क्राईम

नांदेड जिल्हा परिषद शिक्षण विभागातून माहितीविनाच वरिष्ठ पोलीस अधिकारी दुसऱ्या दिवशीही माघारी परतले..!

प्रार्थमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी वंदना फुटाणे यांची प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल..! पोलिसांना माहिती देण्यासाठी टाळाटाळच, मोरे आत्महत्येप्रकरणात आता कागदपत्रांची सुरू आहे जुळवाजुळव

नांदेड – नांदेड जिल्हा परिषदेत पोलीस सलग दुसऱ्या दिवशी माहितीविना माघारी फिरले आहेत. खुद्द इतवाराचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत शिंदे यांना माघारी परतविण्याचा प्रकार जिल्हा परिषद शिक्षण विभागाने केला आहे. एकीकडे विविध शिक्षक संघटनांनी मयत शिक्षक सुनील मोरे यांच्या आत्महत्येची चौकशी एसआयटीमार्फत करावी अशी मागणी केली असताना खुद्द वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनाच फेऱ्या मारायला लावणाऱ्या नांदेड जिल्हा परिषदेच्या प्रार्थमिक शिक्षण विभागाच्या शिक्षणाधिकारी वंदना फुटाणे या आता थेट रुग्णालयात दाखल झाल्या आहेत. त्यामुळे आता या प्रकरणातील माहितीचे काय? असा प्रश्नही उपस्थित होत आहे. माहिती देण्याबाबत टाळाटाळ करण्यासाठीच रुग्णालयाची वाट धरली का असा प्रश्नही आता पुढे येत आहे.

हिमायतनगर तालुक्यातील पोटा बु. जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक सुनील मोरे यांनी १७ जुलै रोजी आपल्या दोन मुलांसह आत्महत्या केल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला होता. याप्रकरणी नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात चार जिल्हा परिषदेच्या तत्कालीन आणि विद्यमान अधिकारी तसेच शिक्षकाविरुद्ध ॲट्रॉसिटी कलमान्वये गुन्हा दाखल झाला आहे. त्याचवेळी मयत शिक्षक सुनील नारायण मोरे यांच्यावरही आपल्या दोन मुलांच्या हत्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ॲट्रॉसिटी प्रकरणातील तपास इतवारा उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत शिंदे हे करीत आहेत.

प्रशांत शिंदे यांनी नांदेड जिल्हा परिषदेत या प्रकरणातील आवश्यक कागदपत्रांच्या मागणीसाठी सोमवारी शिक्षण विभागात जाऊन अधिकाऱ्यांकडे कागदपत्रांची मागणी केली. त्यावेळी त्यांना ही कागदपत्र पहिल्या दिवशी देण्यात आले नाहीत. त्यामुळे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत शिंदे हे सलग दुसऱ्या दिवशी जिल्हा परिषदेत शिक्षण विभागात दाखल झाले; मात्र दुसऱ्या दिवशीही त्यांना शिक्षण विभागाने रिकाम्या हाताने परतविले. विशेष म्हणजे या प्रकरणात संशयाची सुई असलेल्या प्रार्थमिक शिक्षण विभागाच्या शिक्षणाधिकारी वंदना फुटाणे या मंगळवारी नांदेड शहरातील फिनिक्स या रुग्णालयात दाखल झाल्या असल्याची माहिती शिक्षण विभागातून देण्यात आली आहे. शिक्षणाधिकारी फुटाणे यांच्यासह त्यांचे काही सहकारीही मंगळवारी शिक्षण विभागातून बेपत्ता होते. नांदेड जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात आता कर्मचारी विरुद्ध अधिकारी असा संघर्ष शिगेला पोहोचलेला आहे. शिक्षणाधिकारी वंदना फुटाणे यांनी कर्मचाऱ्यांना वारंवार दिलेल्या अपमानास्पद वागणुकीमुळे हा संघर्ष उद्भवला आहे. या प्रकरणात आता शिक्षण विभागातील अन्यायग्रस्त कर्मचारी एकवटले आहेत. त्यांनी आता शिक्षणाधिकारी वंदना फुटाणे यांच्या समवेत असलेल्या त्या निवडक अधिकाऱ्याविरुद्धही आवाज उठविण्यास प्रारंभ केला आहे.

एकूणच गेल्या सहा महिन्यापासून जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील वातावरण अत्यंत दूषित झाल्याची बाबही पुढे आली आहे. या सर्व प्रकरणात जिल्हा परिषदेचे नूतन मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील यांची भूमिका आता महत्त्वपूर्ण ठरणार आहे. दुसरीकडे शिक्षणाधिकारी वंदना फुटाणे यांच्या अनेक तक्रारी जिल्ह्यातील वरिष्ठ राजकीय नेत्यांपर्यंतही पोहोचल्या आहेत. त्याचवेळी शिक्षणाधिकारी वंदना फुटाणे यांनी शिक्षक सुनील मोरे यांच्या आत्महत्या प्रकरणातील अनेक संचिका या प्रलंबित ठेवल्या असल्याची बाबही आता पुढे आली आहे. त्यामुळे शिक्षणाधिकारी वंदना फुटाणे यांना आता घाम फुटल्याचे चित्र आहे. या सर्व प्रकारातून त्रस्त झाल्याने त्यांनी थेट रुग्णालयात दाखल होणे पसंत केले आहे.

सुनील मोरे आत्महत्या प्रकरणातील कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात गेल्या तीन दिवसापासून रात्रंदिवस एक केला जात आहे. प्रार्थमिक शिक्षणाधिकारी वंदना फुटाणे यांच्यासह त्यांचे काही निवडक चमू शिक्षण विभाग सोडून इतर ठिकाणी बसत या प्रकरणातील संचिकांची जुळवाजुळव, अहवालांचा क्रम जुळवत आहेत. गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात खुद्द सुनील मोरे यांनी दिलेल्या तक्रारीला केराची टोपली दाखवत या प्रकरणात चौकशीची दिरंगाई शिक्षण विभागातून करण्यात आली होती. परिणामी अन्यायाच्या भावनेतून शिक्षक सुनील मोरे यांनी १७ जुलै रोजी आपल्या दोन मुलांसह आत्महत्या केली आहे. आत्महत्यापूर्वीच सुनील मोरेने आपल्या दोन मुलांची हत्या केली होती. त्यानंतर स्वतः आत्महत्या करण्यापूर्वी आपल्या गाडीमध्ये लॅपटॉप आणि मोबाईलमध्ये या प्रकरणातील सर्व पुरावे असल्याचे फोन कॉलद्वारे काहीजणांना सांगितले होते. त्या लॅपटॉप आणि मोबाईलमधील पुराव्यांचाही आता पोलिसांना शोध घ्यावा लागणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!