
नांदेड – जिल्हा पोलीस दलाच्या ऑपरेशन फ्लॅश आउट योजनेअंतर्गत २५ डिसेंबर रोजी शिवाजीनगर पोलिसांनी नवा मोंढा येथे स्वस्त धान्याचे १० लाख २० हजार रुपयांचे गहू आणि तांदूळ पकडले आहेत. या कारवाईत पोलिसांनी ५१ लाखांची पाच वाहने जप्त केली आहेत. या स्वस्त धान्य प्रकरणी पोलिसांनी नांदेड तहसील कार्यालयाचा अहवाल मागितला आहे. या अहवालानंतर पुढील कारवाई केली जाईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी ऑपरेशन फ्लश ऑऊट अंतर्गत जिवनावश्यक वस्तु कायद्यानुसार कारवाई करण्याबाबत आदेश दिले होते. त्या अनुषंगाने २५ डिसेंबर रोजी पोलीस अधिक्षक नांदेड यांना मिळालेल्या माहितीनुसार शिवाजीनगर पोलीस स्टेशन अंतर्गत नवीन मोंढा या ठिकाणी पाच वाहने थांबलेली आहेत. सदर वाहनांमध्ये स्वस्त धान्य दुकानातील गहू व तांदुळ असल्याबाबतची माहिती मिळाली. शिवाजीनगर पोलीस ठाणे येथील अधिकारी व कर्मचारी लगेच जावून मराठा गर्ल्स हॉस्टेलजवळ नवीन मोंढा येथे तपासणी केली असता एका महिंद्रा वाहन क्रमांक एम.एच २६ सी.एच ९२९७ मध्ये ६५० पोते तांदूळ प्रत्येकी पोते वजन अंदाजे ५० किलो किमंती अंदाजे १००० रुपये असे एकूण ६ लाख ५० हजार रुपये व गाडीची किमंत अंदाजे २० लाख रुपये असा एकूण २६ लाख ५० हजार रुपये तसेच एक आयचर वाहण क्रमांक एम. एच २६ एच ८०७३ मध्ये १२० पोते तांदूळ प्रत्येकी पोते वजन अंदाजे ५० किलो किमंती अंदाजे १००० रुपये असे एकूण १ लाख २० हजार रुपये व गाडीची किमंत अंदाजे १० लाख रुपये असा एकूण ११ लाख २० हजार रुपये, एक ट्रक टाटा २५१५ वाहन क्रमांक एम. एच २६ ए.डी. १४५८ मध्ये १३० पोते तांदूळ प्रत्येकी पोते वजन अंदाजे ५० किलो किमंती अंदाजे १००० रुपये असे एकूण १ लाख ३० हजार रुपये व गाडीची किमंत अंदाजे १५ लाख रुपये असा एकुण १६ लाख ३० हजार रुपये, एक अशोक लेलँड वाहन क्रमांक एम.एच २६ ए.डी. ८०९६ मध्ये ६० पोते तांदूळ प्रत्येकी पोते वजन अंदाजे ५० किलो किमंती अंदाजे १००० रुपये असे एकूण ६० हजार रुपये व गाडीची किमंत अंदाजे ३ लाख रुपये असा एकूण ३ लाख ६० हजार रुपये आणि एक अशोक लेलैंड बडा दोस्तमध्ये वाहन क्रमांक एम.एच ४७ ए.एस.१७७१ मध्ये ६० पोते तांदूळ प्रत्येकी पोते वजन अंदाजे ५० किलो किमंती अंदाजे १००० रुपये असे एकूण ६० हजार रुपये व गाडीची किमंत अंदाजे ३ लाख रुपये असा एकूण ३ लाख ६० हजार रुपये असा एकुण ६१ लाख २० हजार रुपयाचा संशयित माल मिळून आल्याने पाच वाहने ताब्यात घेवून नांदेड शहरातील शिवाजीनगर पोलीस ठाणे येथे लावण्यात आले आहेत. सदर प्रकरणी पुरवठा विभागाचा अहवाल मागवून पुढील कारवाई करण्यात येणार आहे.
- सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, अप्पर पोलीस अधीक्षक सुरज गुरव, सहाय्यक पोलीस अधीक्षक किरतिका सी.एम. उपविभाग नांदेड शहर, उपविभागीय पोलीस अधिकारी उपविभाग इतवारा विभाग सुशील नायक ल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक तांदळे, स.पो.नि. रामेश्वर तुरनर, पो.उप.नि.गांवडे, पो.हे.कॉ. झांबरे, पो.कॉ. सिंगल, पो.कॉ. वडजे, पो.कॉ. गफार, पो.कॉ. पाटील, पो.कॉ. गिनेवाड, पोकॉ. स्वामी म.पो.कॉ. जानगेवाड यांनी पार पाडली.
स्मरण पत्र देऊनही पुरवठा विभागाचा अहवाल मिळेना..! स्वस्त धान्याचा काळाबाजार करण्यासाठी नांदेडमधील एका प्रसिद्ध धार्मिक स्थळाचे बनावट कागदपत्रे बनवून अत्यावश्यक वस्तू तांदळाची वाहतूक केल्याप्रकरणी अर्धापूर पोलिसांनी १ सप्टेंबर २०२४ रोजी ऑपरेशन फ्लश आउट अंतर्गत कारवाई केली होती. एमएच २२ एए ३३३६ या क्रमांकाच्या ट्रकमध्ये संशयित राशनचे धान्य जात असताना पोलिसांनी ७ लाख ९६ हजार ४८५ रुपयाचा तांदूळ जप्त केला. या प्रकरणात अर्धापूर पोलिसांनी कपिल पोकर्णा, शेख जाकीर शेख वझिरोदिन, याया खान पठाण रौफखान पठाण आणि शेख सोहेल शेख वझिरोदिन या चौघाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणातही अर्धापूर पोलिसांनी अर्धापूर तहसील कार्यालयाला पकडलेल्या धान्याविषयीचा अहवाल मागितला आहे. मात्र हा अहवाल अद्यापही अप्राप्तच आहे. अनेक स्मरणपत्र देऊनही अहवाल दिला जात नसल्याने पुढील कारवाई रखडली आहे. त्यामुळे आता २५ डिसेंबर रोजी नांदेड तहसील कार्यालयाकडून नवीन मोंढा भागात पकडलेल्या या पाच वाहनातील स्वस्त धान्य प्रकरणी अहवाल कधी मिळतो याकडे लक्ष लागले आहे.