क्राईम

नांदेडमधील गोळीबार प्रकरणाचा तपास आता दहशतवाद विरोधी पथकाकडे सुपूर्द, गोळीबारात झाला आहे एकाचा मृत्यू

शूटरसह राज्याबाहेरील काही आरोपींचा गुन्ह्यात समावेश असल्याचे स्पष्ट, नांदेडमधील दोघांनाही केली पोलिसांनी अटक 

नांदेड – शहरातील शहीदपुरा भागात १० फेब्रुवारी रोजी सकाळी साडेनऊ दरम्यान जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या आणि पॅरोल रजेवर असलेल्या गुरमीतसिंघ राजासिंघ सेवादार आणि रविद्रसिंघ दयालसिंघ राठोड या दोघांवर गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. या गोळीबारामध्ये रवींद्रसिंघ राठोड हा मरण पावला. या प्रकरणात दोघा जणांना नांदेड पोलिसांनी अटक करून या गुन्ह्याची उकल केली आहे.  असे असले तरीही या गुन्ह्यांमध्ये काही आरोपी महाराष्ट्राबाहेरील असल्याने सदर प्रकरणाचा तपास पोलीस महासंचालकांच्या आदेशान्वये छत्रपती संभाजीनगरच्या दहशतवाद विरोधी पथकाकडे सोपविण्यात आला आहे. एकूणच नांदेडमध्ये झालेल्या गोळीबाराची पाळेमुळे आता थेट कुख्यात दहशतवादी रिंधा गँगपर्यंत पोहोचत असल्याचेच स्पष्ट झाले आहे.

कुख्यात दहशतवादी रिंधाच्या भावाच्या हत्येमध्ये जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या आणि पॅरोल रजेवर बाहेर आलेल्या गुरमीतसिंघ राजासिंघ सेवादार वय ३६, रा. सचखंड गुरुद्वारा गेट नं. ६ आणि त्याचा नातेवाईक रविंद्रसिंघ पिता दयालसिंघ राठोड वय ३० रा. सचखंड गुरुद्वारा गेट नं. दोन चिखलवाडी हे स्कुटीवरून जात असताना मोटरसायकलवरून आलेल्या अनोळखी शूटरने त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. यातील जखमी रवींद्रसिंघ राठोड हा उपचारादरम्यान शासकीय रुग्णालयात मरण पावला. तर जखमी गुरमीतसिंघ सेवादार यांच्यावर उपचार सुरू आहेत. या प्रकरणात वजीराबाद ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेच्या तपासात पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार,  अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन उपविभागीय पोलीस अधिकारी सुशीलकुमार नायक, स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक उदय खंडेराय, वजीराबादचे पोलीस निरीक्षक परमेश्वर कदम तसेच शहरातील सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी आणि गुन्हे शोध पथकाचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांना शहर व परिसरातील सर्व लॉज तसेच घटनास्थळाशेजारील सीसीटीव्ही फुटेज आणि अभिलेखावरील गुन्हेगारांची तपासणी करून गुन्हा उघडकीस आणण्याबाबत आदेशित केले होते. या घटनेच्या तपासात पोलीस निरीक्षक, सहाय्यक पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक यांच्या नेतृत्वात विविध पथके स्थापन करण्यात आली होती. या गुन्ह्याच्या तपासादरम्यान गोपनीय माहिती आणि सीसीटीव्ही फुटेज तसेच यांत्रिक बाबींचे विश्लेषण करून सदरचा गुन्हा उघडकीस आणण्यात आला आहे.
 या गोळीबारातील मुख्य शूटर याला वाहन, मोबाईल, सिम कार्ड आणि इतर सर्व प्रकारची मदत करणारे आरोपी निष्पन्न करण्यात आले आहेत. त्यामध्ये मनप्रीतसिंघ उर्फ मन्नू गुरुबक्षसिंघ ढिल्लो वय ३१,  रा. भगतसिंघ रोड शहीदपुरा नांदेड आणि हरप्रीतसिंघ उर्फ हॅप्पी पिता बाबूसिंघ कार पेंटर रा. गुरुद्वारा गेट नंबर १, अंगद हॉटेल समोर या दोघांना १३ फेब्रुवारी रोजी रात्री अटक करण्यात आली. अटक करण्यात आलेल्या या दोघांकडून गुन्ह्यात वापरण्यात आलेली वाहने, मोबाईल, सिम कार्ड हस्तगत करून या गुन्ह्यातील शूटरची ओळख पटवण्यात आली आहे.

सदर गुन्ह्यांमध्ये महाराष्ट्राबाहेरील काही आरोपी समाविष्ट असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे सदर प्रकरणाचा तपास आता राज्याच्या पोलिस महासंचालकांच्या आदेशान्वये छत्रपती संभाजीनगर येथील दहशतवाद विरोधी पथकाकडे सोपविण्यात आला आहे. हा गुन्हा उघडकीस आणल्याबाबत नांदेड पोलीस परिक्षेत्राचे पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार तसेच या गुन्ह्याच्या तपासातील सर्व पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांचे अभिनंदन केले आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!