
नांदेड – जिल्ह्यात पोलिसांनी अवैध वाळू माफियांविरुद्ध उघडलेली मोहीम आणखी तीव्र केली आहे. नांदेड, लोहा तालुक्यात केलेल्या कारवाईनंतर आता पोलिसांनी आपला मोर्चा आता बिलोली, देगलूर या सीमावर्ती भागाकडे वळवला आहे. मंगळवारी तालुक्यातील गंजगाव या खाजगी घाटावर सुरू असलेला अवैध वाळू उपसा थांबवताना तब्बल २३ हायवा ट्रक, दोन जेसीबी असा ३ कोटी १५ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
नांदेड जिल्ह्यात वाळू माफियांकडून अवैध मार्गाने वाळू उपसा व वाहतूक करून त्याची चोरट्या मार्गाने विक्री करून शासनाचा लाखो रूपयाचा महसूल बुडविल्या जात आहे. जिल्ह्यात अवैध वाळू उपसा व वाहतुकीसंदर्भाने ऑपरेशन फ्लश आऊट अंतर्गत कठोर कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी दिले आहेत. त्या अनुषंगाने ११ फेब्रुवारी रोजी ४.३० वा. ते १२ फेब्रुवारी रोजी पहाटे २ वाजे दरम्यान देगलूर उपविभागीय पोलीस अधिकारी संकेत गोसावी, त्यांचे पथक व बिलोली पोलीस स्टेशनचे अधिकारी व अंमलदार यांच्या पथकाने संयुक्तरित्या मौजे गंजगाव ता. बिलोली येथे धाड टाकून मांजरा नदीच्या पात्रातून अवैध वाळू उपसा सुरू असताना गणेश रामराव हिवराळे, जाकेर खान मिर्झा खान, ईतर ट्रक व टिप्परचे चालक व मालक तसेच दोन पोकलेनचे चालक व मालक यांच्यावर कारवाई केली. या कारवाईत २३ टिप्पर व ट्रकसह २ पोकलेन असा एकूण ३ कोटी १५ लाख १४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पोउपनि दिलीप भानुदास मुंडे यांच्या तक्रारीवरून बिलोली ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, अप्पर पोलीस अधीक्षक खंडेराय धरणे, सुरज गुरव, उपविभागीय पोलीस अधिकारी संकेत गोसावी, बिलोलीचे उपविभागीy पोलीस अधिकारी रफिक चांद शेख यांच्या मार्गदर्शनाखाली बिलोली ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय शिंदे, उपनिरीक्षक दिलीप मुंडे, पोहेकॉ मारोती मुद्देमवार, आनंदा शिंदे, बाबाराव बंडगर, शेख अन्वर, पोकॉ अशोक भंडरवार, माधव जळकोटे, गजानन अनमुलवार, व्यंकट घोंगडे, वच्चेवार आदींनी केली.
दरम्यान, नांदेड ग्रामीण पोलिसांनी १२ फेब्रुवारी रोजी धनेगाव बोंढार बायपास रस्त्यावर अवैधरित्या रेतीची चोरटी वाहतूक करीत असताना एमएच ३० बीडी २६६८ क्रमांकाचा एक हायवा ट्रक आणि एमएच २८ एच ७९४४ क्रमांकाचा एक टेम्पो ताब्यात घेतला आहे. दोन आरोपीसह २१ लाख ९० हजार रुपयांचा मुद्देमाल नांदेड ग्रामीण पोलिसांनी जप्त केला आहे. पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ मोरे, मुपडे, पोकॉ. भिसे, सिरमलवार, कांबळे, जमीर, कदम, पोना मजहर यांनी ही कारवाई केली. याप्रकरणी अंबादास गणेश बयने आणि जनार्दन गंगाराम लोणे या दोघाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भविष्यात आणखी कठोर कारवाईचे पोलीस अधीक्षकांनी दिले निर्देश… गंजगाव येथील ही कारवाई यशस्वीपणे पार पाडणाऱ्या अधिकारी व अंमलदार यांचे पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी उत्कृष्ठ कामगिरीकरीता अभिनंदन केले. तसेच अवैध वाळू उपसा व वाहतूक करणा-यांवर भविष्यात अजून कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.