
नांदेड – अर्धापूर येथे २२ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या भव्य रोजगार मिळावा देशभरातील १२० हून अधिक नामांकित कंपन्या सहभागी होणार आहेत. या मेळाव्यातून या १२० कंपन्यांमध्ये बेरोजगार युवकांना रोजगाराची मोठी संधी उपलब्ध होणार आहे. या मेळाव्यासाठी मराठवाड्यातून पाच हजाराहून अधिक तरुणांनी, बेरोजगार युवकांनी ऑनलाईन नोंदणी केल्याची माहिती संयोजक आ. श्रीजया चव्हाण यांनी दिली.
विधानसभा निवडणुकीत शिक्षण आणि बेरोजगारी यावर काम करण्याचे अभिवचन दिलेल्या भोकरच्या आ.श्रीजया चव्हाण यांनी निवडणूक जिंकल्यानंतर लगेच आपल्या संकल्पपूर्तीस सुरुवात केली. त्याचाच एक भाग म्हणून दि.२२ फेब्रुवारी रोजी अर्धापूर येथे भव्य रोजगार मेळावा आयोजित केला आहे. या रोजगार मेळाव्यात देशभरातील १२० हून अधिक वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या कंपन्या सहभागी होणार आहेत. या कंपन्यांमध्ये आ.श्रीजया चव्हाण यांच्या कल्पक दृष्टीमुळे केवळ भोकर मतदारसंघच नव्हे तर नांदेड जिल्ह्यासह मराठवाड्यातील अनेक तरूणांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे.
शनिवारी होणाऱ्या या रोजगार मेळाव्याचे उद्घाटन राज्याच्या सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याण महिला व बालविकास राज्यमंत्री मेघनाताई साकोरे-बोर्डीकर यांच्या हस्ते होईल. अध्यक्षस्थानी माजी मुख्यमंत्री खा.अशोकराव चव्हाण हे राहतील. यावेळी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.मनोहर चासकर आणि जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. मेळाव्यासाठी संपूर्ण मराठवाड्यातून ५ हजारांहून अधिक बेरोजगार युवकांनी नोंदणी केली आहे. मेळाव्यास्थळीही ऑफलाईन नोंदणी करण्यात येणार असल्याचे संयोजकांनी सांगितले. त्यामुळे बेरोजगारांना या मेळाव्यात सहभागी होण्याची संधी उपलब्ध आहे.
या मेळावास्थळी १५० स्टॉल्स उभारण्यात येणार आहेत. या स्टॉल्सच्या माध्यमातून राज्य शासनाच्या विविध संस्था, मंडळे, महामंडळ आदींच्या माध्यमातून सुरु असलेल्या कर्ज योजना, अनुदान योजना, शिष्यवृत्ती योजना, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, तांत्रिक प्रशिक्षण आदी बाबतची माहिती देण्यात येणार आहे. ही सर्व माहिती विद्यार्थ्यांना निःशुल्क उपलब्ध करुन दिली जाणार आहे. या मेळाव्याच्या माध्यमातून इयत्ता १० वी ते पदव्युत्तर शिक्षण असलेल्या हजारो युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे. या मेळाव्यास मराठवाड्यातील तसेच जिल्ह्यातील युवकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन आ. श्रीजया चव्हाण यांनी केले आहे.
या मेळाव्यामध्ये संपूर्ण देशभरातून १२० हून अधिक कंपन्या सहभागी होणार आहेत. या विविध कंपन्यांमध्ये बेरोजगार युवकांना विविध पदांवर रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे. मुंबई, पुणे, बंगळुरू, चेन्नई, नागपूर, हैद्राबाद, छत्रपती संभाजीनगर, जालना, नांदेड आदी ठिकाणच्या नामांकित कंपन्या या मेळाव्यात बेरोजगारांसाठी रोजगार उपलब्ध करून देणार आहेत. त्यामध्ये महिंद्रा ॲण्ड महिंद्रा, किया मोटर्स, केन्स टेक्नॉलॉजी, एसबीआय लाईफ, आयसीआय, टाटा मोटर्स, एमआरएफ टायर्स, हायर, फियाट, बजाज इलेक्ट्रिकल्स, फिनोलेक्स केबल, कोरोमंडल फायनान्स, तिरूमला ग्रुप, इंडूरन्स ग्रुप, एल ॲण्ड टी, सायबेरोथॉन आदी नामांकित कंपन्यांचा सहभाग राहणार आहे.