
नांदेड – नांदेड जिल्ह्यात अवैध मार्गाने वाळू उपसा आणि वाहतूक करून शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडविणाऱ्या वाळूमाफियावर पोलीस विभागाकडून ६ फेब्रुवारी रोजी आणखी एक कारवाई करण्यात आली आहे. स्थानिक गुन्हा शाखेचे पथक, नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि अंमलदार यांनी अवैध वाळू उपसा सुरू असलेल्या घाटावर कारवाई करण्यासाठी विष्णुपुरी शिवारात गोदावरी नदीकाठी कल्हाळ गावच्या शिवारात गोदावरी नदीपात्रातून अवैध वाळू उपसा करणाऱ्या दोन लोखंडी बोट ज्यावर इंजिन लावले होते अशा बोटी जप्त करण्यात आल्या आहेत. या प्रकरणी तिघांवरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांनी या कारवाईत एकूण ५७ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तिघा जणांसह महसूल विभागाने वाळू उपसासाठी परवानगी दिलेल्या डेपोधारकाविरुद्धही पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे हेही विशेष. आता या डेपो धारकाविरुद्ध महसूल विभाग नेमकी काय कारवाई करेल याकडेही लक्ष लागले आहे.
जिल्ह्यात वाळू माफियाकडून अवैध मार्गाने वाळू उपसा आणि वाहतूक करून शासनाचा लाखो रुपयांचा कर बुडवला जात असल्याने पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांच्या आदेशानुसार जिल्ह्यात ठिकठिकाणी पोलीस दलाकडून कारवाया केल्या जात आहेत. ६ फेब्रुवारी रोजी दुपारी १२ ते दुपारी ४ वाजे दरम्यान स्थानिक गुन्हा शाखेचे पथक, नांदेड ग्रामीण ठाण्यातील अधिकारी यांनी अवैध वाळू उपसा होत असलेल्या घाटावर कारवाई सुरू केली. विष्णुपुरी शिवारात गोदावरी नदी काठावर आणि कल्हाळ गावच्या शिवारात गोदावरी नदी पात्रातून अवैध वाळू उपसा करणाऱ्या दोन ठिकाणी छापा मारून कारवाई करण्यात आली. या दोन ठिकाणी दोन लोखंडी बोट ज्यांची किंमत २० लाख रुपये यावर इंजिन लावले होते असे जप्त केल्या आहेत. यावेळी पोलिसांनी १०५ ब्रास रेतीही जप्त केली आहे. एक जेसीबी मशीन ज्याची किंमत २० लाख रुपये, तीन लोखंडी क्रेन आणि लोखंडी पाईप, १५ तराफे असा मुद्देमाल जप्त केला होता. हा सर्व मुद्देमाल पोलिसांनी जागीच नष्ट केला आहे. पोलिसांनी तब्बल ५७ लाख २० हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करून महसूल अधिकारी आणि अंमलदार यांना बोलावून पंचनामे केले आहेत. या प्रकरणात नांदेड ग्रामीण ठाण्यातील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक माधव गवळी यांच्या तक्रारीवरून चंद्रा गोविंद क्षीरसागर, भानुदास यशवंत क्षीरसागर व माँटेसिंग सर्व रा. कल्हाळ ता. जिल्हा नांदेड आणि शेख मेहराजोद्दीन शेख निजामुद्दीन रा. विष्णुपुरी याच्याविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. विशेष म्हणजे शेख मेहराजुद्दीन याला महसूल विभागाने वाळू डेपो परवानाधारक आहे त्याच्याकडूनही मोठ्या प्रमाणात अवैधरित्या वाळू उपसा केला जात होता. याच डेपो धारकाला महसूल विभागाने गेल्या दोन वर्षात अनेक नोटिसा बजावल्या होत्या. मात्र या नोटीसाना शेख मेहराजुद्दीन याने कोणतेही उत्तर दिले नाही. इतकेच नव्हे तर किती वाळू उपसा केला, किती घरकुलाना वाळू दिली याची माहितीही अधिकाऱ्यांना दिली नव्हती. तरीही त्याचा डेपो परवाना सुरूच होता. अखेर पोलिसांनी त्याच्याविरुद्धही गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गाढवे आणि पोलीस उपनिरीक्षक चव्हाण यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. ही कारवाई सहायक पोलीस निरीक्षक सुरेश माटे, पोलीस उपनिरीक्षक साईनाथ बालाजी कदम, पोकॉ विलास कदम, संदीप घोगरे, पोकॉ घेवारे, सहायक पोलीस उपनिरीक्षक माधव गवळी, पोहेकॉ ज्ञानेश्वर तिडके आदींनी केली आहे. या कारवाईसाठी पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांच्यासह अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव, खंडेराव धरणे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुशीलकुमार नायक, पोलीस निरीक्षक उदय खंडेराय, ओमकांत चिंचोलकर यांचे मार्गदर्शन लाभले.
जिल्ह्यातील अनेक भागात वाळू माफिया हैदोस घालत असताना महसूल विभागाची निद्रावस्था अजूनही जात नसल्याचीच परिस्थिती आहे. पोलीस विभागाकडून एकापाठोपाठ एक कारवाया होत असल्या तरीही स्थानिक स्तरावर तलाठी, मंडळ अधिकारी वाळू माफियांशी हातमिळवणी करून गप्प आहेत. तर महसूल विभागाचे वरिष्ठ अधिकारीही याबाबतीत झोपेचे सोंग घेत असल्याचेच स्पष्ट झाले आहे. त्यामुळे नांदेड जिल्ह्यात वाळू माफियांना आळा घालण्यासाठी महसूल विभागाचे अस्तित्व आहे की नाही असाच प्रश्न निर्माण झाला आहे. नांदेड जिल्ह्यात वाळू माफियांशी महसूल विभागातील अनेक बड्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी थेट संधान साधल्याचे आरोप जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पालकमंत्री अतुल सावे यांच्या उपस्थितीत अनेक आमदारांनी केले होते. यावर पालकमंत्री सावे यांनी कठोर कारवाईचे आदेश दिले होते. त्यानंतर कारवाईला वेग आला असला तरीही जिल्ह्यात गेल्या महिनाभरापासून अवैध वाळू माफियांविरुद्ध नांदेड जिल्हा पोलिसांनी कारवाई सुरू केल्याचे दिसून येत आहे. परंतु या कारवायामध्ये महसूल विभागाची एकूणच कार्य तत्परता पोलीस विभागाने उघड केली असल्याचेही बोलले जात आहे.
जिल्ह्यात वाळूपट्टे असलेल्या निवडक तालुक्यात, महसूल मंडळात नेमणूक मिळावी यासाठी महसूल विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांमध्ये मोठी स्पर्धा आहे. या स्पर्धेतून लाखो रुपयांची उलाढालही होते. ही स्पर्धा नेमकी का आहे हे पोलीस दलाकडून केल्या जात असलेल्या कारवायातून स्पष्ट होत आहे. दरम्यान स्थानिक पोलिसांनाही वाळूमाफियाकडून मोठ्या प्रमाणात मलिदा मिळत असल्याच्या तक्रारी पुढे आल्या आहेत. मात्र जिल्हास्तरावरील आदेशानंतर आता पोलिसांनाही कारवाई करण्यास भाग पडत असल्याचेच दिसत आहे. जिल्हा पोलीस दल तसेच महसूल विभागाने आता सीमावर्ती भागातील देगलूर, बिलोली, धर्माबाद, नायगाव, मुखेड या तालुक्यातही अवैध वाळू माफियाविरुद्ध कारवाई सुरू करावी अशी मागणी जोर धरत आहे