आणि कर्मचाऱ्यांची भेट घेऊन या प्रकरणात सामंजस्याने तोडगा काढण्याचा प्रयत्न केला होता; मात्र त्यामध्ये कोणतीही सुधारणा झाली नाही. त्यामुळे शिक्षण विभागातील कर्मचारी दहशतीत काम करत आहेत. त्यांच्या मानसिक स्थितीवरही परिणाम झाला आहे. या विभागातील कर्मचाऱ्यांचे काही बरे वाईट झाल्यास याला कारणीभूत या शिक्षणाधिकारी वंदना फुटाणे याच राहतील असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

छत्रपती संभाजी नगर विभागीय कार्यालयातील आस्थापना विभागाचे उपायुक्त दादाराव वानखेडे हे आज शुक्रवारी नांदेड दौऱ्यावर होते. त्यांनी जिल्हा परिषदेत विभाग प्रमुखांची बैठक घेतली. या बैठकीनंतर कर्मचारी युनियनने या संदर्भात वानखेडे यांचे लक्ष वेधले. जिल्हा परिषद शिक्षण विभागातील सर्वच कर्मचाऱ्यांनी वानखेडे यांची भेट घेऊन आपबीती सांगितली. याबाबत वानखेडे यांनी चौकशी करून कारवाईचे आश्वासन दिले. त्याचवेळी कर्मचारी युनियनने मात्र ५ ऑगस्टपर्यंत शिक्षणाधिकारी वंदना फुटाणे यांच्याविरुद्ध कोणतीही कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मुक्कावार यांचीही उपस्थिती होती.

महिनाभरापासून वडिलांचा अस्थिकलशही घरातच..!प्रार्थमिक शिक्षण विभागातील कर्मचारी गज्जेवार यांचे वडील १८ जून २०२६ रोजी मृत पावले आहेत. तेराव्यानंतर ते कर्तव्यावर उपस्थित झाले. त्यांच्या वडिलांचे अस्थिविसर्जन काशी येथे करायचे आहे; पण शिक्षणाधिकारी फुटाणे यांनी गज्जेवार यांची ऑर्डर एईआरओकडे असताना उपजिल्हाधिकारी कोळेकर यांना सांगून स्वतःकडे सेवा वर्ग केली. म्हणजे ऑफिसमध्ये त्रास आणि निवडणूक कामात सुद्धा त्रास देण्याचा प्रयत्न केला आहे. गेल्या महिनाभरापासून गज्जेवार यांच्या वडिलांच्या अस्थी घरातच बांधून ठेवल्या आहेत, अशी बाबही यावेळी विभागीय आयुक्त कार्यालयातील आस्थापना विभागाचे उपायुक्त वानखेडे यांच्या निदर्शनास आणून दिली आहे. इतकेच नाही तर शिक्षणाधिकारी फुटाणे यांच्या त्रासाला कंटाळून शिक्षण विभागातील उपशिक्षणाधिकारी नागराज बनसोडे आणि अधीक्षक जाधव यांनी शासन स्तरावर आपली आपल्या बदलीचा विनंती अर्ज सादर केला आहे. अधीक्षक जाधव यांच्या आईचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यानंतर अवघ्या तीन दिवसांनी त्यांना कार्यालयात फुटाणे यांनी पचारण केले आहे.  कार्यालयात रुजू न झाल्यास शासनाकडे निलंबनाचा प्रस्ताव पाठवतो,  अशा धमक्याही जाधव यांना फुटाणे यांनी दिल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!