
नांदेड – नांदेड महापालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी २० नोव्हेंबर रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. या मतदार यादीवर २७ नोव्हेंबरपर्यंत आक्षेप घेता येणार आहेत. या आक्षेपादरम्यान नांदेड महापालिकेच्या मतदार यादीत पश्चिम बंगालचे जवळपास ७०० ते ८०० मतदार असल्याचा धक्कादायक आक्षेप नोंदविण्यात आला आहे. त्याचवेळी एकाच घर क्रमांकावर ५५ हून अधिक मतदारांची नोंद आहे तसेच घर क्रमांक नसलेल्या मतदारांचीही मोठी संख्या आढळली आहे. मतदार यादीत या प्रभागातील नावे त्या प्रभागात असा प्रकारही उघडकीस आला आहे. माजी नगरसेवक तुलजेश यादव यांनी या सर्व प्रकाराबाबत वजीराबाद आणि इतवारा क्षेत्रीय कार्यालयात आक्षेप दाखल केले आहेत.
महापालिका निवडणुकीसाठी २० नोव्हेंबर रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. या प्रारूप मतदार यादीत ५ लाख १ हजार ८०३ मतदारांचा २० प्रभागात समावेश आहे. या प्रारूप मतदार याद्या महापालिकेच्या मुख्यालयासह क्षेत्रीय कार्यालय आणि महापालिकेच्या वेबसाईटवरही उपलब्ध आहेत या प्रारूप मतदार याद्यावर नागरिकांना २७ नोव्हेंबरपर्यंत आक्षेप हरकती दाखल करता येणार आहेत. या आक्षेप आणि हरकती त्या त्या क्षेत्रीय कार्यालयात दाखल करता येतील. यासाठी नागरिकांना प्रपत्र आणि ब मध्ये आपले आक्षेप, सूचना दाखल करता येतील. प्रपत्र अ मध्ये स्वतःबाबत तर प्रपत्र ब मध्ये इतराबाबत आक्षेप घेता येतील.
नांदेड महापालिकेच्या प्रारूप मतदार यादीवरील आक्षेपांची प्रक्रिया सुरू असताना शिवसेना शिंदे गटाचे शहर प्रमुख तुलजेश यादव यांनी २४ नोव्हेंबर रोजी वजीराबाद आणि इतवारा क्षेत्रीय कार्यालयात आपले आक्षेप नोंदवले आहेत. या आक्षेपामध्ये त्यांनी प्रभाग क्रमांक १५ मध्ये होळी, मन्यार गल्ली या भागातील यादी क्रमांक १४९, १५० मध्ये ७०० ते ८०० नावे ही पश्चिम बंगालमधील मतदारांची असल्याचा आक्षेप दाखल केला आहे. त्याचवेळी एकाच घर क्रमांकावर तब्बल ५५ मतदारांची नावे यादीमध्ये समाविष्ट केल्याची बाबही पुढे आणली आहे. तसेच मतदार याद्यावर घर क्रमांक नसतानाही अनेक मतदारांची नावे यादीत समाविष्ट केली आहेत. हा आकडा एक प्रभागात ३ हजार पर्यंतचा आहे. एका प्रभागात ३ हजार मतदार असतील तर संपूर्ण महापालिका क्षेत्रातील मतदारांचा हा आकडा किती असेल असा सवालही शिंदे गटाचे शहर प्रमुख यादव यांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे महापालिकेच्या मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात घोळ असल्याचा आरोप यादव यांनी केला आहे.
दुसरीकडे ११ नोव्हेंबर रोजी झालेल्या आरक्षण सोडतीचा निकाल १७ नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध करण्यात आला होता. या प्रारूप आरक्षणावर २४ नोव्हेंबरपर्यंत हरकती आणि सूचना मागवण्यात आल्या होत्या. महापालिकेच्या आरक्षणावर २४ नोव्हेंबरपर्यंत एकूण १० आक्षेप निवडणूक विभागाकडे प्राप्त झाले आहेत. या आक्षेपावर आता १ डिसेंबर २०२५ रोजी निर्णय घेतला जाईल. अंतिम आरक्षण हे २ डिसेंबर रोजी राजपत्रात अधिसूचनेद्वारे प्रसिद्ध केले जाईल, अशी माहिती निवडणूक विभागाचे उपायुक्त नितीन गाढवे यांनी दिली.
संपूर्ण देशभर मतदार याद्यांचा घोळ आणि मतचोरीबाबत तक्रारी सुरू असताना नांदेडमध्येही मतदार याद्यांमध्ये एकाच ठिकाणी एकाच घर क्रमांकावर ५० ते ५५ मतदारांची नावे आढळून आली आहेत तसेच अनेक मतदार हे कोणताही घर क्रमांक नसलेल्या ठिकाणी नोंदवण्यात आले आहेत. पश्चिम बंगालमधील मतदारांचाही या यादीत समावेश असल्याची तक्रार केली आहे. त्यामुळे देशभरातील हा मुद्दा आता थेट नांदेडपर्यंत पोहोचला आहे. या आक्षेपाबाबत नांदेड महापालिका अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता मतदार याद्या या आम्हाला निवडणूक आयोगाकडून प्राप्त झाल्या आहेत. या मतदार याद्यामध्ये कोणताही बदल करणे स्थानिक पातळीवर शक्य नाही. एखाद्या मतदाराचे नाव या प्रभागातून त्या प्रभागात बदलणे शक्य आहे; मात्र नाव वगळण्याचे कोणतेही अधिकार स्थानिक पातळीवर नाहीत. केंद्रीय निवडणूक आयोगाकडेच हे अधिकार आहेत. मतदार याद्यावरील आक्षेपांची निश्चितपणे दखल घेतली जाईल, आलेल्या आक्षेपांची पडताळणीही केली जाईल.



