
नांदेड – नांदेडजवळील आमदुरा येथे शुक्रवारी सकाळी घडलेल्या घटनेतील दोन्ही मुलांचा सुनील मोरे या क्रूरकर्मा शिक्षकाने आधीच चाकूने भोसकून खून करून त्यांना गाडीत ठेवले असल्याची बाब शवविच्छेदन अहवालात स्पष्ट झाली आहे. या दोन्ही मुलांचा मृत्यू पाण्यात बुडून नव्हे तर चाकू हल्ल्यात झाला असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे सुनील मोरे यांच्या एकूणच वर्तनाविषयी आता संशय निर्माण झाला असून या घटनेच्या सखोल तपास करण्याची गरज निर्माण झाली आहे. पोलिसांनी या प्रकरणात नांदेड ग्रामीण पोलिसांनी मोरे विरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्यात मोरेने घटनेच्या एक दिवस आधीच मुलांना घेऊन घर सोडले होते. याबाबत मोरेच्या पत्नीने विमानतळ ठाण्यात गुरुवारी रात्री माहिती दिली होती; मात्र त्या रात्रभरात मोरेचा कोणताही शोध लागू शकला नाही आणि त्यात या दोन निष्पाप मुलांचा बळी गेल्याची मन हेलावणारी बाबही आता पुढे येत आहे.
शुक्रवारी सकाळी संपूर्ण राज्याला हादरवून सोडणारी घटना नांदेडमधून पुढे आली होती. नांदेड जवळील पुणेगाव – आमदुरा दरम्यान असलेल्या गोदावरी नदीत नांदेड येथील क्रुरकर्मा सुनील मोरे या शिक्षकाने आपली कार मुलांसह गोदावरी नदीत टाकली होती. या घटनेत त्या शिक्षकासह त्याची मुलगी सारा आणि मुलगा सुमित याचाही मृत्यू झाला होता. सदर शिक्षकाने आपल्या व्हाट्सअप स्टेटसवर आपण गटशिक्षणाधिकाऱ्यांसह शिक्षण विभागातील इतर अधिकाऱ्यांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे स्पष्ट केले होते. त्यामुळे प्रारंभिक हा वाद कार्यालयीन असल्याचे वाटत असला तरी एकूणच या प्रकरणाला आता नवे नवे कंगोरे फुटत आहेत. शिक्षक सुनील मोरे यांच्यासह मुलगी सारा आणि सुमितचा शवविच्छेदन अहवाल पुढे आला आहे. त्यात मुलगी सारा आणि सुमित या दोघांचाही मृत्यू पाण्यात बुडून नव्हे तर चाकू हल्ल्यात झाला असल्याची बाब निष्पन्न झाली आहे. त्यामुळे या क्रूरकर्मा शिक्षकाने पाण्यात गाडी टाकण्यावआधीच या दोन्ही मुलांना चाकूने वार करून ठार केले होते. इतक्या निर्दयपणे आपल्या मुलांना ठार करणारा हा पिता नेमक्या कोणत्या कारणाने उद्विग्न झाला होता ही बाबही आता पोलिसांच्या तपासात पुढे येणार आहे.
सुनील मोरे याने आपल्या व्हाट्सअप स्टेटसवरच ‘ मित्रांनो मला माफ करा, मी माझ्या मुलांना संपवून मी स्वतः आत्महत्या करत आहे’ असे स्पष्टपणे म्हटले होते. त्यामुळे सुनील मोरे या क्रूरकर्मा शिक्षकाने रात्रीच आपल्या दोन्ही मुलांना जीवे मारून तो रात्रभर कुठेतरी फिरत राहिला किंवा थांबला असावा असा कयास पोलीस व्यक्त करत आहेत. पुणे गाव येथील काही प्रत्यक्षदर्शींनी सांगितल्याप्रमाणे पुणेगावकडून आमदुरा गावाकडे एक निळ्या रंगाची कार भरगाव वेगात गेली आणि परत पुणेगावाकडे आली. परत वळून पुणेगावाकडून आमदुरा गावाकडे जात असताना भरधाव वेगात पुलाच्या कठडा तोडून त्याने कार नदीपात्रात टाकली. मुलांचे मृतदेह घेऊन फिरत असताना त्याला हेच योग्य ठिकाण जाणवले असावे आणि त्यातूनच त्याने आपली कार नदीपात्रात टाकली असावी असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
त्या दृष्टीनेही पोलिसांचा तपास सुरू आहे. स्टेटस पाहून अनेकांनी त्याला फोन केले. यावेळी तो एकटाच बोलत असल्याचे जाणवत होते. त्याने मुलांना संपवून आपल्या फोनवर व्हाट्सअप स्टेटस ठेवले त्यामध्ये गटशिक्षणाधिकारी किशन फोले विस्तार अधिकारी सूर्यकांत बाचे, केंद्रप्रमुख शिवाजी कदम सहशिक्षक दत्ता विश्वंभर पवळे यांनी त्यांच्या बाबतीतल्या अनेक गोष्टी कौटुंबिक असतील त्याबाबत वारंवार अपमान केला होता असेही नमूद केले होते. आता सर्व विच्छेदन अहवालानंतर हा प्रकार गंभीर असल्याची बाब निश्चितच सिद्ध झाली आहे. दोन्ही मुलांच्या मृत्यू प्रकरणात क्रूरकर्मा पिता सुनील मोरे याच्या विरोधात नांदेड ग्रामीण पोलिसांनी पोलीस जमादार शामसुंदर विश्वनाथ मुखडे यांच्या तक्रारीवरून खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.
गुरुवारी सायंकाळी क्रूरकर्मा सुनील मोरे हा आपल्या दोन्ही मुलांना घेऊन घराबाहेर पडला. रात्रीपर्यंत तो आला नसल्याने त्याच्या पत्नीने विमानतळ पोलिस ठाणे गाठले याबाबत माहिती दिली. मात्र विमानतळ पोलिसांनी आपले घरगुती भांडण आहे, आपण मिटवून घ्या किंवा आपण पहा असे असा सल्ला त्यांना दिला. त्याचवेळी पोलिसांनी शोध मोहीम अथवा लोकेशन ट्रॅक करण्याचा प्रयत्न केला असता तर ही निष्पाप मुले बचावली असती असाही एक सूर आता पुढे आला आहे. पोलिसांकडून मात्र आम्ही व्हाट्सअप स्टेटसनंतर तपासाला लागलो असे सांगितले जात आहे. एकूणच या प्रकरणाला आता नवे वळण मिळाले आहे या सर्व घडामोडीत दोन निष्पाप मुलांचा जीव गेला हे मात्र निश्चित.



