
नांदेड – जिल्ह्यात इयत्ता बारावीच्या परीक्षा कॉपीमुक्त व्हाव्यात यासाठी जिल्हा परिषद, जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन यांच्याकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. मात्र त्याला अधिकारी कर्मचाऱ्याकडून खो दिला जात असल्याचा प्रकार गुरुवारी पुढे आला आहे. परीक्षा केंद्रावरील कॉपीचे प्रकार रोखण्यासाठी गठीत करण्यात आलेल्या बैठ्या पथकात नियुक्ती दिलेली असतानाही परीक्षा केंद्रावर अनुपस्थित राहणाऱ्या जिल्ह्यातील नायगाव येथील बालविकास प्रकल्प अधिकारी आणि हदगाव येथील एका ग्रामसेविकेला तडकाफडकी निलंबित करण्याची कारवाई मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल यांनी केली आहे
नांदेड जिल्ह्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या आदेशानुसार १०० दिवसाच्या कार्यक्रमांतर्गत कॉपीमुक्ती अभियान यशस्वीपणे राबविण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्यासह मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल, पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी वेगवेगळ्या परीक्षा केंद्रावर चौख बंदोबस्त ठेवला आहे. आज १३ फेब्रुवारी रोजी मराठी विषयाचा पेपर झाला. जिल्ह्यातील १०६ केंद्रावर १९ हजार ९९२ पैकी १९ हजार ३०७ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. मात्र त्याच वेळी कॉपीमुक्ती अभियानाची परीक्षा केंद्रावर यशस्वी अंमलबजावणी करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या बैठ्या पथकातील प्रमुख अधिकारी आणि कर्मचारी अनुपस्थित असल्याचा प्रकारही पुढे आला आहे. नायगाव तालुक्यातील बरबडा येथील जवाहरलाल नेहरू उच्च माध्यमिक विद्यालय या परीक्षा केंद्रावर पंचायत समितीचे बाल विकास प्रकल्प अधिकारी राहुल शिवशेट्टे यांना बैठे पथक प्रमुख म्हणून नियुक्ती दिली होती. त्यांच्यावर परीक्षा केंद्राची महत्त्वपूर्ण जबाबदारी असतानाही ते केंद्रावर पूर्ण वेळ अनुपस्थित होते. त्यामुळे त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्याची नोटीस देण्यात आली आहे. असाच प्रकार हदगाव येथील पंचशील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील परीक्षा केंद्रावरही घडला. या केंद्रावरील बैठ्या पथकातील सदस्या ग्रामसेविका सुरेखा तुकाराम बेले याही १३ फेब्रुवारी रोजी परीक्षा कालावधीत गैरहजर असल्याचे आढळून आल्या. त्यामुळे या दोन्ही अधिकारी कर्मचाऱ्यावर थेट निलंबनाची कारवाई मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल यांनी केली आहे.
आगामी काळातही बारावी तसेच दहावी परीक्षेमध्ये ज्या अधिकाऱ्या कर्मचाऱ्यावर जबाबदारी सोपवली आहे, त्यांनी आपली जबाबदारी चोखपणे पार पाडावी असे आदेश त्यांनी दिले आहेत. यावरही आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल, असा थेट इशारा मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल यांनी दिला आहे.