
नांदेड – जिल्हा मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथे झालेल्या कार्यक्रमास जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, जिल्हा मराठी पत्रकार संघाचे राज्य उपाध्यक्ष प्रकाश कांबळे, जिल्हाध्यक्ष संतोष पांडागळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे राजकारण आणि समाजकारणातील आदर्श गुण प्रत्येकाने अंगीकारणे आवश्यक असल्याचे सांगितले. छत्रपती शिवरायांची राजनीती, दूरदृष्टी आणि संघटन कौशल्य हे उच्च कोटीचे असल्याचे सांगितले. त्यांनी घालून दिलेल्या आदर्शांच्या मार्गाने वाटचाल केल्यास प्रत्येक जण जीवनात यशस्वी होईल, असा विश्वास यावेळी पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी व्यक्त केला.
यावेळी राज्य उपाध्यक्ष प्रकाश कांबळे आणि जिल्हाध्यक्ष संतोष पांडागळे यांनीही समायोजित विचार मांडले. शिवरायांचे संपूर्ण जीवन प्रेरणादायी आहे. जीवनात वाटचाल करताना एखाद्या प्रसंगी माघार घेण्याची वेळ आली तरी पुढे नव्या जोमाने वाटचाल करण्याची शिकवण छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजकारणातून अनुभवता आली आहे. त्यामुळे शिवरायांच्या विचारांचे अनुसरण प्रत्येकाने करावे असे आवाहनही यावेळी जिल्हाध्यक्ष पांडगळे यांनी केले. या अभिवादन सभेस पत्रकार लक्ष्मण भवरे, प्रल्हाद लोहेकर, प्रशांत गवळे, राम तरटे, सुरेश काशिदे, कुंवरचंद मंडले, अनुराग पोवळे आदींची उपस्थिती होती.