शैक्षणिक

नांदेड जिल्ह्यात आजपासून १०७ केंद्रावर ४२ हजार ५२२ विद्यार्थी देणार बारावीची परीक्षा

कॉपीमुक्ती अभियान राबविण्यात येणार, बारावीच्या विद्यार्थ्यांनी तणावमुक्त वातावरणात परीक्षा द्यावी : जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

नांदेड –  जिल्ह्यात १०७ केंद्रांवर ४२ हजार ५२२ विद्यार्थी इयत्ता बारावीची परीक्षा देणार आहेत. या परीक्षा तणावमुक्त आणि निर्भय वातावरणात द्याव्यात. केवळ बारावीच नव्हे तर आयुष्यात अनेक परीक्षांना आपल्याला सामोरे जावे लागते. त्यामुळे परीक्षेचा ताण घेऊ नका,  असा सल्ला जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी दिला आहे. सोबतच प्रशासनाने काटेकोर कॉपीमुक्ती अभियान राबविण्याचे निर्देशही दिले आहेत. दरम्यान, जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांनीही एका संदेशाद्वारे परीक्षार्थीना शुभेच्छा दिल्या आहेत.
जिल्ह्यात बारावीचे एकूण २४ परीक्षा केंद्र संवेदनशील आहेत. या संवेदनशील परिक्षा केंद्रावर केंद्रसंचालक व पर्यवेक्षक बदलण्यात येणार आहेत.  जिल्ह्यात एकूण १० भरारी पथक नेमण्यात आली आहेत. या पथकात उपजिल्हाधिकारी, उपआयुक्त दर्जाचे अधिकारी नेमण्यात आले आहेत. त्यांच्याकडे प्रत्येकी २ तालुके दिले आहेत. प्रत्येक तालुक्यातून तहसिलदार व गटविकास अधिकाऱ्यांना त्यांचा तालुका क्षेत्रात भरारी पथक प्रमुख म्हणून कार्य करतील. याशिवाय २४ संवेदनशिल विशेष भरारी पथक म्हणून ५ पेपरसाठी ७ अधिकाऱ्यांचे जिल्हास्तरावरुन नियोजन करण्यात आले आहे. यात अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, समाज कल्याण अधिकारी, कृषि विकास अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. हे भरारी पथक अचानक भेटी देवून परीक्षा सुरळीत पार पडत आहेत की नाही याची पाहणी करतील. याशिवाय सर्वच १०७ केंद्रावर तालुकास्तरावर पूर्णवेळ उपस्थित राहण्यासाठी बैठे पथकाचे नियोजन तहसिलदार यांचे अधिकारात करण्यात आलेले आहे. यामध्ये तालुकास्तरावरील वर्ग-२ एक अधिकारी पथक प्रमुख म्हणून राहतील, त्यांना सहाय्य करण्यासाठी ग्रामसेवक, तलाठी, केंद्रप्रमुख, कृषि सहाय्यक यांचे पैकी २ इतर अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

पालकमंत्री अतुल सावे म्हणाले, “शिक्षण हे केवळ गुणांसाठी नाही, तर ते ज्ञानवृद्धी आणि जीवनमूल्य घडविण्याचे साधन आहे. समाजाच्या उज्जवल भविष्यासाठी माझी सर्व विद्यार्थ्यांना विनंती आहे की, त्यांनी स्वतःच्या मेहनतीवर विश्वास ठेवून, प्रामाणिक प्रयत्नांद्वारे यश संपादन करावे. आगामी परीक्षा काळात जिल्हा प्रशासन विद्यार्थ्यांच्या पाठीशी आहे आणि सर्व परीक्षा केंद्रे कॉपीमुक्त आणि भयमुक्त राहतील यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. त्यांनी सर्व शिक्षक, विद्यार्थी आणि शालेय व्यवस्थापनांनाही अभियानात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

     

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!