
नांदेड – नांदेडमध्ये सोमवारी सकाळीच गोळीबाराची घटना घडली असून गोळीबाराच्या या नांदेड हादरले आहे. सोमवारी सकाळी दहाच्या सुमारास घडलेल्या या घटनेतील रवींद्रसिंघ दयालसिंग राठोड याचा मृत्यू झाला असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या गोळीबाराला जुन्या वादाची पार्श्वभूमी असल्याचेही सांगितले जात आहे. दहशतवादी रिंधाच्या भावाच्या खून प्रकरणातील एका आरोपीचा मयतात समावेश असल्याने या घटनेची गंभीरता आणखी वाढली आहे.
नांदेड शहरातील शहीदपुरा भागात सकाळी १० च्या सुमारास गुरमीतसिंघ राजासिंघ सेवादार आणि रवींद्रसिंघ दयालसिंग राठोड या दोघांवर पिस्तुलातून गोळ्या झाडण्यात आल्या. त्यात हे दोघेही गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने विष्णुपुरी येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. उपचारादरम्यान रवींद्रसिंघ दयालसिंग राठोड याचा मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले. घटनेची माहिती समजताच पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक उदय खंडेराय यांच्यासह इतर वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी धावले. घटनास्थळावर घेतलेल्या माहितीनंतर पोलिसांची पथके आरोपींच्या शोधासाठी रवाना झाली आहेत.
या घटनेत एकच शूटर होता अशी प्राथमिक माहिती असल्याचे पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी सांगितले. त्याने किती गोळ्या झाडल्या हे अद्याप स्पष्टच आहे. जखमीवरील उपचार करणाऱ्या डॉक्टरांच्या अहवालानंतर किती गोळ्या झाडल्या, हे स्पष्ट होईल असेही ते म्हणाले. या घटनेतील एकूण आरोपींची संख्या ही अद्याप अस्पष्टच आहे. जखमी झालेल्या दोघांपैकी एकजण खुनातील आरोपी असून तो २२ जानेवारीपासून पॅरालवर तुरुंगाबाहेर होता. या सर्व घटनेची प्राथमिक माहिती पोलिसांच्या हाती आली असून संध्याकाळपर्यंत सर्व घटनाक्रम स्पष्ट होईल, असेही पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी सांगितले.