
नांदेड – जिल्ह्यात काम करताना राजकीय संघर्षाची वेळ आली नाही. जिल्ह्यातील राजकीय नेते मॅच्युअर आणि अनुभवी असल्याने हा प्रसंग ओढवला नाही. काहीवेळा मतभेद निर्माण झाले असले तरीही संवादातून ते दूर झाले. निवडणुकांच्या काळात असा संघर्ष होण्याची शक्यता अधिक असते; मात्र प्रशासनाने राजकीय नेत्यांना फायदेशीर ठरावेत असे आणि प्रशासकीय निर्णयातून त्यांना नुकसानदायक ठरावे असे कोणतेही निर्णय घेतले नाही. निवडणुकांच्या काळात असा संघर्षाचा प्रसंग उद्भवला होता. त्यावेळी प्रशासन आपल्या योग्य निवडणूक प्रक्रियेवर ठाम राहिले. त्यामुळे प्रशासकीय यंत्रणावरील विश्वास हा योग्य ठरला असा खुलासा मावळते जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी सोमवारी नांदेडमध्ये निरोप समारंभाच्या कार्यक्रमात केला.
जिल्हाधिकारी कार्यालयात नियोजन भवनमध्ये सोमवारी नवनियुक्त जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांचा स्वागत समारंभ व मावळते जिल्हाधिकारी तथा संभाजीनगर येथील वस्तू व सेवा कर सह आयुक्त अभिजीत राऊत यांचा निरोप समारंभ महसूल व अन्य कर्मचाऱ्यांमार्फत आयोजित करण्यात आला होता. यावेळी वस्तू व सेवा कर सह आयुक्त अभिजीत राऊत यांनी सांगितले, प्रशासकीय पातळीवर काम करताना बेसिक गोष्टीवर लक्ष द्या, आपल्या कामांची जी प्रोसेस आहे तिचे पालन करा, लोकांशी बोला असा अनुभवी सल्ला दिला. शासकीय सेवेमध्ये आपण येतो ती लोकांची सेवा करण्यासाठी. लोकांच्या मनात आपल्याबद्दल विश्वास निर्माण झाला पाहिजे. हा विश्वास कोणत्याही पुरस्कारापेक्षा मोठा असतो. खरे तर लोकाभिमुख प्रशासन निर्माण करणे ही प्रत्येक अधिकाऱ्याची जबाबदारी असते. यावेळी त्यांनी लोकाभिमुख प्रशासन ही आपल्या प्रशासकीय सेवेची ओळख बनवा, असे आवाहन यावेळी उपस्थित अधिकारी कर्मचाऱ्यांना केले.
नांदेड जिल्ह्यातील आपला कार्यकाळ कायम आठवणीत राहणारा आहे. नांदेडला आपण कधीच विसरणार नाही; कारण आपली पहिली कन्या नांदेडमध्येच जन्मली. त्यामुळे नांदेडशी आपले कायम ऋणानुबंध राहतील, असेही ते म्हणाले. नांदेडमधील प्रशासकीय कार्यकाळात जलसंधारणापासून लेंडी प्रकल्पाला गती दिल्याचा आनंद असल्याचे त्यांनी सांगितले. दोन लोकसभा निवडणुका एक विधानसभा निवडणूक, तसेच मराठवाड्यात आणि जिल्ह्यामध्ये सामाजिक आंदोलन सुरू असताना जिल्ह्यात शांतता ठेवता आली. कारण एक टीम म्हणून प्रत्येक जण काम करत होते. नव्या जिल्हाधिकाऱ्यांसोबत देखील हीच टीम काम करणार असून नांदेडमध्ये आणखीन चांगले काम होईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. आपण कायम शांततेत राहून काम करत असतो, असे अनेक जण म्हणतात. खरं म्हणजे डोके गरम ठेऊन काम केल्यास चुका होतात. त्यामुळे जर तुम्हाला चुका करायच्या नसतील तर कोणी कितीही डिवचले तरी त्याला बळी न पडता काम करा. खरं म्हणजे प्रशासकीय पदांवर प्रमुख असणाऱ्या माणसाने शांततेनेच काम केले पाहिजे. कारण तुम्ही जर अस्वस्थ झालात तर अन्य कामावर त्यांचा परिणाम होतो. नांदेडमध्ये गेल्या अडीच वर्षात अनेक चांगली कामे झाले. शासन आपल्या दारी, महासंस्कृती महोत्सव, लाडकी बहीण मेळावा असे मोठ मोठे कार्यक्रम अतिशय उत्तमरीत्या टीमवर्कने पार पडले. नांदेडच्या या टीमचे वैशिष्ट्य म्हणजे तयारी नसेल तरीही टीम भारी काम करून दाखवू शकते. नव्या जिल्हाधिकाऱ्यांसोबत सुद्धा अशाच पद्धतीने कामे सुरू राहावी अशा शुभेच्छा ही त्यांनी व्यक्त केल्या.
नवनियुक्त जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी यावेळी अभिजीत राऊत सारख्या कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांचा कित्ता गिरवायला मिळणार याचा आनंद आहे. त्यांच्याकडून आपण नेहमीच मार्गदर्शन घेत होतो. प्रशासकीय स्तरावर ते कायम मार्गदर्शक राहिले आहे. आता त्यांचेच उत्तराधिकारी म्हणून काम करताना त्यांच्यासारखे काम करणे ही जबाबदारी आहे. आपल्या सर्वांच्या सहकार्याने ही जबाबदारी पार पाडली जाईल, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.
यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल, गिरीश येवते, तहसीलदार संजय वारकड, लक्ष्मण नरमवार, माहूरचे मुख्याधिकारी विवेक कांदे, उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ, प्रवीण मेंगशेट्टे, जिल्हा पुरवठा अधिकारी रूपाली चौगुले, सहाय्यक जिल्हाधिकारी मेघना कावली, अप्पर जिल्हाधिकारी पांडुरंग बोरगावकर, सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी निमसे, सहायक जिल्हाधिकारी अनुष्का शर्मा, महापालिका आयुक्त डॉ महेशकुमार डोईफोडे, जिल्हाधिकाऱ्यांच्या सौभाग्यवती अनुराधा राऊत यांनीही विचार व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुगाजी काकडे यांनी केले. निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर यांनी प्रास्ताविक केले. आभार प्रदर्शन तहसीलदार नागमवाड यांनी केले.
या निरोप समारंभाला जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांचे आई-वडील राजेंद्र राऊत, लता राऊत व त्यांच्या पत्नी अनुराधा राऊत त्यांचे आई-वडील श्री व सौ. वानखेडे, उपजिल्हाधिकारी निवडणूक राजकुमार माने यांच्यासह सर्व उपविभागीय अधिकारी सर्व तहसीलदार सर्व नगरपालिकांचे मुख्याधिकारी महसूल कर्मचाऱ्यांच्या विविध संघटनांचे प्रमुख अनेक ज्येष्ठ नागरिक व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.