
नांदेड – नायगाव तालुक्यातील नरसी येथे बसस्थानकासमोरील आनंद लॉज आणि आशीर्वाद लॉजवर पोलिसांनी धाड टाकून सुरू असलेल्या कुंटणखान्याचा पर्दाफाश केला आहे. शनिवारी झालेल्या या कारवाईत लॉज मालक पांडुरंग शिवराम श्रीरगिरे याच्यासह १० जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. स्थानिक गुन्हा शाखेअंतर्गत असलेल्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने ही कारवाई केली आहे.
पोलीस पथकाला मिळालेल्या खात्रीशीर माहितीनुसार रामतीर्थ पोलीस ठाणे हद्दीतील नरसी बस स्थानकासमोरील आशीर्वाद लॉज आणि आनंद लॉज येथील मालक पांडुरंग शिवराम श्रीरगिरे हा बाहेरील राज्यातील महिलांना आणून त्यांच्याकडून बळजबरीने वेश्याव्यवस्था करून घेत आहे. या माहितीच्या आधारे पोलीस अधीक्षक डॉ. निलाभ रोहन, बिलोलीचे पोलीस उपाधीक्षक श्याम पानेगावकर यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक तयार करण्यात आले. या कारवाईदरम्यान पोलिसांनी शासकीय पंचासमक्ष दोन सामाजिक कार्यकर्त्यांना बोगस गिऱ्हाईक म्हणून सदर लॉजवर पाठवले. तेथे जाऊन अनैतिक कृत्यासाठी इसम निश्चित करताच पोलिसांना ठरविल्याप्रमाणे त्यांनी इशारा केला. इशारा मिळताच पोलिसांनी या दोन्ही लॉजवर छापा मारला. त्यावेळी राहुल कोलते, विश्वंभर गाडे रा. चिलपिंपरी मुदखेड, बालाजी सूर्यवंशी, खाकीबा सूर्यवंशी, पांडुरंग शिवराम श्रीरगिरे, नरसिंग ठाकूर उर्फ परदेशी सर्व रा. नरसी, प्रवीण वारणलवार रा. मदनुर, कृष्णा देशपिठवार रा. तेल्लूर, वेंकट नारे रा. नरसी आणि विकी इंदुरकर रा. हडको हे आढळून आले.
या कारवाईत परिविक्षाधीन पोलीस उपाधीक्षक वैभव पडवळ, गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक अतुल भोसले, रामतीर्थ पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक विक्रम हराळे, उपनिरीक्षक साईनाथ पुयड, मिलिंद सोनकांबळे, पोलीस अंमलदार कौठेकर, बामणे, शेख उमर, लोसरवार, कुलथे, अझरुद्दीन बिरादार, स्वामी, माने, राठोड, जोंधळे, जाधव, लोणे, देवकते, मापोकॉ सूर्यवंशी यांच्यासह अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या महिला उपनिरीक्षक अश्विनी गायकवाड, पोहेकॉ मोरे, केंद्रे यांचा समावेश होता.
या कारवाईदरम्यान एकूण सात पीडित महिलांची सुटका करण्यात आली. त्यामध्ये नांदेडचा पश्चिम बंगालमधील महिलांचा समावेश होता. या महिलांना पैशाचे अमिष दाखवून बळजबरीने अनैतिक कृत्य करून घेत होते. या कारवाईदरम्यान पोलिसांनी रोख रक्कम, मोबाईल फोन असा एकूण २ लाख ४ हजार ८० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी महिला पोलीस उपनिरीक्षक अश्विनी गायकवाड यांच्या तक्रारीवरून लॉजमालकासह दहा जणांविरुद्ध रामतीर्थ पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नांदेडमध्ये अशाच एका कारवाईदरम्यान आसाम येथील महिलांची सुटका करण्यात आली होती.



