प्रशासकीय

नांदेड जिल्ह्यात इयत्ता बारावीचा इंग्रजीचा पेपर कॉपीमुक्त, तीन कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश

खुद्द जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, मुख्य कार्यकारी अधिकारी  संवेदनशील परीक्षा केंद्रावर पोहोचले, तीन केंद्र प्रमुख व ८ पर्यवेक्षकांना कारणे दाखवा नोटीस

नांदेड – जिल्ह्यातील १०७ केंद्रावर इयत्ता बारावीची परीक्षा मंगळवारपासून सुरू झाली. या पहिल्याच पेपरला खुद्द जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, पोलीस अधीक्षक अबीनाश कुमार, मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल यांच्यासह महसूल आणि पोलीस यंत्रणा शिक्षण विभागाच्या मदतीला पोहोचल्याने जिल्ह्यातील एकाही केंद्रावर कॉपीचा प्रकार चालला नाही. त्यामुळे जिल्ह्यात  बारावी परीक्षेची कॉपीमुक्त सुरुवात झाली आहे.

जिल्ह्यात बारावीच्या पहिल्याच पेपरच्या दिवशी संवेदनशील केंद्रावर जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी भेटी दिल्या. त्यामध्ये शिराढोण येथील भीमाशंकर उच्च माध्यमिक विद्यालय, पानभोसी येथील नेताजी सुभाषचंद्र बोस उच्च माध्यमिक विद्यालय आणि चिखली येथील श्री गोविंदराव पाटील उच्च माध्यमिक विद्यालय तसेच नांदेड येथील यशवंत महाविद्यालयास भेट देऊन पाहणी केली. शिक्षण विभागाचे माध्यमिक व उच्च माध्यमिक राज्य संचालक संपत सूर्यवंशी यांनी नांदेड येथील यशवंत महाविद्यालय, अर्धापूर येथील मीनाक्षी देशमुख उच्च माध्यमिक विद्यालय, कै. दिगंबररावजी देवडे उच्च माध्यमिक विद्यालय, बारड येथील श्री शिवाजी कनिष्ठ महाविद्यालय आणि भोकर येथील श्री शाहू महाराज उच्च माध्यमिक विद्यालयात भेट दिली. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल यांनी नांदेड शहरातील सायन्स महाविद्यालय, पीपल्स महाविद्यालय आणि यशवंत महाविद्यालय या परीक्षा केंद्रास भेट देऊन माहिती घेतली. पोलीस अधीक्षक अबीनाश कुमार यांनीही लोहा आणि कंधार तालुक्यातील सहा संवेदनशील केंद्रांना भेट देऊन बंदोबस्ताचा आढावा घेतला.
                                                                                जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी रुजू झाल्यानंतर पहिली कारवाई बारावीच्या परिक्षेदरम्यान हलगर्जीपणा दाखविणाऱ्या केंद्र प्रमुखावर, पर्यवेक्षकावर केली आहे. सोबतच परिक्षा केंद्रात अनधिकृतपणे उपस्थित असणाऱ्या तीन कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत. तर कॉपी पुरवणाऱ्यांवर गुन्हे दाखल केले आहे. नांदेड जिल्ह्यात कोणत्याही केंद्रावर, कुठेही कॉपी करणाऱ्यांची हयगय करू नये, पोलिसांनी सक्त कारवाई करावी. शिक्षण विभागाने आवश्यक सुविधा पूर्ण कराव्यात अशा सूचना त्यांनी केल्या आहेत.
जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी परिक्षा केंद्राना भेटी दिल्या असता परिक्षेसाठी आवश्यक असणाऱ्या सोयी-सुविधा त्यांना आढळून आल्या नाहीत. या भेटीदरम्यान त्यांच्यासोबत शिक्षणाधिकारी माध्यमिक माधव सलगर उपस्थित होते. त्यांनी याबद्दल गंभीर आक्षेप घेतले असून शिक्षणाधिकाऱ्यांना भेटी दरम्यान तात्काळ कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे निर्देश दिले. नोटीस बजावलेल्या केंद्र संचालकामध्ये भीमाशंकर उच्च माध्यमिक विद्यालय, शिराढोण, ता. कंधार, श्री. गोविंदराव पाटील उच्च माध्यमिक विद्यालय, चिखली ता. कंधार, नेताजी सुभाषचंद्र उच्च माध्यमिक विद्यालय, पानभोसी ता. कंधार यांचा समावेश आहे.
परिक्षा केंद्रामध्ये कोणतीही जबाबदारी सोपवली नसताना उपस्थित असणाऱ्या तीन शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. यामध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस, ज्युनियर कॉलेज पानभोसी येथील सहशिक्षक श्रीमती दहीहंडे गवळी, श्रीमती एम.ए. खान, लिपिक ए.यु.शेख यांचा समावेश आहे. याशिवाय परीक्षेदरम्यान नकला करण्यास मदत करणाऱ्या बाहेरील व्यक्ती श्रीनिवास अर्जून भुसेवाड, प्रणव अनिल टोम्पे, गणपत जळबा गायकवाड, दस्तगीर खमरोद्दीन, शिवाजी नारायण कदम रा. चिखली यांच्यावर भारतीय नागरी सुरक्षा संहिता कलम १२६ अन्वये कारवाई करण्यात आली आहे. उस्माननगर पोलीस ठाण्यात ही कारवाई करण्यात आली असून पोलीस उपनिरीक्षक गजानन गाडेकर यांनी यासंदर्भात गुन्हे नोंदविले आहेत. याशिवाय डी.जी.खरात, एस.एस. नरंगले, सी.डी.सोनटक्के, एस.जी.पाटील, ए.एस. जोगदंड, एम.जी.कांबळे, एस.एम. केंद्रे, एस.बी.गायकवाड या आठ पर्यवेक्षकांनी वर्गामध्ये स्वतः आय कार्ड न वापरणे, बैठक व्यवस्थेकडे दुर्लक्ष करणे, त्यांची आवश्यक तपासणी न करणे याबद्दल कारणे दाखवा नोटीस बजावल्या आहेत.
नांदेड जिल्ह्यात आजपासून १०७ परीक्षा केंद्रावर बारावीची परिक्षा सुरु झाली आहे. आज इंग्रजीच्या पेपरला ४१ हजार८९८ पैकी ४० हजार ९५o विद्याथ्र्यांनी परीक्षा दिली. ९७.५२ टक्के उपस्थिती होती. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात परीक्षा सुरळीत व शांततेत पार पाडण्यासाठी सुरक्षा व्यवस्था चोख ठेवण्यात आली आहे.

भरारी पथकांवरच कारवाई करणार…जिल्ह्यामध्ये भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आलेली आहे या पथकांची सक्रियता दर्शनी दिसायला हवी केवळ नियुक्तीसाठी ही पथके नसून केलेल्या कारवाईचे तातडीने रिपोर्टिंग झाले पाहिजे, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. अन्यथा पुढच्या पेपरच्या वेळी ज्या भागात अशी गैरव्यवस्था असेल ज्या ठिकाणी अशा पद्धतीचे जमाव दिसतील त्या ठिकाणी केंद्रप्रमुख, भरारी पथक, पोलीस, महसूल व तालुक्यातील संबंधित सर्वांवर कारवाई केली जाईल असेही जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी स्पष्ट केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!