
नांदेड – बिलोलीत पोलिसांनी केलेली वाळू माफियांविरुद्धची कारवाई एकतर्फी असल्याची ओरड सुरू असतानाच नायगाव तालुक्यात बरबडा वाडी येथे मात्र पोलीस आणि महसूल विभागाने वाळू माफियांविरुद्ध एकत्रित येत मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांच्या हाती वाळू उपसा करणाऱ्या तीन बोटी लागल्या होत्या. त्यातील एक बोट वाळूमाफिया घेऊन पळून जात असताना पाण्यात बुडाली तर दोन बोटी जिलेटिनच्या सहाय्याने नष्ट करण्यात आल्या आहेत. ही कारवाई गुरुवारी पहाटे करण्यात आली.
जिल्ह्यात पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांच्या आदेशानुसार अवैध धंदे करणाऱ्या विविध तसेच वाळू माफिया विरुद्ध ऑपरेशन फ्लश आऊट अंतर्गत वेगवेगळ्या ठिकाणी कारवाई केली जात आहे. १३ फेब्रुवारी रोजी पहाटे नायगाव तालुक्यातील बरबडा वाडी येथील गोदावरी नदीपात्रात विनापरवाना बेकायदेशीर रित्या काही वाळूमाफिया बोट आणि इंजिनच्या सहाय्याने रेतीचे उत्खनन करीत असल्याची माहिती मिळाली. ही माहिती मिळाल्यानंतर जिल्हाधिकारी राहुल कर्डिले आणि पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय अधिकारी क्रांती डोंबे, नायगावच्या तहसीलदार धम्मप्रिया गायकवाड, कुंटूर ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रामकृष्ण पाटील इतर पोलीस कर्मचारी तेथे पोहोचले. त्या ठिकाणी तीन बोट आणि इंजिनच्या सहाय्याने गोदावरी नदी पात्रातून काळया रेतीचे उत्खनन सुरू असल्याचे दिसून आले. यावेळी घटनास्थळी महसूल विभाग आणि पोलीस येत असल्याचे पाहून वाळूमाफियांनी एक बोट पळवून नेण्याचा प्रयत्न केला. मात्र तो प्रयत्न फोल ठरला. एक बोट पाण्यात बुडाली. वाळूमाफिया मात्र पोहत पळून गेले. घटनास्थळी २५ लाख रुपयांच्या दोन बोट आणि वाळू उत्खनन करण्याचे साहित्य आढळले. हे साहित्य नायगाव उपविभागाच्या उपविभागीय अधिकारी क्रांती डोंबे, तहसीलदार धम्मप्रिया गायकवाड, सहायक पोलीस निरीक्षक रामकृष्ण पाटील यांच्या उपस्थितीत जिलेटिनच्या सहाय्याने गोदावरी नदी काठालगत पाण्यामध्ये नष्ट करण्यात आल्या.या कारवाईत मंडळ अधिकारी शितल स्वामी, पवार आणि इतर दहा ते पंधरा कर्मचारी तसेच पोलीस विभागाचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक नागोराव पोले, पोहेकॉ लक्ष्मण सोनकांबळे, पांडुरंग शिंदे, बाबू मुंडकर, पोकॉ अशोक घुमे, अंगद बाऱ्हाळे यांचा समावेश होता.
या प्रकरणात महसूल आणि पोलीस विभाग संयुक्तरीत्या पुढील कायदेशीर कारवाई करीत आहे. ही कारवाई यशस्वीपणे पार पाडणाऱ्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी अभिनंदन केले आहे. तसेच आगामी काळातही वाळू उपसा आणि अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या विरुद्ध कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.