सामाजिक

नांदेड जिल्ह्यात दलितांवरील अत्याचार वाढले..!

आयसीएस वायटीएफच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर जन आक्रोश मोर्चा, ११ डिसेंबर रोजी होणार बैठक

नांदेड – नांदेड जिल्ह्यात गेल्या काही दिवसापासून दलित आणि बौद्धांवर मोठ्या प्रमाणात अत्याचार होत असून या दलितावरील हत्याकांड तसेच अत्याचाराविरुद्ध जिल्हा प्रशासनासह पोलीस प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप आयसीएस वायटीएफ च्या वतीने काढण्यात आलेल्या जनआक्रोश मोर्चाच्या वतीने करण्यात आला आहे. या सर्व घटनांमुळे दलितांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला असून या प्रकरणात तातडीने कारवाई करावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे नांदेड उत्तर जिल्हाध्यक्ष राजेश्वर हत्तीअंबीरे पालमकर यांनी केली आहे.

नांदेड जिल्ह्यात शितल मोरे या युवतीची आत्महत्या नव्हे तर तिची हत्या असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. या प्रकरणातील सर्व मुख्य आरोपीसह आरोपी, राजकीय पाठबळ मिळवणारे लोक आणि त्यांना मदत करणाऱ्यांची चौकशी करून त्यांना अटक करावी, या प्रकरणाची फास्टट्रॅक कोर्टात विशेष सुनावणी करावी अशी मागणी ही करण्यात आली आहे. नांदेड जिल्ह्यातील बोंढार हवेली येथील अक्षय भालेराव हत्याकांडाची गेल्या तीन वर्षापासून फास्टट्रॅक सुनावणी झाली नाही, ती सुनावणी तात्काळ सुरू करावी, भालेराव कुटुंबीयास पुन्हा पोलीस संरक्षण द्यावे. बोरजुनी येथील लखन भंडारे हत्या प्रकरणात विलंब करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली.

इतवारा ठाण्यांतर्गत सक्षम ताटे हत्याकांडाची सुनावणी फास्टट्रॅक न्यायालयात करावी अशी मागणी करण्यात आली आहे. हदगाव तालुक्यातील शिवपुरी येथील दयानंद कदम या तरुणाचेही हत्याकांडच असल्याची तक्रार यावेळी करण्यात आली. दयानंद कदम यांच्या वडिलांच्या तक्रारीनुसार पोलिसांनी खून, लूट, धमकी आणि गुन्हेगारी कटाचा गुन्हा दाखल नोंद केला नसल्याची तक्रार करण्यात आली.

या मोर्चादरम्यान पोलिसांच्या कार्यपद्धतीवर तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. तक्रारदारांना ठाण्यामध्ये बसवून ठेवणे, चुकीची कलमे लावणे, दलित हत्याकांड आणि अत्याचारांमध्ये पोलिसांनी वेगवेगळे तर्क लावून प्रकरण कमजोर करू नये, तक्रारदाराच्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करावा, पंचनामा पीडित कुटुंबीयांच्या उपस्थितीत करावा, सर्व गुन्ह्यांची तपास प्रक्रिया वेगवान, पारदर्शक आणि कायदेशीरदृष्ट्या सक्षम करावी, संवेदनशील प्रकरणात विशेष महिला सुरक्षा पथक, सीसीटीव्ही आणि तात्काळ प्रतिसाद यंत्रणा सुरू करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली.

निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर यांना मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष राजेश्वर हत्तीअंबीरे आयसीएस वायटीएफचे दीपक मगर, विनय मोरे, शुभम गजभारे, निखिल अवसरे, देवानंदराव पाईक, सुशील भालेराव, माधव जमदाडे, मोहन कांबळे, रावसाहेब कदम, संदीप दवणे, हिदायत खान पठाण, रविराज दूधकवडे आदींची उपस्थिती होती. नांदेड जिल्ह्यातील या सर्व प्रकरणांमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयात एक बैठक घेऊन सर्व प्रकरणांचा आढावा घेतला जाईल, असे आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!