नांदेड – नांदेड महापालिकेतील नऊ जणांना पदोन्नती देण्याचे आदेश महापालिका आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांनी गुरुवारी काढले आहेत. या आदेशान्वये विधी अधिकारी स. अजितपालसिंघ संधू आणि सहाय्यक आयुक्त संजय जाधव यांना आता उपायुक्तपदी पदोन्नती मिळाली आहे. तर डॉ. फरहतउल्ला बेग, गुलाम सादेख, रमेश चौरे यांनाही उपायुक्त समकक्ष पदावर पदोन्नती मिळाली आहे. महापालिकेतील अन्य चौघांनाही पदोन्नती देण्यात आली आहे.
महापालिकेचे तत्कालीन आयुक्त डॉ. सुनील लहाने यांनी शिपाई पदापासून सुरू केलेली पदोन्नतीची प्रक्रिया आता अधिकारी संवर्गापर्यंत पोहोचली आहे. कर्मचारी हिताचे निर्णय घेण्याचा चांगला पायंडा डॉ. सुनील लहाने यांनी पाडला होता. तोच पायंडा पुढे घेऊन जात विद्यमान आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांनीही कर्मचारी हिताचे निर्णय सातत्याने घेतले आहेत. कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या प्रश्नांविषयी आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांनी घेतलेली सकारात्मक भूमिका कर्मचाऱ्यांमध्ये नेहमीच आनंद निर्माण करणारी ठरली आहे.
तत्कालीन आयुक्त डॉ. सुनील लहाने यांनी शिपाई ते लिपिक अशी पदोन्नती केली होती. त्यापुढे जाऊन डॉ. महेशकुमार डोईफोडे यांनी लिपिक संवर्गातून वरिष्ठ लिपिक पदी पदोन्नती दिली. त्याचवेळी वरिष्ठ लिपिक संवर्गातील कर्मचाऱ्यांना अधीक्षकपदी नेमणूक देण्यात आली आहे. त्यामध्ये कर्मचाऱ्यांना मिळालेली ही पदोन्नती प्रक्रिया आता आज अधिकाऱ्यांपर्यंतही पोहोचली आहे. महापालिकेचे विधी अधिकारी स.अजितपालसिंघ संधू यांना उपायुक्तपदी नेमणूक मिळाली आहे. तर निवृत्तीच्या उंबरठ्यावर असलेले आणि वाघाळा नगरपालिकेतील कर्मचारी असलेले व पदोन्नतीचा लाभ मिळालेले एकमेव संजय जाधव यांनाही उपायुक्तपदी पदोन्नती देण्यात आली आहे. त्यामुळे महापालिकेच्या अधिकारी संवर्गातही समाधान व्यक्त केले जात आहे.
सहाय्यक आयुक्त असलेले डॉ. मिर्झा फरहतउल्ला बेग यांना मुख्य उद्यान अधीक्षकपदी पदोन्नती देण्यात आली आहे. रमेश चौरे हे आता क्रीडा अधिकारी म्हणून पदोन्नत झाले आहेत. त्याच वेळी गुलाम सादेख यांना मालमत्ता विनियोग अधिकारी म्हणून पदोन्नती देण्यात आली आहे. महापालिकेतील आर. के. संगमवार आणि रणजीत जोंधळे यांना अनुरेखक पदी तर सहाय्यक ग्रंथालय अधिकारी म्हणून श्रीनिवास इज्जपवार तसेच स्वच्छता अधिकारी म्हणून बालाजी देसाई यांनाही पदोन्नतीचा लाभ मिळाला आहे. अधिकारी संवर्गातील नऊ जणांना पदोन्नती देण्याचे आदेश आज गुरुवारी आयुक्त डॉ. डोईफोडे यांनी दिले आहेत. त्यांच्या या निर्णयाचे सर्वत्र स्वागत होत आहे. अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांमध्ये आनंद व्यक्त केला जात आहे.
नांदेड महापालिकेचा आकृतीबंध मंजूर झाल्याने अधिकारी कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीचा मार्ग मोकळा झाला. कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग ही लागू करण्यात आला. नांदेड महापालिकेत प्रशासकीय काळात अधिकारी कर्मचाऱ्यांचे अनेक प्रश्न मार्गी लागले आहेत. महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम यांनीही या पदोन्नती प्रकरणात सकारात्मक भूमिका ठेवत पुढाकार घेतला होता.