
नांदेड – भरधाव वेगातील एका ट्रकने बारड येथे आठ दुचाकींना चिरडल्याची घटना मंगळवारी सकाळी आठ वाजेदरम्यान घडली. या घटनेत एकाचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेत अनेकजण जखमी झाले असून त्यांना बारड येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मंगळवारी सकाळी भोकरहून नांदेडकडे जात असलेल्या एमएच ३४ बीजी ७४२३ क्रमांकाच्या मालवाहू ट्रकच्या चालकाचा बारड येथे ट्रकवरील ताबा सुटला. ट्रकचे ब्रेक फेल झाले, चालकाला डूलकी लागली या किंवा कारणामुळे त्याचा ताबा सुटला आणि त्याच्या ताब्यातील ट्रकने बारड चौकातील जवळपास आठ दुचाकींना चिरडले. या घटनेत गोविंद रामजी कोडेवाड (वय ४०, रा. खरबी, ता. भोकर) यांचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेत जखमी झालेल्यांना बारड येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.