
नांदेड – येथील विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालयात गुरुवारी नांदेड शहरातील व्यापारी व व्यावसायिकांची बैठक पार पडली. या बैठकीत शहरातील गुन्हेगारीसह वाहतूक व्यवस्था अतिक्रमण, फेरीवाले, ऑटोरिक्षा आदी विषयांवर विस्तृतपणे चर्चा करण्यात आली. सदर बैठकीस शहरातील विविध व्यापारी व व्यावसायिक संघटनांचे सुमारे ५० प्रतिनिधी उपस्थित होते.
नांदेड पोलीस परिक्षेत्राचे विशेष पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप आणि पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या बैठकीत, व्यापारी व व्यावसायिकांनी आपापल्या समस्या मांडल्या. यात नांदेड शहरातील रहदारीची समस्या, रस्त्यांची कामे, अतिक्रमणे, फेरीवाले, ऑटो रिक्षा, गुन्हेगारी इत्यादी बाबत प्रतिनिधींनी मोकळेपणाने आपले विचार व्यक्त केले.
उपस्थितांच्या शंकांचे पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार व पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप यांनी निरसन केले. यावेळी शहरातील विविध विभागांना विश्वासात घेऊन कालबद्ध पद्धतीने सदर समस्यांची सोडवणूक करण्याचे निश्चित करण्यात आले. रहदारीच्या समस्यांसाठी दिनांक ५ मार्चपासून व्यापक मोहीम राबविण्याचे देखील पोलीस विभागाकडून सूचित करण्यात आले. व्यापाऱ्यांनी बैठकीत मांडलेल्या विषयांच्या पाठपुराव्यासाठी, व्यापारी व व्यावसायिकांची तीन महिन्यानंतर पुन्हा बैठक घेण्याचे ठरविण्यात आले.