राजकीय

भारतीय जनता पक्षाच्या महिला मोर्चा राज्य कार्यकारिणीत नांदेड जिल्ह्यातून चार महिलांना मिळाली संधी..!

राज्य कार्यकारिणीत महामंत्रीपदी प्रणिता चिखलीकर तर राज्य सचिवपदी महादेवी मठपती, राज्याध्यक्षा चित्रा वाघ यांनी जुन्या कार्यकर्त्यांनाच दिले महत्त्व

नांदेड – भारतीय जनता पक्षाच्या महिला मोर्चाची राज्य कार्यकारणी नूतन अध्यक्षा चित्राताई वाघ यांनी घोषित केली आहे. यामध्ये नांदेडच्या चार महिलांना महत्त्वाची पदे देण्यात आली आहेत. यामध्ये महामंत्री म्हणून प्रणिताताई चिखलीकर यांना तर राज्य सचिवपदी महादेवी मठपती आणि पद्मा गिऱ्हे यांची निवड करण्यात आली आहे. मठपती यांना पुन्हा एकदा राज्य महिला मोर्चा कार्यकारिणीत सचिवपदी स्थान मिळाले आहे. त्याचवेळी कार्यकारणीत उपाध्यक्षपदी संध्या राठोड यांना संधी मिळाली आहे.

महिला मोर्चाच्या राज्याध्यक्षा आ. चित्रा वाघ यांनी घोषित केलेल्या या पहिल्या कार्यकारिणीत भाजपातील आपल्या जुन्या पदाधिकाऱ्यांना पुन्हा एकदा मानाचे स्थान दिले आहे. राज्यात महिला मोर्चाच्या आठ महामंत्र्यांमध्ये नांदेडच्या प्रणिता पाटील चिखलीकर देवरे यांना महामंत्री म्हणून नियुक्ती देण्यात आली आहे. या कार्यकारणीत राज्यात ५५ महिला राज्य सचिवांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामध्ये नांदेडच्या महादेवी गणेश मठपती आणि पद्मा गिऱ्हे या दोन महिला पदाधिकाऱ्यांना सचिवपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. नूतन महिला मोर्चाच्या २७ उपाध्यक्षांमध्ये नांदेड ग्रामीणमधून संध्या राठोड यांना संधी मिळाली आहे.

भारतीय जनता पक्षात नांदेड येथे प्रणिता पाटील चिखलीकर यांना पक्षाच्या वेगवेगळ्या उपक्रमातून सातत्याने दूर ठेवण्याचे काम भाजपाच्या स्थानिक नेत्यांनी केले आहे. अगदी बॅनरवरही त्यांना स्थान मिळू नये याचीही विशेष दक्षता घेतली जात होती. यासाठी माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण आणि आ. प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या राजकीय विरोधाची किनार होती. आता नांदेड विधान परिषद निवडणूक आणि नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत हे दोन्ही नेते एकत्र आले आहेत. अगदी वसंतनगर आणि शिवाजीनगरात ये-जा ही सुरू झाली आहे. त्यातून आ. प्रतापराव पाटील चिखलीकर आणि त्यांच्या कन्या प्रणिता पाटील चिखलीकर या दोघांचीही नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत बिनविरोध निवड झाली आहे. या मनोमिलनानंतर तरी आता भाजपा महिला मोर्चाच्या नांदेड जिल्ह्यातील विविध कार्यक्रमात प्रणिता पाटील चिखलीकर यांना मान मिळेल काय हे लवकरच स्पष्ट होईल. महिला मोर्चाच्या राज्य सचिव महादेवी मठपती यांनाही नांदेड महापालिका निवडणुकीत उमेदवारी मिळविण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केल्यानंतरही भाजपकडून उमेदवारी देण्यात आली नव्हती. पक्षाचा झेंडा घेऊन त्यांनी अगदी मध्य प्रदेशातही विधानसभा निवडणुकीत काम केले होते. मात्र स्थानिक पातळीवर त्यांना त्याचे कोणतेही फलित मिळाले नव्हते. अखेर त्यांना पक्षाने राज्य सचिवपदी पुन्हा संधी देऊन त्यांच्यावर झालेला अन्याय दूर करण्याचा प्रयत्न काही अंशी केला असावा असेही दिसून येत आहे.

खा. चव्हाण गट कार्यकारिणीत दिसेना..! भारतीय जनता पक्षाच्या महिला मोर्चा नूतन कार्यकारणीत माजी मुख्यमंत्री, खा. अशोकराव चव्हाण यांच्या गटातील म्हणजे काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या महिला पदाधिकाऱ्यांना कोणतीही संधी देण्यात आली नसल्याचे स्पष्ट होत आहे. यापूर्वीच्या कार्यकारिणीत प्रारंभी खा. चव्हाण गटाचे महिला मोर्चा कार्यकारिणीवर वर्चस्व होते. पुढे तत्कालीन चिखलीकर गटाचाही कार्यकारिणीत समावेश झाला होता. आता पुन्हा एकदा या कार्यकारिणीत खा. चव्हाण गटाच्या पदाधिकाऱ्यांची वर्णी लागेल काय याकडेही लक्ष लागले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!