आरोग्य

नांदेड जिल्ह्यात ‘बर्ड फ्लू’ चा प्रादुर्भाव; खबरदारीच्या उपायोजनांना प्रारंभ 

लोहा तालुक्यातील किवळा येथील दहा कि.मी.चा परिसर अलर्ट झोन म्हणून घोषित, जिल्ह्यात चार वर्षानंतर परतला बर्ड फ्लू

नांदेड – लोहा तालुक्यातील किवळा येथे कुकुट पक्षांमध्ये  २० जानेवारी रोजी मरतूक आढळला. पशुसंवर्धन विभागामार्फत मृत कुकुट पक्षांचे नमुने गोळा करून राज्यस्तरीय पशुरोग अन्वेषण प्रयोगशाळा पुणे आणि भोपाळ येथील कृषी अनुसंधान परिषद, राष्ट्रीय उच्च सुरक्षा पशुरोग संस्थान या प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते हे नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सदर कुकुट पक्षांना बर्ड फ्लूची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे  बर्ड फ्लू चा प्रसार होऊ नये, यासाठीचा लोहा तालुक्यातील किवळा येथील दहा किलोमीटर परिसरात अलर्ट झोन घोषित करण्यात आला आहे. खबरदारीच्या उपाययोजना म्हणून ५६५ कुकुट पशुसंवर्धन विभागाने ताब्यात घेतले असून त्यांची आता शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट लावली जाणार आहे. जानेवारी २०२१ मध्ये कंधार, किनवट आणि माहूर तालुक्यात बर्ड फ्लू चा प्रादुर्भाव झाला होता. आता पुन्हा चार वर्षानंतर बर्ड फ्लू चा उद्भव झाला आहे.
किवळा येथे २० जानेवारी रोजी एका मोकळ्या कुकुट पालन केंद्रातील काही कुक्कुट पक्षांमध्ये मरतूक आढळला. त्या पक्षांचे जिल्हा पशुसंवर्धन विभागाने नमुने घेऊन ते प्रयोग शाळेला पाठवले. हे सर्व नमुने आता पॉझिटिव्ह आल्याने जिल्ह्यात बर्ड फ्लूचा उद्भव झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या पार्श्वभूमीवर खबरदारीच्या उपाययोजना तातडीने हाती घेण्यात आल्या आहेत. जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या आदेशान्वये किवळा येथील परिसर दहा किलोमीटरपर्यंत अलर्ट झोन म्हणून घोषित करण्यात आला आहे. पशुसंवर्धन विभागाने तातडीने उपाययोजना हाती घेतल्या आहेत.
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण नांदेड यांनी सदर आजाराचा प्रसार होऊ नये याकरिता किवळा  येथील १० कि.मी. त्रिज्येतील क्षेत्र “सतर्कभाग अर्थात अलर्ट झोन म्हणून घोषित केले आहे. त्यामुळे प्रभावित क्षेत्राच्या ठिकाणी वाहनांच्या ये जा करण्यास मनाई करण्यात आली असून त्या ठिकाणची खाजगी वाहने प्रभावित परिसराच्या बाहेर लावण्याबाबत आदेशित केले आहे.
प्रभावित क्षेत्रात जिवंत व मृत कुक्कुट पक्षी, अंडी, कोंबडीखत, पक्षीखाद्य, अनुषंगिक साहित्य व उपकरणे ई. च्या वाहतूकीस मनाई करण्यात आली आहे. प्रभावित पोल्ट्री फार्मच्या परिसरात नागरिकांच्या हालचालीस, तसेच ईतर पक्षी आणि प्राण्यांच्या वाहतुकीस प्रतिबंध करण्यात आली आहे. प्रभावित पोल्ट्री फार्मचे प्रवेशद्वार आणि परिसर २ टक्के सोडियम हायपोक्लोराईट किंवा पोटॅशियम परमॅग्नेटने  निर्जंतुकीकरण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. प्रभावित क्षेत्राच्या ५ कि.मी. त्रिज्येतील परिसरात कुक्कुट पक्ष्यांची खरेदी-विक्रीची दुकाने, व कुक्कुट मांसाची चिकन दुकाने, वाहतूक, बाजार व यात्रा, प्रदर्शन आदी बाबी बंद राहतील, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

बर्ड फ्लू बाबत अनावश्यक भीती बाळगू नये…उकडलेली अंडी व शिजवलेले चिकन खाणे मानवी आरोग्यास पूर्णपणे सुरक्षित आहे. त्यामुळे बर्ड फ्लू रोगाबाबत अनावश्यक भीती बाळगू नये तसेच अफवा व गैरसमज पसरविण्यात येऊ नये असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. तसेच जिल्ह्यात कुठेही पक्ष्यांमध्ये असाधारण मरतुक आढळून आल्यास नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यामध्ये किंवा १९६२ या टोल फ्री दुरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन विभागाने केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!