
नांदेड – जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध वाळू उपसा आणि वाहतुकीला आळा घालण्यासाठी खुद्द पोलिस अधीक्षक अबिनाश कुमार हेच थेट अवैध वाळू उपसा सुरू असलेल्या घाटावर उतरल्यानंतर आता महसूल विभागही वाळू माफियांविरुद्ध मैदानात उतरला आहे. जिल्ह्यात यापुढे वाळू अवैध वाळू उपसा केल्यास वाळू तस्करावर थेट एमपीडीए १९८१ (महाराष्ट्र प्रोहिबिशन ऑफ डेंजरस अॅक्टिविटी) अन्वये गुन्हा दाखल करू, त्याचवेळी वाळू उपसा करण्यासाठी आणलेल्या बिहारी टोळ्यांना आसरा देणाऱ्यांवरही थेट कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. महसूल विभागाने गेल्या पाच दिवसापासून धडक कारवाई करत गोदावरी काठावरील अवैध वाळूची जप्तीची कारवाई सुरू केली आहे.
जिल्ह्यात गोदावरी नदी काठावर बिहारी मजुराच्या मदतीने अनेक वाळू तस्करांनी, नदी काठावरील शेतकऱ्यांनी अवैधरित्या आपली शेतजमीन वाळूचा अनधिकृत साठा साठवण्यासाठी तसेच बिहारी मजुरांना वास्तव्य करण्यासाठी भाड्याने जमीन दिली आहे. ही कृती म्हणजे थेट वाळू तस्करांना मदत करणारीच आहे. या सर्वांची महसूल खात्याने गंभीर दखल घेतली आहे. ४ फेब्रुवारी रोजी महसूल खात्याच्या पथकाने तीन मोठे इंजिन जप्त करून वाळू माफियांवर लिंबगाव पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला आहे. तसेच नदीकाठावरील भनगी, वाहेगाव, गंगाबेट, विष्णुपुरी, थूगाव, कल्हाळ, लोहा तालुक्यातील बेटसांगवी, पेनुर इत्यादी गावांमधील अवैध वाळूसाठा मागच्या तीन दिवसापासून जप्त करून पुढील कारवाई केली जात आहे. आतापर्यंत ३०० ब्रास वाळू जप्त केली आहे. हे काम अजून पुढे दोन-तीन दिवस चालणार आहे. यापुढेही महसूल विभागाकडून वाळू माफियांवर अविरत कारवाई सुरूच राहणार आहे.
या कारवाईनंतरही वाळू तस्करांनी गोदावरी नदीमध्ये तराफे, इंजिन टाकून वाळू उपसा केल्यास, नदीकाठच्या शेतकऱ्यांनी आपली जमीन वाळू उपसा करणारे बिहारी मजूर यांना अनधिकृतपणे झोपड्या टाकण्यासाठी दिल्यास अथवा अनधिकृतपणे अवैध वाळू वाहतूक करणारे हायवा ट्रक यांना शेतकऱ्यांनी अनधिकृत रस्ता दिल्यास अथवा वाळू तस्करांना बेकायदेशीररित्या मदत करणाऱ्या व्यक्तीवर, संबंधितावर एमपीडीए १९८१ (महाराष्ट्र प्रोहिबिशन ऑफ डेंजरस अॅक्टिविटी) नुसार गुन्हा नोंदवून कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे स्पष्ट केले. अवैध वाळू उपसा करणाऱ्यांनी याची गांभीर्याने नोंद घ्यावी असा थेट इशारा जिल्हा प्रशासनातर्फे व तालुका प्रशासनातर्फे इशारा देण्यात आला आहे.
जिल्ह्यात अवैध वाळू माफियाविरुद्धची ही मोहीम
जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, अपर जिल्हाधिकारी पांडुरंग बोरगावकर, निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर यांच्या मार्गदर्शनाखाली नांदेडचे उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ, कंधारच्या उपविभागीय अधिकारी अरुणा संगेवार यांच्या सनियंत्रणाखाली नांदेड तहसीलदार संजय वारकड, लोहा तहसीलदार विठ्ठल परळीकर यांच्या नेतृत्वाखाली पथक प्रमुख नायब तहसीलदार स्वप्निल दिगलवार, मंडळ अधिकारी नन्हू कानगुले, कुणाल जगताप, तलाठी रमेश गिरी, संताजी देवापुरकर, माधव भिसे, सरपे, रणवीरकर, खेडकर, जाधव, कदम, पोलीस पाटील शिवाजी सोनटक्के, कोतवाल बालाजी सोनटक्के इत्यादी करत आहेत.
नांदेड जिल्ह्यात महसूल विभागाकडून वाळू माफियांवर कारवाईचे सत्र सुरूच आहे; मात्र अनेकवेळा पुरेशा पोलीस बंदोबस्ताअभावी कारवाई प्रभावी ठरत नाही. जिल्ह्यात वाळू व्यवसायामध्ये शिरलेल्या गुन्हेगारी प्रवृत्ती पाहता मोठ्या पोलीस बंदोबस्तातच कारवाई करणे शक्य आहे. त्यामुळे महसूल विभागाने कारवाईसाठी पावले उचलली तरी त्याला पोलीस विभागाकडून अपेक्षित सहकार्य आवश्यक आहे. अनेकदा ते मिळत नसल्याची बाब पुढे आली आहे. आता खुद्द पोलीस विभागाचे प्रमुख आणि इतर अधिकारी वाळू माफीयांविरुद्ध कारवाई करत असल्याने या मोहिमेला निश्चितच गती येणार आहे. नूतन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनीही जिल्ह्यातील पर्यावरण संवर्धन आणि रक्षणासाठी आपले प्राधान्य राहील हे स्पष्ट केले आहे. त्यामुळे आगामी काळात जिल्ह्यातील प्रमुख नद्यांसह लहान मोठ्या ठिकाणावरून होणाऱ्या वाळू उपसावर निश्चितच नियंत्रण राहील अमाप २४ तास सुरू असलेला अमाप वाळू उपसातून होणारा पर्यावरणाचा ऱ्हास निश्चितच थांबेल, अशी अपेक्षा नांदेडकर करत आहेत.