
नांदेड – हौशा गौशांची मानली जाणारी माळेगाव यात्रा रविवारपासून सुरू झाली आहे. या यात्रेत चोरटेही मोठ्या प्रमाणात सक्रिय असतात हे सर्वश्रुत आहे. ही बाब चोरट्यांनी पहिल्याच दिवशी सिद्ध केली असून चोरट्यांनी सलामी देताना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल यांचे स्वीय सहाय्यक बालाजी नागमवाड यांची तब्बल चार तोळ्यांची सोन्याची साखळी काही क्षणातच लांबवली. त्याचवेळी जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण आणि बांधकाम सभापती संजय पाटील यांचे पाकीटही पालखी दर्शनाच्या वेळी चोरट्याने लंपास केले. त्यामुळे माळेगाव यात्रेत चोरट्यांची सक्रियता किती वेगवान आहे हे पहिल्या दिवशीच स्पष्ट झाले आहे.
माळेगावात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त राहील हे वारंवार स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र चोरट्यांची हातचलाखी ही काही क्षणातच दिसून येते. माळेगाव यात्रेच्या पहिल्या दिवशी काल रविवारी पालखी सोहळा होता. मानाची पालखी ही माळेगाव विश्रामगृह येथे पोहोचली. पालखी दर्शनाला राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांची उपस्थिती होती. त्याचवेळी त्यांच्यासोबत स्थानिक आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर, आमदार आनंदराव पाटील बोंढारकर, जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सामान्य राजकुमार मुक्कावार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी पंचायत मंजूषा कापसे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगिता देशमुख, प्राथमिक शिक्षणाधिकारी सविता बिरगे, पाणी पुरवठा कार्यकारी अभियंता अमोल पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी नारायण मिसाळ, अमित राठोड आदींची उपस्थिती होती. सहकार मंत्री, आमदार उपस्थित असल्यामुळे त्यांच्या संरक्षणासाठी पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांची नेमणूक या ठिकाणी होतीच. त्याचवेळी पालखी सोहळा सुरळीत पार पाडण्यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस अधिकारी, कर्मचारी तैनात केलेले होते. मानाची पालखी विश्रामगृहाजवळ पोहोचली. यावेळी मानकऱ्यांचा सत्कार केला जात होता. पालखी दर्शनासाठीही या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली. या गर्दीचा फायदा घेत त्या ठिकाणी उपस्थित असलेले मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल यांचे स्वीय सहाय्यक बालाजी नागमवाड यांच्या गळ्यातील सोन्याची साखळी चोरट्याने पाहता क्षणीच लंपास केली. ही बाब लगेच नागमवाड यांच्या लक्षात आली. त्यांनी शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र चोरटा त्या ठिकाणाहून फरार झाला होता. पालखी सोहळ्याचे छायाचित्रण करणारे अनेक कॅमेरे तेथे होते. त्या कॅमेऱ्यांच्या माध्यमातून चोरट्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला मात्र माळेगावमधील चोरटे हाती लागतील ते चोरटे कसे..? असेच म्हणावे लागेल.
माळेगाव यात्रेत चोरीचे प्रकार रोखण्यासाठी पोलिसांना सतर्क रहावे लागणार आहे. माळेगावतील गर्दी आणि पोलिसांचे प्रमाण लक्षात घेता चोरट्यावर आळा घालणं ही बाबही निश्चितच अवघड म्हणावी लागेल. त्यामुळे यात्रेत जाणाऱ्या प्रत्येक भाविकाने आपला खिसा, मोबाईल व दागिने सुरक्षित राहतील याची काळजी स्वतःच घ्यावी लागेल हेही खरे आहे.
माजी सभापती संजय पाटील कऱ्हाळे यांनाही फटका..! रविवारी पालखी सोहळ्यादरम्यान माळेगाव विश्रामगृहावरच जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण व बांधकाम सभापती संजय पाटील कऱ्हाळे यांनाही चोरट्याने हिसका दाखवला. त्यांच्या खिशातील पाकीट लंपास केले. पाकिटात मोठी रक्कम होती. त्यामुळे चोरट्यांनी पहिल्याच दिवशी दोन बड्या मंडळींना आपला हिसका दाखवत यात्रेत आगामी काळात काय चित्र असेल याची चुणूकच दाखविली आहे. या प्रकरणात नागमवाड यांनी पोलिसांकडे तक्रार दिली आहे. तर सभापती संजय पाटील कराळे यांनी मात्र झाले गेले म्हणून या विषयात तक्रार करण्यास टाळाटाळ केली आहे.



