
नांदेड – आमदुरा येथे गोदावरी नदीत कार कोसळून शुक्रवारी झालेल्या दुर्दैवी घटनेत शिक्षक आणि दोन मुलांच्या मृत्यूप्रकरणी हदगावच्या तत्कालीन गटशिक्षणाधिकाऱ्यांसह विस्तार अधिकारी केंद्रप्रमुख आणि सहशिक्षकाविरुद्ध ॲट्रॉसिटी कलमान्वये नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर शिक्षकाने सकाळीच आपल्या व्हॉट्स ॲप स्टेट्सवर ठेवलेल्या मजकुरानंतर नांदेड जिल्हा प्रशासन आणि जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडून सुनील मोरे आणि त्यांच्या दोन मुलांना वाचविण्यासाठी केलेल्या प्रयत्नांना यश आले नाही याची खंत दोन्ही विभागांनी व्यक्त केली आहे. वडील नारायण मोरे यांच्याशीही सुनील मोरे यांनी फोनवरून चर्चा केली होती. वडिलांनी समजावल्यानंतरही त्यांनी आपल्या दोन मुलांसह आत्महत्या करण्याचा टोकाचा निर्णय घेतला.
नांदेड शहरातील गोपाळनगर सांगवी बुद्रुक येथे राहणारे सुनील नारायण मोरे वय ४२, यांनी शुक्रवारी सकाळी आपल्या मोबाईलवर व्हाट्सअप स्टेटस ठेवून आपण स्वतः आत्महत्या करत असल्याचे नमूद केले होते. २०२३ ते २०२५ या कालावधीमध्ये वेगवेगळ्या चौकशी करून वेगवेगळ्या काही गोष्टीमध्ये तक्रारी करून हदगावचे गटशिक्षणाधिकारी किशन फोले, विस्तार अधिकारी सूर्यकांत बाचे, केंद्रप्रमुख शिवाजी कदम आणि त्यांचे सहकारी दत्ता विश्वंभर पवळे यांनी त्यांच्या बाबतीतल्या अनेक गोष्टी कौटुंबिक असतील त्या सार्वजनिक करून त्यांचा अनेक ठिकाणी अपमान केला होता. त्याचवेळी व्हाट्सअप स्टेटसवर त्यांनी पुणेगाव नदी ब्रिज असा मजकूरही टाकला होता. त्यामुळे वडील नारायण मोरे यांनी आपला मुलगा सुनील मोरे यांना फोन केला असता ते म्हणाले मला खूप त्रास झाला आहे. मला जगायचे होते पण समाजात माझं कसं, माझ्या लेकरांच कस याचा विचार करून मला त्रास होऊ लागला. यावेळी वडील नारायण यांनी आपला मुलगा सुनील मोरे यास समजावण्याचा प्रयत्न केला तू काहीही करू नको असे सांगितले; परंतु सुनील यांनी तुम्ही येऊ नका, तुम्ही येईपर्यंत मी असणार नाही. माझ्या गाडीत मोबाईलमध्ये आणि लॅपटॉपमध्ये त्यांच्याविरुद्ध सर्व पुरावे आहेत असे म्हणून फोन कट केला. त्यानंतर नारायण मोरे आणि त्यांचे मेहुणे जयभीम संभाजी पाटील हे सकाळी नऊ वाजता भोकर येथून पुणेगाव ब्रिजकडे निघाले. परंतु तोपर्यंत उशीर झाला होता. सुनील मोरे यांनी आपली गाडी थेट गोदावरी नदीत टाकली होती. यावेळी त्यांची मुलगी सारा आणि मुलगा सुमितही सोबत होता. या घटनेत तिघांचाही मृत्यू झाला आहे. एम एच २६ सीई ४५८२ क्रमांकाची कार जीवरक्षकांनी क्रेन आणि बोटीच्या सहाय्याने बाहेर काढली असता त्यामध्ये सुनील नारायण मोरे, सुमित सुनील मोरे आणि सारा सुनील मोरे या तिघांचेही मृतदेह होते.
जवळपास आठ महिन्यापूर्वी सुनील मोरे आणि त्यांची त्यांची पत्नी धम्मशिला हे दोघेही हादगाव तालुक्यातील भानेगाव येथील जिल्हा परिषद शाळेवर शिक्षक म्हणून नोकरीला होते. त्यावेळी गटशिक्षणाधिकारी किशन फोले यांनी प्रशासकीय कारवाई करून सुनील आणि धम्मशिला यांची प्रशासकीय चौकशी लावली होती. त्या चौकशी दरम्यान गटशिक्षणाधिकारी किशन फोले, विस्ताराधिकारी सूर्यकांत बाचे, केंद्रप्रमुख शिवाजी कदम आणि दत्ता विश्वंभर पवळे यांनी मिळून सुनील मोरे यास मानसिक त्रास दिला होता. त्यामुळे सुनील मोरे हे खूप नैराश्यात गेले होते.
या सर्व बाबींना कंटाळून सुनील मोरे याने गटशिक्षणाधिकारी किशन फोले, विस्ताराधिकारी सूर्यकांत बाचे, केंद्रप्रमुख शिवाजी कदम आणि दत्ता विश्वंभर पवळे या सर्वांच्या त्रासाला कंटाळून १७ जुलै रोजी सकाळी साडेसातच्या सुमारास स्वतः आणि आपला मुलगा सुमित असेच मुलगी सारा यांना सोबत घेऊन पुणेगाव येथील गोदावरी नदीमध्ये आत्महत्या केली. याप्रकरणी आपला मुलगा सुनील मोरे आणि नातू सारा तसेच सुमित यांच्या मृत्यूस गटशिक्षणाधिकारी किशन फुले विस्तार अधिकारी सूर्यकांत भाचे केंद्रप्रमुख शिवाजी कदम आणि दत्ता विश्वंभर पवळे हे कारणीभूत असल्याने त्यांच्यावर कारवाई करावी अशी तक्रार त्यांचे पिता नारायण मोरे यांनी केली. या तक्रारीवरून नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात ॲट्रॉसिटी कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास इतवारा उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत शिंदे हे करत आहे.
या प्रकरणातील शिक्षक सुनील मोरे यांनी सकाळीच आपल्या व्हाट्सअप क्रमांकावर आत्महत्या करण्याबाबतचे स्टेटस ठेवले होते. हे स्टेटस पाहून अनेकांनी त्यांना फोन केले आणि असे कोणतेही पाऊल उचलू नको असा सल्ला दिला. वडील नारायण मोरे यांनीही सुनीलसोबत चर्चा केली. त्याचवेळी अनेकांनी प्रशासनाकडे या प्रकरणात मदत मागितली. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्यासह निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर यांनीही या प्रकरणात तातडीने पावले उचलत उपविभागीय पोलीस अधिकारी, नांदेड, मुदखेड तहसीलदार, पोलीस निरीक्षक, तलाठी मंडळ अधिकारी या सर्व अधिकाऱ्यांना घटनास्थळी पाठवत शिक्षक सुनील मोरे यांना वाचविण्यासाठी प्रयत्न करण्याचे निर्देश दिले होते. सर्व यंत्रणांनी सुनील मोरे यांचा शोध घेतला. इकडे शिक्षण विभागातूनही शिक्षणाधिकारी वंदना फुटाणे यांनाही याबाबत माहिती मिळाली असता त्यांनीही आपल्या अधिनस्त अधिकाऱ्यांना सुनील मोरे यांचा शोध घेऊन त्यांना या निर्णयापासून परावृत् करावे याबाबत सूचना केल्या होत्या; मात्र सुनील मोरे यांनी सर्वांनाच हुलकावणी देत आपल्या दोन्ही मुलांसह थेट आपली कार गोदावरी नदीत टाकली आणि यात सर्वांचाच दुर्दैवी अंत झाला. बचावासाठी धावलेले जिल्हा प्रशासन आणि नांदेड जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाला आपण सुनील मोरे यांना बचाव शकलो नाही याची खंत या क्षणालाही आहे. खुद्द शिक्षणाधिकारी वंदना फुटाणे यांच्यासह नांदेडचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले आणि निवासी उपजिल्हाधिकारी किरण आंबेकर यांनी या प्रकरणात आपण त्यांना वाचवू शकलो नाही, अशी खंत व्यक्त केली आहे. त्यात सोबत दोन मुलांचा मृत्यू झाल्याबद्दल हे त्यांनी अतिव दुःख व्यक्त केले.



